Friday, December 19, 2014

आंबा फळपिक विम्यासाठी उरले फक्त 10 दिवस

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील आंबा पिकाला हवामानाधारीत फळपिक विमा योजनेतून विमा संरक्षण मिळविण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2014 ही आहे. पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची तर इतर शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. यातून 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत विविध हवामान घटकांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना हेक्‍टरी पाच हजार ते एक लाख रुपये भरपाई मिळणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष आहेत.

अवेळी पाऊस व तापमान या हवामान धोक्‍यापासून निश्‍चित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास ठरलेल्या प्रमाणात विमा कंपन्यांमार्फत भरपाई देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगळे निकष व वेगवेगळे विमा हप्ते लागू करण्यात आले आहेत. आंबा पिकासाठी नगरमध्ये 75 हजार रुपयांचे विमा संरक्षण असून त्यासाठी शासकीय अनुदान वजा जाता शेतकऱ्यांना हेक्‍टरी चार हजार 500 रुपये विमा हप्ता भरावा लागेल. पुणे व सोलापूर जिल्ह्यांसाठी एक लाख रुपयांचे विमा संरक्षण असून त्यासाठी अनुक्रमे सहा हजार रुपये व पाच हजार 750 रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना बॅंकेत भरावा लागणार आहे. नगरसाठी टाटा एआयजी, पुण्यासाठी इफ्कोटोकियो तर सोलापूरसाठी एडीएफसी आर्गो ही कंपनी विमा सेवा देणार आहे.

या योजनेमध्ये पिकाला धोकादायक हवामानघटक व नुकसानभरपाईची रक्कम ही निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यांमध्ये नुकसानकारक हवामान घटकाचे प्रमाण भरपाईसाठी वेगवेगळे आहेत. अवेळी पावसाच्या लाभासाठीसंरक्षित कालावधीत किमान पाच मिलीमिटरहून अधिक पाऊस होणे बंधनकारक आहे. नगरमध्ये किमान 2 दिवस, पुण्यात 3 दिवस तर सोलापूरात 4 दिवस दररोज पाच मिलीमिटरहून अधिक पाऊस झाला तरच नुकसान भरपाईपात्र ठरणार आहे. कमी तापमानासाठी सलग तीन दिवस 9 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी तापमान, जास्त तापमानासाठी (टप्पा अ) सलग तीन दिवस 39 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान तर जास्त तापमानासाठी (टप्पा ब) 43 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान सलग तीन दिवस असेल तर होणारे नुकसान भरपाईपात्र असेल. अधिकाधिक आंबा उत्पादकांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुण्याचे विभागिय अधिक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

*चौकट
- अशी आहे विमा संरक्षण
हवामान धोका --- संरक्षण कालावधी --- भरपाईची जास्तीत जास्त रक्कम (रुपये)
अवेळी पाऊस --- 1 जानेवारी ते 31 मे --- 30 हजार
कमी तापमान --- 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी --- 30 हजार
जास्त तापमान --- 1 मार्च ते 31 मार्च --- 25 हजार
जास्त तापमान --- 1 एप्रिल ते 31 मे --- 15 हजार
------------------ 

No comments:

Post a Comment