Monday, February 15, 2016

अत्यल्प पावसावरही खैरेनगरने हटवला दुष्काळ

दृष्टीक्षेपात...
- यंदा फक्त २०० मिलीमिटर पाऊस
- सर्व पाणी शिवारातच मुरले, जिरले
- ५० टक्के विहीरींच्या पातळीत भरिव वाढ
- रब्बी कांदा, बटाटा, हरभरा, ज्वारीचे यशस्वी उत्पादन
- उन्हाळ्यासाठी शेततळी, विहीरीत संरक्षित पाणी साठा

पुणे (प्रतिनिधी) - सलग पाच वर्ष दुष्काळात होरपळल्यानंतर यंदा पावसाळ्याच्या अखेरीस फक्त २०० मिलीमिटर पाऊस झाला. हा पाऊस तुटपुंजा असला तरी त्याचा एकही थेंब गावाबाहेर जावू न दिल्याने खैरेनगर (ता. शिरुर, पुणे) गावचा दुष्काळ किमान चालू वर्षापूरता तरी हटला आहे. सर्व पाणी जमिनीत मुरल्याने विहीरींची पाणी पातळी लक्षणिय वाढली. शेततळ्यात ते पाणी साठवले. यामुळे पाच वर्षात प्रथमच रब्बी हंगाम हाती आला असून सर्व पिके चांगली आहेत. चालू वर्षी जूनपर्यंत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर लागणार नाही अशी स्थिती आहे.

शिरुर तालुक्यातील पाबळ, खैरेनगर, धामारी, कान्हुर मेसाई या भागात गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागत आहे. हा भाग खरिप हंगामाचे क्षेत्र असला तरी बहुसंख्य शेतकऱ्यांना गेली पाच वर्षे खरिप पेरताही आलेला नाही. पेरला त्यांच्या हाती कडबाही येत नाही असा अनुभव. चालू वर्षीही पावसाने दडी मारल्याने खैरेनगर व लगतच्या गावांचा खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु होता. यानंतर पावसाळ्याच्या अखेरीस झालेल्या पावसाचा एकही थेंब गावाबाहेर गेला नाही, विहीरींची पाणी पातळी वाढली आणि त्यावर कांदा, ज्वारी, कडब्यासह रब्बी हंगाम हाती आला आहे.

एकट्या खैरेनगरमध्ये प्लॅस्टिक कागद वापरलेली ४० व बिन प्लॅस्टिक कागदाची सुमारे ५० हून अधिक शेततळी खोदण्यात आली आहेत. विहीरीच्या पाण्यात वाढ झाल्याने ते पाणी उपसून शेततळ्यांमध्ये साठवण्यात आले आहे. एरवी या वेळेपर्यंत कोरड्या पडणाऱ्या विहीरींमध्ये सध्या दररोज तीन तास मोटरी चालतात एवढे पाणी टिकून आहे. यामुळे रब्बी हंगाम चांगल्या परिस्थितीत पार पडणार, असे आशादायक चित्र आहे. उर्वरीत पाणी पुढील चार महिने पिण्यासाठी व जनावरांसाठी उपयोगी ठरणार आहे. आसपासच्या गावांमध्येही काही ठिकाणी अशीच स्थिती आहे.

- फलदायी मृगजळ
पाबळ ओलांडून खैरेनगर गावाच्या हद्दीत प्रवेश केला की वाळवंटात पाण्याचा आभास दाखवणारे मृगजळ दिसावे त्याप्रमाणे कोरड्या, गवत वाळलेल्या शिवारात शेततळी दिसू लागतात. फरक एवढाच की मृगजळ आभासी असतं... इथली शेततळी वास्तव आहेत. आजूबाजूच्या पडीक रानात शेततळ्याभोवतीची जमीन कांदा, ज्वारी आदी पिकांनी हिरवीगार हे चित्र गावात अनेक ठिकाणी आहे. शेततळ्यांनी रब्बी पिकांची शाश्वती देण्याबरोबरच गावात उभ्या राहिलेल्या सुमारे १२ एकर क्षेत्रावरील पॉलिहाऊसमधील फुलशेतीलाही संजिवनी दिल्याचे चित्र आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसतानाही यंदाच्या परिस्थितीबाबत शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

- डाळिंबाच्या बहराची तयारी
खैरेनगर व लगतच्या टंचाईग्रस्त गावांमध्ये सुमारे २०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर डाळिंब पिक आहे. गेली काही वर्षे टॅंकरने पाणी घालून अनेक शेतकऱ्यांनी या बागा जगवल्यात. यंदा ऑक्टोबरमध्ये धरलेला बहार पावसामुळे पूर्ण फेल गेला. आता पाणीची सोय असल्याने शेतकऱ्यांनी बहार धरण्याची तयारी सुरु केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सध्या बागांना ताण दिलेला आहे. हवामानातील चढ उतार, अवकाळी पाऊस, गारपिटीचा धोका उद्भवला नाही तर यंदा चांगले डाळींब पिकवण्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

- मागेल त्याला शेततळे कधी ?
शेततळे हे दुष्काळी भागासाठी वरदान आहे. राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची घोषणा केली आहे. पण प्रत्यक्षात त्याबाबत काहीही झालेले नाही. शासकीय यंत्रणा अशी योजना नसल्याचे सांगते. जलयुक्त शिवारची कामे ठराविक ठिकाणीच सुरु आहेत. राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे मागेल त्याला शेततळे देवून शेतकऱ्यांना पिके, फळबागा वाचविण्यासाठी मदत करावी, अशी मागणी खैरेनगर येथिल रघुनाथ शिंदे, अप्पासाहेब खैरे, शिवाजी खैरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
---------------(समाप्त)----------------


No comments:

Post a Comment