Tuesday, December 30, 2014

उमेद बांधूया - डाॅ. रामचंद्र साबळे

निश्‍चिय करुया लढण्याचा...
---------
डॉ. रामचंद्र साबळे, जेष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ
---------
उंच दगडी इमारतींवर, किल्ल्यांवर, विहीरींच्या काठावर दगडांच्या फटीत पिंपळ आणि वडाची झाडे वाढताना आपण पाहतो. त्यांना कधी कोणी अन्न वा पाणी देत नाही. दुष्काळ असो की अवर्षण ती झाडे तग धरतात. जिवंत राहतात. पावसाचे थोडेफार पाणी मिळताच पुन्हा वाढतात. उन्हाळ्यात उन्हाचे तिव्र चटके, पाण्याविना गळणारी पाने सारे काही सहन करतात. मात्र जिवंत राहतात. अनुकूल स्थिती आली की पुन्हा वाढत राहतात. बिकट परिस्थितीवर, संकटांवर मात करणे आपण त्यांच्याकडून शिकूया. आत्महत्तेचा विचार हद्दपार करुया. नव्या उमेदिने नव्या जोमाने जिवण जगूया. निश्‍चयाने परिस्थिती बदलूया.

शेती व्यवसाय हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग भरभरुन देतो तेव्हाच शेतीची भरभराट होते. निसर्गात काही बदल झाल्यास त्याचे परिणामही नैसर्गिकपणे होतात. या सर्व बाबी समजून घेऊन शेती व्यवसाय करणे गरजेचे आहे. कितीही अडचणी आल्या, आपत्ती आल्या तरी त्यावर मात करीन असा निश्‍चय प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

टेन्शन, फस्ट्रेशन आणि डिप्रेशन या बाबी शेतकऱ्यांच्या नाहीत. त्यामुळे त्यांचा विचारही मनाला शिवू देण्याची गरज नाही. निसर्गाशी एकरुप होवून जगण्याची, त्यातून नवनिर्मिती करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. स्वतःबरोबरच इतरांसाठी अन्न, धान्य, चारा निर्मितीचे बहुमोल काम आपण करतोय. जगाचे खरे पोशिंदे आपण आहोत, त्यामुळे काही अडचण आली. संकटे आली तर खचून न जाता आपली क्षमता आणखी वाढविण्यावर भर द्यायला हवा. इतरांना जगविण्याचा वसा आपण घेतला आहे, मग आपण खचून कसे चालेल.

अडचणींमध्येही संधी शोधतो आणि त्या काबीज करतो तो यशस्वी होतो. शेतीत दररोज नवीन संधी असते. आपण या संधी शोधणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी नुकसान होताच मनात अविचार वाढवणे आणि स्वतःच बरंवाईट करणे या गोष्टी प्रथम हद्दपार कराव्यात. संत बहिणाबाई चौधरी यांनी... अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके, मग मिळते भाकर... असे म्हटलेच आहे. भाकरी मिळवतानाही हाताला बसणारे चटके सहन करावे लागतात. तसेच शेती करतानाही मनाला बसणारे चटके सहन करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. तसा निश्‍चय करण्याची वेळ आता आली आहे.

जेथे जेणे आळस केला तो सर्वस्वी बुडाला या उक्तीनुसार आळस झटका आणि नव्या उमेदीने, नव्या जोमाने नाविन्यपूर्ण शेती व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगा. तसा निश्‍चय करा. मनावर सर्व संसाराचे ओझे असले तरीही चित्त उदासिन होऊ देवू नका. नाविन्याने प्रेरित होऊन शास्त्रावर आधारीत शेती करा. नव्या उमेदीने अपार कष्ट करण्याचे, संकटे पचविण्याचे विचार मनात बाळगा. तुमच्या शेतीत नवनवीन संकल्पना राबवा, यश तुम्हाला साथ देईल.
--------- 

No comments:

Post a Comment