Saturday, March 29, 2014

खडीवाले वैद्य अन्न प्रदर्शन


राज्यात ढगाळ हवामान


फलोत्पादन संघ गारपीट केंद्र मागण्या


बोजवारा कृषी यांत्रिकीकरणाचा - भाग २


बोजवारा कृषी यांत्रिकीकरणाचा - भाग १


गारपिटग्रस्त उसाचे पंचनामे केलेच नाहीत...


गारपीटग्रस्त उसाचे पंचनामे होणार

कृषी विभागाच्या सूचना; शेतकऱ्यांनाही आवाहन

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील गारपीटग्रस्त ऊसपीक क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयामार्फत सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्यांचे काम सुरू आहे. यातूनही कोणाचे पंचनामे राहिल्यास संबंधित शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले आहे.

दरम्यान, ऊस उत्पादक शेतकरी पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाने राज्यातील ऊस पिकाचे 31 हजार हेक्‍टरवर नुकसान झाल्याचे राज्य शासनास कळविले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे 19 लाख 31 हजार 938 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात 31 हजार 91 हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वाधिक 24 हजार 700 हेक्‍टर नुकसानग्रस्त ऊस क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांतही काही प्रमाणात नुकसान नोंदविण्यात आले आहे. मात्र पुणे व नगरसह उर्वरित सर्व जिल्ह्यांमधील उसाचे गारपिटीमुळे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. पंचनाम्यांच्या प्राथमिक अहवालानुसार धुळे, नंदुरबार, पुणे, नगर , सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत गारपिटीने नुकसान झालेल्या उसाचे अद्याप नोंद झालेली नाही.

राज्यातील नुकसानग्रस्त ऊस क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा - क्षेत्र
सोलापूर - 24700
बीडमध्ये - 3181
लातूर - 1480
औरंगाबाद - 840
नाशिक - 446
जालना - 231
हिंगोली - 148
नांदेड - 52
जळगाव - 13 हेक्‍टर उसाचे गारपिटीने नुकसान झाले आहे.
(स्रोत ः राज्य कृषी विभागाचा प्राथमिक नुकसान अहवाल)


कोट
""सोलापूर भागातील गारपीटग्रस्त उसाची पाहणी केली. या भागात पंचनामे झाले आहेत. पोंग्यात पाणी जाऊन ऊस सडलाय. त्याचा जनावरांना खाऊ घालण्यासाठीही उपयोग होणार नाही. अतिशय गंभीर नुकसान आहे. अजूनही पंचनामे सुरू आहेत. सर्व गारपीटग्रस्त उसाचे पंचनामे करण्यात येतील.''
डॉ. सुदाम अडसूळ, कृषी विस्तार संचालक
------------------

केंद्रीय फुलोत्पादन संशोधन संचलनालय पुण्यात सुरु

कृषी महाविद्यालयात कार्यालय; 31 हेक्‍टर जमीनीस हिरवा कंदील 

पुणे (प्रतिनिधी) ः भारतीय कृषी संशोधन व शिक्षण परिषदेच्या (आयसीएआर) महासंचालकांनी खडसावल्यानंतर अखेर केंद्रीय फुलोत्पादन संशोधन संचालनालय पुणे कृषी महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत सुरु झाले आहे. महाविद्यालयातील 9.44 हेक्‍टर जमीन आणि मांजरी येथिल कृषी तंत्र विद्यालयाची 21.66 हेक्‍टर जमीन संचालनालयास उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात संचालनालय पूर्ण क्षमतेनिशी कार्यरत होणार असल्याची माहिती येथिल सुत्रांनी दिली. 

महासंचालक डॉ. अय्यपन यांनी कडक भुमिका घेतल्यानंतर गेल्या वर्षापासून केंद्रीय फुलोत्पादन संशोधन संचलनालायाच्या दिल्ली ते पुणे स्थलांतरणास लागलेले ग्रहण अखेर सुटले आहे. पुण्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या आयसीएआरच्या संचालक परिषदेत डॉ. अय्यपन यांनी फुलोत्पादन संशोधन संचालनालयाचे प्रमुख डॉ. विजयकुमार यांना पुण्यात स्थलांतरास विलंब करत असल्याबद्दल कडक शब्दात तंबी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत सर्व शास्त्रज्ञांना घेवून एक फेब्रुवारीपासून पुण्यात रुजू होण्याचे आदेश डॉ. अय्यपन यांनी दिले होते. यानुसार काही शास्त्रज्ञ या ठिकाणी रुजू झाले आहेत. 

दरम्यान, राज्य शासनाने पुण्यात सुरु होणाऱ्या केंद्रीय फुल शेती संचलनालयासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ताब्यातील 31 हेक्‍टर जमीन एक रुपया नाममात्र किमतीने आयसीएआरकडे हस्तांतरीत करण्यास मंजूरी दिली आहे. पुणे कृषी महाविद्यालयातील 9.44 हेक्‍टर व मांजरी येथिल कृषी तंत्र विद्यालयाची मांजरी, हडपसर व मुंढवा येथिल 21.66 हेक्‍टर जमीनीचा यात समावेश आहे. 

भविष्यात काही कारणांनी जर संशोधन संचालनालय बंद करण्यात आले तर ही जमीन त्यावरील बांधकामासह पुन्हा विद्यापीठास विनामुल्य परत करण्याच्या अटीवर या जमीनीचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. या जमीनीचा वापर संशोधनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाणिज्यिक कारणांसाठी, हस्तांतरीत करण्यात, खासगीकरणाच्या माध्यमातून या जमीनीवर प्रकल्प करण्यात मनाई करण्यात आली आहे. 

शासनाच्या आदेशानुसार आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या जमीनीच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव महसूल व वन विभागास सादर करण्यात येणार आहे. यानंतर ही जमीन या दोन्ही विभागांकडून आयसीएआरच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. 
---------------- 

कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रीया २०१४-१५


पुणे (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील 2014-15 शैक्षणिक वर्षासाठीची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रीया येत्या एक एप्रिलपासून सुरु होत आहे. यासाठी एक ते 25 एप्रिल दरम्यान ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार असून सामाईक प्रवेश परिक्षा 6 ते 11 जुलै या कालावधीत होणार आहे.

कृषी व संलग्न पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या सामाईक प्रवेश परिक्षेसाठी संबंधीत पदवीधारक विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. एक एप्रिलपासून महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mcaer.org) विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतील. छायाचित्र व सहीसह अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल आहे. यानंतर 28 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना बॅंकेत परिक्षा शुल्क भरता येईल. संभाव्य पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी10 मे रोजी तर अंतिम उमेदवारांची प्रवेशपत्र 10 जून रोजी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहेत. परिक्षेचा निकाल 30 जुलै रोजी कृषी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी 020 25510419, 25510519 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी केले आहे.
------------------