Tuesday, February 16, 2016

रामदास डोके - लघुयशोगाथा

रामदास डोके
ॲग्रोवन स्मार्ट कृषीपुरक व्यवसाय पुरस्कार
--------------
दोन व्यक्ती किती संकरित गाई सांभाळू शकतात... ते ही चारा उत्पादनापासून ते दुध विक्रीपर्यंतच्या सर्व बाबी स्वतः करुन... सर्वसाधारपणे आठ ते दहा. पण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी गावचे रहिवासी असलेल्या रोहिदास बबन डाके यांनी पत्नी सौ. अर्चना यांच्या जोडीने दोघांच्याच बळावर काटेकोट व्यवस्थापनातून ७० गाईंचा दुग्धव्यवसाय यशस्वी केला आहे. दोन गाईंपासून सुरु झालेली त्यांची वाटचाल आता दोन लाख ७५ हजार लिटर दुध उत्पादन आणि 50 लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढालीपर्यंत गेली आहे.

कुटुंबाची फार थोडी उपजावू जमीन आणि कर्ज काढून घेतलेल्या दोन गाई या बळावर १९९७ साली रोहिदास डोके यांचा दुग्धोत्पादन व्यवसाय सुरु झाला. पहिल्या कर्जानंतर पुन्हा कधीही कर्ज काढले नाही. दोनाच्या चार, चाराच्या सहा गाई करत करत गाईंची संख्या हळूहळू वाढवत या वर्षी लहान मोठ्यासह जनावरांची संख्या 75 वर गेली आहे. यात 48 दुधाळ एचएफ गाई, 18 कालवडी, सहा दुध पित्या कालवडी, एक गावठी गाय व शेतकामाचे दोन बैल यांचा समावेश आहे. शेतकाम, चारा वाहतूक यासाठी बैल उपयोगी असून गावठी गाईचे दुध घरी वापरासाठी आणि गोमुत्राचा औषध म्हणून उपयोग होत आहे.

डोके पती पत्नी सकाळी पाच वाजता उठतात. गव्हाणीत आदल्या दिवशी संध्याकाळीच खाद्य टाकलेले असते. सात वाजेपर्यंत गाईंचे खाद्य व दुधासह सर्व कामे आवरतात. एकाच वेळी धारा काढायचे व जनावरांचे खायचे काम सुरु असते. पाण्याचे हौद भरुन, गाई मोकळ्या सोडून सकाळी साडेनऊ वाजता स्वतःच्या छोट्या टेम्पोत कॅन भरुन आळे येथे सहकारी दुग्ध संस्थेत दुध घेवून जातात. दुपारी 12 वाजता गोठ्याला कुलुप लावतात आणि पती पत्नी चारा आणण्यासाठी शेतात जातात. चारा उत्पादनासाठीची कामेही बरोबरीने सुरु असतात. चारा आणून त्याची कुट्टी करुन पुन्हा सायंकाळी दुध काढणे, खाद्य, पाणी, दुध संघात घेवून जाणे अशी कामे केली जातात. दिनक्रम असाच सुरु राहतो.

- २०१२ पासून मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब. गोठ्यासाठी 15 लाख रुपये खर्च आला.
- दुध उत्पादकांच्या बचत गटामार्फत (फंड) भांडवलाचा प्रश्न सोडवला.
- हिलारु गाय घेवून तिला अखेरपर्यंत सांभाळतात. सर्व गाई कमवत्या असतील याकडे कटाक्ष. प्रत्येक गाईचे वैद्यकीय रेकॉर्ड.
- घरच्या 10 एकर जमिनीत पाच एकर हत्ती गवत, तीन एकर कडवळ व दोन एकर ऊस आहे.
- एका गाईला पंधरा किलो ओला हिरवा चारा कुट्टी व दुधाप्रमाणे दोन ते चार किलो कांडी (सुग्रास) देतात.
- गाईंची लहान मुलांसारखी काळजी घेतात. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्यावर कटाक्ष, खाद्याकडे विशेष लक्ष.
- दुग्धव्यवसायातून शेतीचे सपाटीकरण, सुपिकीकरण, बांधबंदिस्ती, चार विहीरी, पाईपलाईन केली.
- कोणत्याही शासकीय योजनेची मदत न घेता ही कामगिरी. त्यांचे अनुकरण परिसरातील अनेक शेतकरी करत आहेत.

- सर्वसाधारण अर्थकारण
दुध उत्पादन : दररोज सुमारे 450 ते 500 लिटर (3.7 ते 3.8 फॅट व एसएनएफ 8.5)
उत्पादन खर्च : सुमारे 20 ते 22 रुपये प्रति लिटर
गेल्या वर्षीचे दुध उत्पादन (2015) : 1 लाख 75 हजार लिटर (46 गाई)
गेल्या वर्षीचे शेणखत उत्पादन (२०१५) : सुमारे 65 ट्रॅक्टर ट्रॉली
-----
संपर्क : रोहिदास डोके - 9860380005
(दुपारी 12 ते 2 उपलब्ध) 

No comments:

Post a Comment