Wednesday, January 27, 2016

स्थलांतर, मोलमजुरी, बेलवंडी

संतोष डुकरे
बेलवंडी, जि. नगर - मुलीच्या लग्नात झालेलं ५० हजाराचं कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षापासून राबतोय. अजूनही तीस हजार बाकी आहेत. यंदा कडक दुष्काळानं घर दार सोडावं लागलं. एका मुलाची शाळा सुटली. आता दोघा मुलांना शिकवायचंय, कर्ज फेडायचंय, घरकुल बांधायचंय... कोण कोणाची मदत करतो, मदतीची अपेक्षा नाही. जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत मोलमजूरी करुन पोरांना शिकवायला जिव काढणार, पुढचं पुढं पाहू... ही कैफियत आहे पळसखेडा दाभाडी (भोकरदन, जालना) गावचे माजी सरपंच शेनफड साळवी यांची. बेलवंडी शिवारात मोलमजूरी करुन भेगाडला संसार सावरण्यासाठी साळवी कुटुंबाची धडपड सुरु आहे.

शेनफड साळवी हे पाच वर्षे गावचे सरपंच होते. पण स्वतःच्या कुटुंबासाठी साधं घरकुलही त्यांना उभारता आलेलंनाही. घरकुल मंजुर झालं, पायाच्या कामासाठी ३५ हजार मिळाले. पण पुढचं काम पैशाअभावी थांबलं. ग्रामपंचायत म्हणतेय काम पूर्ण करा नाही तर कारवाई करु. पैसेच नाहीत तर काय करु हा त्यांचा सवाल. त्यात तीन वर्षापूर्वी तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज झाले. ते फेडण्यासाठी एका मुलाला शाळा सोडावी लागली. आता दुष्काळाच्या तडाख्यात उरलेल्या दोन मुलांची शाळा सुटू नये म्हणून नवरा बायको आणि एक मुलगा मोलमजूरी करत आहेत. एक मुलगा औरंगाबादला बहिनीकडे राहून शिकतोय तर दुसरा गावच्या खोपटात एकटाच राहून कसाबसा शाळेत तग धरुन आहे. परिस्थिती बदलेल या आशेवर साळवी कुटुंबाचा झगडा सुरु आहे.

अशीच परिस्थिती याच गावातील मदास गुंडाजी रगडे यांच्याही कुटुंबाची आहे. तलावासाठी अडीच एकर जमीन गेली. अवघ्या आठ हजार रुपये एकराने भरपाई मिळाली. दुसरी जमीन घेतली त्यातलीही पाझरतलावाला गेली. पोटखराबा इत्यादी जावून अवघी दीड एकर जमीन उरलीये. त्यात ही दुष्काळी स्थिती. घरादाराला टाळा ठोकून मराठवाड्याची सिमा ओलांडून नगर जिल्ह्यात मोलमजूरी करत आहेत. आई लेकीच्या घरी आहे तर मुलगा बहिनीकडे औरंगाबादला राहून दवाखान्यात काम करतोय. घरी कुणीच नाही म्हणून आठवीला असलेल्या लहान मुलाची शाळा सुटलीये.

दुष्काळ आहे म्हणून दातावर दात धरुन न बसता बाहेर पडलं तर चार पैसे मिळतील, मुला बाळांना साथ देता येईल. ते त्यांच्या पायावर उभे राहीले तर आम्हालाही सांभाळू शकतील. मुलाबाळांसाठी सगळा झगडा सुरु आहे. जुनं पत्र्याचं घर आहे गावी. नाव दारिद्र्य रेषेखाली नाही. वर्षाच उत्पन्न जास्त असतं तर इकडं कशाला आलो असतो. घरकूल नाही. आत्तापर्यंत कोणाचीही मदत किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. मिळण्याची आशाही नाही. म्हणून स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडलोय. येत्या हंगामात पाऊस चांगला झाला तरच जाणं होईल पेरणीला, नाही तर इकडंच थांबावं लागेल. दररोज काम नसतं. महिन्याला दोन तीन हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता सहा महिन्याला तीघांचे सुमारे २० हजार नेतो गावाला, अशी माहिती मदास रगडे यांनी दिली.
----------------------------
‘‘दोन अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. यंदा फक्त एक पाऊस झाला. फक्त चार आणेच शेतकरी राहीलेत गावात, बाकी सर्वजण दसरा झाला आणि बाहेर पडले. ऊस तोडीला जाणारे मुकादम व कारखाने ठरलेले आहेत. इतर जण बाहेर काम शोधतो बागायतदारांकडं. पाऊस चांगला झाला तरी शेतीवर भागत नाही. रोजंदारी करावीच लागते. दोन्ही मुलं हुशार आहेत, त्यांना शाळा शिकवायची आहे.’’
- शेनफड साळवी, पळसखेडा दाभाडी, जालना
-----------------------------

Friday, January 22, 2016

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवर घरदार, शेती सोडण्याची वेळ

हजारो शेतकऱ्यांची महानगरांकडे धाव, तीन दशकांतील सर्वात मोठे स्थलांतर

संतोष डुकरे
पुणे - पिक नाही, पाणी नाही, काम नाही, मजूरी नाही... मग गावात राहून जगायचं तरी कसं. घरदार तर सावरायलाच हवं. नुसत्या आशेवर तरी किती दिवस काढणार. या स्थितीत एकमेव उपाय म्हणून राज्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, सुरत आदी महानगरांची वाट धरली आहे. गेल्या तीन महिन्यात एवट्या पुणे शहरात सुमारे एक लाखाहून अधिक शेतकरी पडेल ते काम करून कुटुंब जगविण्यासाठी दाखल झाले आहेत. निसर्गाच्या घाल्यात अत्यंत हालाकीच्या स्थितीत कुणाच्याही मदतीविना संसाराचा गाडा सावरण्यासाठी त्यांचा एकहाती संघर्ष सुरु आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांबरोबरच खानदेश व पश्चिम विदर्भातूनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा लोट शहरांच्या दिशेने सुरु आहे. पावसाळ्यात पावसाने दगा दिल्याने खरीपाची पिके हातची गेली, रब्बीची पेरणीही होऊ शकली नाही. प्यायलाही पाणी नाही अशी या सर्व ग्रामस्थांची समान स्थिती आहे. या गावांची शेतीकेंद्रीत असलेली सर्व अर्थव्यवस्थाच ठप्प झाल्याने रोजगार पूर्णतः संपून शेतकऱ्यांवर शेती, घरदार सोडून कुटुंब जगवण्यासाठी शहर गाठण्याची आपत्ती ओढावली आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. जानेवारीपासून हे प्रमाण कमी झाले असले तरी अद्यापही हा ओघ सुरुच आहे.

पुण्यात कात्रज, हडपसर, संगमवाडी, शिवाजीनगर, निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण या भागात मोठ्या संख्येने स्थलांतरीत दाखल झाले आहेत. खासगी बस वाहतूकदारांच्या अंदाजानुसार गेल्या तीन महिन्यात खासगी बस, एस.टी., रेल्वे आदी मार्गांनी सुमारे दोन लाखाहून अधिक दुष्काळग्रस्त पुणे व लगतच्या भागात रोजगारासाठी दाखल झाले आहेत. यातील बहुतेक जण अकुशल व अल्पशिक्षित असून पुण्यातील मजुर, नातेवाईक, ठेकेदार यांच्या ओखळीवर कामाच्या आशेने आले अाहेत. सध्या पुणे परिसरात बांधकाम व्यवसायात मंदीचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बांधकामे बंद आहेत. यामुळे एरवी सहजपणे मिळणाऱ्या रोजगार व रहाण्याच्या सोईसाठी पुण्याच्या विविध उपनगरांमध्ये शोधाशोध करावी लागत आहे. कंपन्यांमध्ये हेल्पर, साफसफाई, आचाऱ्यांकडे, हॉटेलमध्ये वाढप्या अशी मिळेल ती कामे करुन महिना चार पाच हजार रुपये मिळतात, अशी स्थिती आहे.

- उच्चभ्रू प्रवाशांना दुष्काळग्रस्तांचे अजिर्ण
बुलडाण्याहून पुण्याला बसणे येण्यास एका व्यक्तीला ६०० ते ८०० रुपये भाडे आहे. पण ते परवडत नाही म्हणून वाहनचालकांना गयावया करुन १५०-२०० रुपये देवून दोघांच्या जागेवर चार-सहा जण दाटीवाटीत बसून येतात. मात्र या दुष्काळग्रस्त प्रवाशांचा तथाकथीत उच्चभ्रू प्रवाशांना त्रास होतो. अनेकजण त्यांना गाडीत घेवू नका म्हणून भांडतात. त्यातूनही घेतलेच तर चोरीचा आळ घेतात. काही वेळा तर भरपाईही वसुल करतात. पुण्यात पोचल्यावर पहिला सामना रिक्षाचालकांचा करावा लागतो. अव्वाच्या सव्वा भाडे मागणे, दिशाभूल करण्यापासून तर लघुशंका या किंवा त्या बाजूला का केली यावरुनच्या शिव्या धमक्यांपर्यंत अनेक बाबींचा गपगुमान सामना करावा लागतोय. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महानगरांमध्ये कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने या हाल अपेष्ठांमध्ये अधिकच भर पडत आहे.

- फसवणूकीचेही प्रकार
दुष्काळग्रस्त, त्यात पुन्हा गरजवंत, पडेल ते काम करायला तयार... शेतकऱ्यांच्या या असहाय परिस्थितीचा फायदा घेत त्यांची फसवणूक करण्याचेही प्रकार पुण्यात कमी अधिक प्रमाणात घडत आहेत. कामाची हमी, पगाराची बोली करुन कामावर नेले जाते, मात्र प्रत्यक्षात पगार देताना कमी पैसे हातावर टेकवत. कुठलाच आधार नाही, भांडून तरी काय होणार. फसवणूक झाली तरी शेवटी गपगुमान मिळेल ती मजूरी घेवून दुसरं काम बघावं लागतंय, अशी माहिती बांधकाम मजूर म्हणून काम करत असलेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी दिली.
---------------------
- कोट
गावाकडं जगूच शकत नाही
‘‘आम्ही १३ जण आलोय पुण्यात. पहिल्यांदाच घर सोडलंय. एकाच्या वळखीनं भोसरीत वाढप्याचं काम करायचंय. नसतो आलो तर आई बाप पोरं उपाशी मरतील. गावाकडं जगूच शकत नाही. गाड्याच्या गाड्या भरुन लोक येताहेत. दरेक गावातून कमीत कमी शे दोनशे लोकांनी गाव सोडलय. घरी फक्त म्हतारी माणसं आणि त्यांचं तुकडा पाण्याचं पहायला एखादं तरणं माणूस एवढंच उरलंय’’
सचिन जाधव, गजानन आडे, विनोद राठोड, निलेश राठोड (सर्वजण मु.पो.राजगड, ता. मेहकर, जि. बुलडाणा)
-----
‘मी मुखेडमधील अंबुलगा गावचा. दहा वर्षापुर्वी पुण्यात आलो. झाडलोटीपासूनची कामं केली. आता थोडी बरी स्थिती आहे. नांदेड, हिंगोली, लोहा, परळी वैजनाथ, आंबेजोगाई, कारंजा लाड, जळगाव, भुसावळ या भागातून यंदा कधी नव्हती एवढी लाट आहे. मध्य प्रदेशातूनही नागपूरमार्गे लोक येताहेत. परत कोणी जात नाही.’’
- रामा गुळवे, खुराणा ट्रॅव्हल्स
--------------------

डॉ. मुराद बुरोंडकर यांना कृषी सन्मान पुरस्कार



पुणे - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मुराद बुरोंडकर यांना द मिडीया रुट्स आणि झी २४ तास या संस्थांमार्फत देण्यात येणारा सालचा सर्वोत्कृष्ट कृषी संशोधन २०१५ हा पुरस्कार सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. हापूस आंब्याची नियमित दरवर्षी फलधारणा व आंब्यातील साक्याचे प्रमाण कमी करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे. या संशोधनाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
-------------(समाप्त)---------------