Saturday, March 29, 2014

गारपीटग्रस्त उसाचे पंचनामे होणार

कृषी विभागाच्या सूचना; शेतकऱ्यांनाही आवाहन

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील गारपीटग्रस्त ऊसपीक क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयामार्फत सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्यांचे काम सुरू आहे. यातूनही कोणाचे पंचनामे राहिल्यास संबंधित शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले आहे.

दरम्यान, ऊस उत्पादक शेतकरी पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत असताना प्रशासनाने राज्यातील ऊस पिकाचे 31 हजार हेक्‍टरवर नुकसान झाल्याचे राज्य शासनास कळविले आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे 19 लाख 31 हजार 938 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात 31 हजार 91 हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वाधिक 24 हजार 700 हेक्‍टर नुकसानग्रस्त ऊस क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील आहे. नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड व हिंगोली या जिल्ह्यांतही काही प्रमाणात नुकसान नोंदविण्यात आले आहे. मात्र पुणे व नगरसह उर्वरित सर्व जिल्ह्यांमधील उसाचे गारपिटीमुळे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. पंचनाम्यांच्या प्राथमिक अहवालानुसार धुळे, नंदुरबार, पुणे, नगर , सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांत गारपिटीने नुकसान झालेल्या उसाचे अद्याप नोंद झालेली नाही.

राज्यातील नुकसानग्रस्त ऊस क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
जिल्हा - क्षेत्र
सोलापूर - 24700
बीडमध्ये - 3181
लातूर - 1480
औरंगाबाद - 840
नाशिक - 446
जालना - 231
हिंगोली - 148
नांदेड - 52
जळगाव - 13 हेक्‍टर उसाचे गारपिटीने नुकसान झाले आहे.
(स्रोत ः राज्य कृषी विभागाचा प्राथमिक नुकसान अहवाल)


कोट
""सोलापूर भागातील गारपीटग्रस्त उसाची पाहणी केली. या भागात पंचनामे झाले आहेत. पोंग्यात पाणी जाऊन ऊस सडलाय. त्याचा जनावरांना खाऊ घालण्यासाठीही उपयोग होणार नाही. अतिशय गंभीर नुकसान आहे. अजूनही पंचनामे सुरू आहेत. सर्व गारपीटग्रस्त उसाचे पंचनामे करण्यात येतील.''
डॉ. सुदाम अडसूळ, कृषी विस्तार संचालक
------------------

No comments:

Post a Comment