Saturday, March 29, 2014

केंद्रीय फुलोत्पादन संशोधन संचलनालय पुण्यात सुरु

कृषी महाविद्यालयात कार्यालय; 31 हेक्‍टर जमीनीस हिरवा कंदील 

पुणे (प्रतिनिधी) ः भारतीय कृषी संशोधन व शिक्षण परिषदेच्या (आयसीएआर) महासंचालकांनी खडसावल्यानंतर अखेर केंद्रीय फुलोत्पादन संशोधन संचालनालय पुणे कृषी महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत सुरु झाले आहे. महाविद्यालयातील 9.44 हेक्‍टर जमीन आणि मांजरी येथिल कृषी तंत्र विद्यालयाची 21.66 हेक्‍टर जमीन संचालनालयास उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात संचालनालय पूर्ण क्षमतेनिशी कार्यरत होणार असल्याची माहिती येथिल सुत्रांनी दिली. 

महासंचालक डॉ. अय्यपन यांनी कडक भुमिका घेतल्यानंतर गेल्या वर्षापासून केंद्रीय फुलोत्पादन संशोधन संचलनालायाच्या दिल्ली ते पुणे स्थलांतरणास लागलेले ग्रहण अखेर सुटले आहे. पुण्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या आयसीएआरच्या संचालक परिषदेत डॉ. अय्यपन यांनी फुलोत्पादन संशोधन संचालनालयाचे प्रमुख डॉ. विजयकुमार यांना पुण्यात स्थलांतरास विलंब करत असल्याबद्दल कडक शब्दात तंबी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत सर्व शास्त्रज्ञांना घेवून एक फेब्रुवारीपासून पुण्यात रुजू होण्याचे आदेश डॉ. अय्यपन यांनी दिले होते. यानुसार काही शास्त्रज्ञ या ठिकाणी रुजू झाले आहेत. 

दरम्यान, राज्य शासनाने पुण्यात सुरु होणाऱ्या केंद्रीय फुल शेती संचलनालयासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ताब्यातील 31 हेक्‍टर जमीन एक रुपया नाममात्र किमतीने आयसीएआरकडे हस्तांतरीत करण्यास मंजूरी दिली आहे. पुणे कृषी महाविद्यालयातील 9.44 हेक्‍टर व मांजरी येथिल कृषी तंत्र विद्यालयाची मांजरी, हडपसर व मुंढवा येथिल 21.66 हेक्‍टर जमीनीचा यात समावेश आहे. 

भविष्यात काही कारणांनी जर संशोधन संचालनालय बंद करण्यात आले तर ही जमीन त्यावरील बांधकामासह पुन्हा विद्यापीठास विनामुल्य परत करण्याच्या अटीवर या जमीनीचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. या जमीनीचा वापर संशोधनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाणिज्यिक कारणांसाठी, हस्तांतरीत करण्यात, खासगीकरणाच्या माध्यमातून या जमीनीवर प्रकल्प करण्यात मनाई करण्यात आली आहे. 

शासनाच्या आदेशानुसार आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या जमीनीच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव महसूल व वन विभागास सादर करण्यात येणार आहे. यानंतर ही जमीन या दोन्ही विभागांकडून आयसीएआरच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. 
---------------- 

No comments:

Post a Comment