Wednesday, January 27, 2016

स्थलांतर, मोलमजुरी, बेलवंडी

संतोष डुकरे
बेलवंडी, जि. नगर - मुलीच्या लग्नात झालेलं ५० हजाराचं कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षापासून राबतोय. अजूनही तीस हजार बाकी आहेत. यंदा कडक दुष्काळानं घर दार सोडावं लागलं. एका मुलाची शाळा सुटली. आता दोघा मुलांना शिकवायचंय, कर्ज फेडायचंय, घरकुल बांधायचंय... कोण कोणाची मदत करतो, मदतीची अपेक्षा नाही. जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत मोलमजूरी करुन पोरांना शिकवायला जिव काढणार, पुढचं पुढं पाहू... ही कैफियत आहे पळसखेडा दाभाडी (भोकरदन, जालना) गावचे माजी सरपंच शेनफड साळवी यांची. बेलवंडी शिवारात मोलमजूरी करुन भेगाडला संसार सावरण्यासाठी साळवी कुटुंबाची धडपड सुरु आहे.

शेनफड साळवी हे पाच वर्षे गावचे सरपंच होते. पण स्वतःच्या कुटुंबासाठी साधं घरकुलही त्यांना उभारता आलेलंनाही. घरकुल मंजुर झालं, पायाच्या कामासाठी ३५ हजार मिळाले. पण पुढचं काम पैशाअभावी थांबलं. ग्रामपंचायत म्हणतेय काम पूर्ण करा नाही तर कारवाई करु. पैसेच नाहीत तर काय करु हा त्यांचा सवाल. त्यात तीन वर्षापूर्वी तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज झाले. ते फेडण्यासाठी एका मुलाला शाळा सोडावी लागली. आता दुष्काळाच्या तडाख्यात उरलेल्या दोन मुलांची शाळा सुटू नये म्हणून नवरा बायको आणि एक मुलगा मोलमजूरी करत आहेत. एक मुलगा औरंगाबादला बहिनीकडे राहून शिकतोय तर दुसरा गावच्या खोपटात एकटाच राहून कसाबसा शाळेत तग धरुन आहे. परिस्थिती बदलेल या आशेवर साळवी कुटुंबाचा झगडा सुरु आहे.

अशीच परिस्थिती याच गावातील मदास गुंडाजी रगडे यांच्याही कुटुंबाची आहे. तलावासाठी अडीच एकर जमीन गेली. अवघ्या आठ हजार रुपये एकराने भरपाई मिळाली. दुसरी जमीन घेतली त्यातलीही पाझरतलावाला गेली. पोटखराबा इत्यादी जावून अवघी दीड एकर जमीन उरलीये. त्यात ही दुष्काळी स्थिती. घरादाराला टाळा ठोकून मराठवाड्याची सिमा ओलांडून नगर जिल्ह्यात मोलमजूरी करत आहेत. आई लेकीच्या घरी आहे तर मुलगा बहिनीकडे औरंगाबादला राहून दवाखान्यात काम करतोय. घरी कुणीच नाही म्हणून आठवीला असलेल्या लहान मुलाची शाळा सुटलीये.

दुष्काळ आहे म्हणून दातावर दात धरुन न बसता बाहेर पडलं तर चार पैसे मिळतील, मुला बाळांना साथ देता येईल. ते त्यांच्या पायावर उभे राहीले तर आम्हालाही सांभाळू शकतील. मुलाबाळांसाठी सगळा झगडा सुरु आहे. जुनं पत्र्याचं घर आहे गावी. नाव दारिद्र्य रेषेखाली नाही. वर्षाच उत्पन्न जास्त असतं तर इकडं कशाला आलो असतो. घरकूल नाही. आत्तापर्यंत कोणाचीही मदत किंवा सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. मिळण्याची आशाही नाही. म्हणून स्वतःच्या हिमतीवर बाहेर पडलोय. येत्या हंगामात पाऊस चांगला झाला तरच जाणं होईल पेरणीला, नाही तर इकडंच थांबावं लागेल. दररोज काम नसतं. महिन्याला दोन तीन हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाता सहा महिन्याला तीघांचे सुमारे २० हजार नेतो गावाला, अशी माहिती मदास रगडे यांनी दिली.
----------------------------
‘‘दोन अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. यंदा फक्त एक पाऊस झाला. फक्त चार आणेच शेतकरी राहीलेत गावात, बाकी सर्वजण दसरा झाला आणि बाहेर पडले. ऊस तोडीला जाणारे मुकादम व कारखाने ठरलेले आहेत. इतर जण बाहेर काम शोधतो बागायतदारांकडं. पाऊस चांगला झाला तरी शेतीवर भागत नाही. रोजंदारी करावीच लागते. दोन्ही मुलं हुशार आहेत, त्यांना शाळा शिकवायची आहे.’’
- शेनफड साळवी, पळसखेडा दाभाडी, जालना
-----------------------------

No comments:

Post a Comment