Friday, December 26, 2014

"त्या' 18 डाळींब उत्पादकांना 6.25 लाख रुपये भरपाई

स्वयंचलित हवामान यंत्राचा घोळ; महसूल विभागाची नोंद अखेर ग्राह्य

पुणे (प्रतिनिधी) ः जोरदार पाऊस होऊनही "कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्य मापकात पावसाची नोंद नाही' या कारणाखाली इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीने इंदापूरातील 18 शेतकऱ्यांना डाळींब विमा भरपाई नाकारली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर विभागिय अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता कंपनीने ही भरपाई मान्य केली आहे. भरपाईचे 6.25 लाख रुपये खातेदारांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी नुकतिच स्टॅट बॅंक ऑफ इंडियाकडे जमा करण्यात आली आहे. निमगाव केतकी येथिल शेतकरी आबासाहेब हेगडे व साहेबराव मोहिते यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

हवामानाधारीत फळपिक विमा योजनेतून (2013-14) निमगाव केतकी महसूल मंडळातील 18 शेतकऱ्यांनी डाळींब पिकासाठी 25 हेक्‍टर क्षेत्राचा विमा उतरवला होता. हेक्‍टरी एक लाख रुपये संरक्षणासाठी या शेतकऱ्यांनी हेक्‍टरी सहा हजार रुपये विमा हप्ता भरला होता. या योजनेतील निकषानुसार एक फेब्रुवारी 2014 ते 31 मार्च 2014 या कालावधीत प्रतिदिन 11 ते 20.99 मिलीमिटर दरम्यान पाऊस पडल्यास 15 हजार रुपये, 21 ते 30.99 मिलीमिटर दरम्यान पाऊस पडल्यास 25 हजार रुपये आणि 31 मिलीमिटरहून जास्त पाऊस पडल्यास प्रति हेक्‍टर 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार होती.

निमगाव केतकी मंडळात 10 मार्च 2014 रोजी 28 मिलीमिटर पाऊस पडला. महसूल विभागाच्या पर्जन्यमापकात याची नोंद झाली. मात्र विमा कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रातील पर्जन्यमापकात याची नोंद झाली नाही. यामुळे कंपनीने शेतकऱ्यांनी भरपाई देण्यास नकार दिला. याबाबत शेतकऱ्यांनी 10 सप्टेंबर 2014 रोजी विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. निमगाव केतकी येथे सदर दिवशी 28 मिलीमिटर पाऊस पडल्याचे प्रमाणपत्र इंदापूरच्या तहसिलदारांनी दिल्यानंतर ही नोंद ग्राह्य धरुन कंपनीने शेतकऱ्यांनी भरपाई द्यावी, असा आदेश विभागिय अधिक्षक कृषी अधिक्षक विनयकुमार आवटे यांनी दिला.

कृषी विभागाच्या या आदेशानुसार विमा कंपनीने 18 शेतकऱ्यांनी प्रति हेक्‍टर 25 हजार रुपये याप्रमाणे 25 हेक्‍टर क्षेत्रासाठी सहा लाख 25 हजार रुपये भरपाई मंजूर करुन बॅंकेकडे जमा केली आहे. अवेळी पाऊस, अति उष्णता, अतिथंडी आदी आपत्तींमुळे फळपिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकर्यांना संरक्षण देण्यासाठी हवामान आधारीत फळपिक विमा योजना चांगली असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
-------------- 

No comments:

Post a Comment