Friday, December 26, 2014

कृषी विभागाला केंद्राचा १ कोटीचा पुरस्कार, कडधान्य उत्पादकतावाढ

केंद्राचा राज्य कृषी विभागाला
एक कोटी रुपयांचा पुरस्कार

कडधान्य उत्पादकतावाढीचा गौरव

पुणे (प्रतिनिधी) ः गेल्या आर्थिक वर्षात (2013-14) महाराष्ट्रात कडधान्य पिकांच्या उत्पादकतावाढीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्याच्या कृषी विभागाची केंद्र सरकारच्या "कमंडेशन ऍवार्ड' साठी निवड झाली आहे. एक कोटी रुपये व सन्मान असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे यांना पत्र पाठवून याबाबतची घोषणा केली आहे.

अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कडधान्य पिकांची उत्पादकता देशाच्या सरासरी कडधान्य उत्पादकतेपेक्षा कमी असलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कडधान्य अभियान राबविण्यात येत आहे. कडधान्य पिकांचे उत्पादन, उत्पादकता वाढविण्यासाठी प्रात्यक्षिके, निविष्ठा, तंत्रज्ञान प्रसार यासाठी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात योजना राबवली जाते. चांगली उत्पादकतावाढ करणाऱ्या राज्यांच्या कृषी विभागांना केंद्रामार्फत पुरस्कार देवून गौरविण्यात येते. कडधान्य पिकांच्या गटात महाराष्ट्राला हा पुरस्कार जाहिर झाला आहे.

गेल्या खरीपात राज्यात 19 लाख 78 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली. त्यापासून हेक्‍टरी 730 किलोच्या सरासरी उत्पादकतेने राज्यात 14 लाख 43 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. पाठोपाठ रब्बी हंगामात 19 लाख 42 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली. त्यात हेक्‍टरी 864 किलोच्या सरासरीने राज्यात 16 लाख 77 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. एकूण वर्षात 39 लाख 20 हजार हेक्‍टरवर कडधान्य पिकांची पेरणी होवून 31 लाख 20 हजार टन कडधान्य उत्पादन झाले. या कामगिरीसाठी कृषी विभागाला हा पुरस्कार जाहिर झाल्याची माहिती कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी दिली.
--------------- 

No comments:

Post a Comment