Tuesday, December 30, 2014

दुष्काळी ज्वारी, ठरेल उसाला भारी !

मोक्‍याच्या अवस्थेत संरक्षित पाण्यासाठी ठिबक सिंचन, योग्य अंतरावर लागवड व विद्राव्य खतांचा वापर या त्रिसुत्रीचा वापर केल्यास नफ्याच्या पातळीवर कोरडवाहू ज्वारीचे अवघ्या चार महिन्याचे पिक 16 महिन्यांच्या बागायती ऊस पिकालाही भारी पडू शकते याचे आदर्श पिक प्रात्यक्षिक शिरुर तालुक्‍यातील (जि.पुणे) कासारी गावचे प्रगतशील शेतकरी व भारतीय किसान संघाचे प्रांत कोषाध्यक्ष मधुकर (अण्णा) हरी टेमगिरे यांनी उभारले आहे. पुणे-शिरुर रस्त्यावरच हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे पिक सध्या ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.
------------
संतोष डुकरे
-------------
सुक्ष्म सिंचनाचे तंत्रज्ञान सर्वसाधारणपणे बागायती व नगदी पिके विशेषतः फळपिके व भाजीपाला यांच्यासाठीच वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यातही अन्नधान्य पिकांसाठी त्याचा वापर करण्याचे धाडस फार कुणी करत नाही. मात्र हे संरक्षित पाणीसाठ्याच्या बळावर हे धाडस दाखवले तर कोरडवाहू अन्नधान्य पिकंही नगदी व पुरेपुर मोबदला देणारे होऊ शकते हे टेमगिरे व त्यांच्या सहकार्यांनी उभारलेल्या प्रात्यक्षिकांवर सहज नजरेस भरते.

पीक सल्लागार केशव म्हस्के यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शनाखाली चालू हंगामात मधुकर टेमगिरे (कासारी), गजानन इंगळे (दहीवडी), भाऊसाहेब पळसकर (करडे) यांनी प्रत्येकी एक एकरावर तर गणेश काळे व सहकार्यांनी (निमोने) तीन एकरावर असे तालुक्‍यात एकूण सहा एकर क्षेत्रावर ठिबक सिंचनावर ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले आहे. सर्वांनी बाजारात सहज उपलब्ध असलेले सर्वसाधारण बियाणे (निर्मल सिड्‌स कंपनीचा सुवर्णा वाण) यासाठी वापरले आहे. हे सर्व शेतकरी भारतीय किसान संघाचे सदस्य आहेत. किसान संघामार्फत याच धर्तीवर सोलापूर, नांदेड व लातूर जिल्ह्यातही ज्वारी उत्पादकतावाढ प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.

- आधी प्रयोग मग प्रात्यक्षिके
शिक्रापूर परिसरात ठिबकवरील ज्वारीचे प्रात्यक्षिक घेण्याआधी सल्लागार श्री. म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन वर्षे 10 गुंठे क्षेत्रावर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात याबाबतचे प्रयोग घेण्यात आले. पहिला प्रयोग कर्जत तालुक्‍यातील कुळधरण गावात कांतीलाल गुंड यांच्या शेतात झाला. त्यात सुक्ष्म सिंचनाबरोबरच ज्वारीची रोपे नर्सरीत तयार करुन रोपांची पुर्नलागवड करण्यात आली. या प्रयोगात प्रति कणीस सरासरी 200 ग्रॅम उत्पादन मिळाले. दुसरा प्रयोग राळेगणसिद्धी गावातील सदाशीव मापारी यांच्या शेतात झाला. यात टोकण पद्धतीने लागवड व ठिबकचा वापर करण्यात आला. हा प्रयोग पाहण्यासाठी शिरुरमधील दौंडकर स्मारक समितीमार्फत श्री. टेमगिरे यांच्या नेतृत्वाखाली 40 शेतकऱ्यांची अभ्यास सहल नेण्यात आली. याप्रेरणेने टेमगिरे यांच्याच नेतृत्वाखाली शिक्रापूर परिसरातील चार गावांमध्ये चालू रब्बी हंगामात 6 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. श्री मस्के या प्रयोगाला दर आठ दिवसांनी भेट देवून मार्गदर्शन करतात. त्यांनी आखून दिलेल्या दिनक्रमानुसारच या प्रयोगाचे सर्व काम सुरु आहे.

- सर्व बाबींच्या काटेकोर नोंदी
टेमगिरे यांनी एक ऑक्‍टोबर 2014 रोजी एक बाय एक फुटावर एकेका बिजाची लागवड केली. ठिबकसाठी दोन ओळींमध्ये एक लॅटरल ठेवण्यात आली. यानंतर 17 व 18 ऑक्‍टोबरला नर्सरीतील रोपांचा वापर करुन गॅप फिलींग केले. पहिली प्रतिबंधात्मक फवारणी दोन नोव्हेंबरला तर दुसरी फवारणी सहा नोव्हेंबरला केली. दोन्ही फवारणीमध्ये सल्लागारांच्या सांगण्यानुसार किडनाशक, बुरशीनाशक व बायोझाईम यांचा एकत्रित वापर केला. दरम्यान 24 ऑक्‍टोबरला 10ः26ः26, युरीया व सुक्ष्म मुलद्रव्य खतांचा डोस दिला. यानंतर नोव्हेंबरच्या 2 ते 11 तारखेदरम्यान दररोज एक दिवसाआड प्रती दिवस पाच किलो याप्रमाणे 0ः52ः34 व युरिया आणि कॅल्शियम नायट्रेट विद्राव्य स्वरुपात ठिबक सिंचन संचातून दिले. पाठोपाठ एक दिवस पाच किलो झिंक सल्फेट विद्राव्य स्वरुपात दिले. दोन वेळा खुरपणी केल्या.

- रोपे तयार केली तर...
ज्वारीची रोपे तयार करुन त्यांची ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केल्यास एकसमान वाढ, उत्पादनक्षम ताटांची अधिकतम संख्या यामुळे उत्पादनात निश्‍चितच भरिव वाढ येत असल्याचे कर्जत येथे केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले. मात्र यात ज्वारीची रोपे तयार करण्यासाठी अतिरिक्त 20 हजार रुपये खर्च येतो. उत्पादन खर्चात होणारी ही वाढ टाळण्यासाठी कासारी येथील या प्रात्यक्षिकात रोपांऐवजी टोकण पद्धतीने ज्वारी लागवड करण्यात आली. एक एकरमध्ये किमान 30 ते 32 हजार रोपांपासून दर्जेदार उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. किसान संघ व इतर माध्यमातून राज्यातील अनेक शेतकरी व मान्यवरांनी आत्तापर्यंत या प्रात्यक्षिक क्षेत्राला भेट दिली आहे. या क्षेत्रातून एकरी किमान 40 क्विंटल ज्वारी उत्पादनाचा शेतकरी व तज्ज्ञांचा अंदाज आहे. पिक व कणसाचा आकार पाहता जास्तीत जास्त 50 क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळण्याची आशा आहे.

- उत्पादन खर्च एकरी 40 हजार
टेमगिरेंनी या प्रात्यक्षिकाच्या सुरवातीपासूनच काटेकोर नोंदी व हिशेब ठेवले आहेत. ठिबकवरील या ज्वारी उत्पादनासाठी जमीनीची पुर्वमशात म्हणजेच नागंरणी, रोटरणी, एक ट्रक शेणखत, लागवड, दोन खुरपण्या, दोन फवारण्या, ठिबक सिंचन साहित्य भाडे यापोटी आत्तापर्यंत 30 हजार रुपये खर्च झाले आहेत. कापणी, मळणीसह धान्य हाती पडेपर्यंत आणखी 10 हजार रुपये खर्चाचा अंदाज आहे. एकूण उत्पादन खर्च एकरी 40 हजार रुपयांच्या आत राहील, असे त्यांचे गणित आहे.

- उसाहून दुप्पट नफा शक्‍य
शिक्रापूर परिसरात शेतकऱ्यांना ऊस पिकापासून वार्षिक एकरी सरासरी 50 हजार रुपये नफा होतो. याऊलट सुक्ष्म सिंचन पद्धतीने एकट्या रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकापासून शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो असा दावा, टेमगिरे करतात. त्यांच्या गणितानुसार 40 क्विंटल ज्वारीपासून प्रति क्विंटल तीन हजार रुपये दराने एक लाख 20 हजार रुपये व चाऱ्यापासून सुमारे 20 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. उत्पादन खर्चाचे 40 हजार रुपये वजा जाता एक लाख रुपये निव्वळ नफा हाती राहू शकतो. शिवाय खरीप व उन्हाळी हंगामात पाणी उपलब्धतेनुसार शेतकरी इतर पिकेही घेऊ शकतात.
-----------
*प्रतिक्रीया
""गेल्या वर्षी 10 गुंठ्यावर प्रयोग झाला. यंदा तो सहा एकरवर आहे. या प्रात्यक्षिकांचे यश पाहून यापुढील काळात शेतकरी स्वतःहून या पद्धतीने उत्पादन घेतील. किसान संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व ज्वारी उत्पादक भागात प्रात्यक्षिके उभारण्याचा प्रयत्न आहे.''
- मधुकर टेमगिरे, प्रयोगशिल शेतकरी व प्रांत कोषाध्यक्ष, भारतीय किसान संघ

""टेमगिरे यांच्या ठिबकवरील ज्वारीच्या प्रयोगाचे निष्कर्ष प्रेरणादायी आहेत. कृषी विभागाने परिसरात 500 हेक्‍टरवर ज्वारी पिक प्रात्यक्षिके घेतली आहेत. या शेतकऱ्यांना हा प्रयोग दाखवून पुढील हंगामात या पद्धतीने ज्वारी उत्पादकतावाढीस चालना देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.''
- सुरेश जोशी, मंडळ कृषी अधिकारी, शिक्रापूर
-------------
संपर्क ः
मधुकर टेमगिरे - 9403722447, 9850099847
केशव म्हस्के - 9822075738
------------- 

No comments:

Post a Comment