Wednesday, December 3, 2014

राज्यातील 35 लाख कोरडवाहू शेतकरी संकटात

निम्मा रब्बी नापेर; धान्य चारा टंचाईचा धोका

पुणे (प्रतिनिधी) ः दुष्काळग्रस्त भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा व जनावरांची चारासुरक्षा या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेला यंदाचा रब्बी हंगाम तब्बल निम्म्याने नापेर राहील्याने सुमारे 35 लाखाहून अधिक शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याची स्थिती आहे. सर्व रब्बी पिकांच्या पेरणीचा कालावधी आठ-पंधरा दिवसांपूर्वीच संपली आहे. त्यात आता गेल्या पंधरा दिवसात राज्यात कोठेही पाऊस झालेला नसल्याने ओलही उपलब्ध नाही. यामुळे तुरळक ठिकाणचे बागाईत वगळता तब्बल 30 ते 35 लाख हेक्‍टर रब्बी क्षेत्र नापेर व उत्पादनाच्या दृष्टीने खाटे राहणार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अन्नधान्य उत्पादन व जनावरांसाठी चारा या दोन्ही दृष्टीने रब्बी हंगाम महत्वाचा समजला जातो. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांना पुरेसा चारा साठवता आलेला नाही. त्यात आता रब्बीही नापेर व अनुत्पादक चालल्याने शेतकर्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली आहे. रब्बी पूर्णतः हातचा जाणार हे लक्षात आल्यानंतर आता संपूर्ण रब्बी पट्ट्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे विशेष.

कृषी आयुक्तालयाच्या सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी या वेळेपर्यंत राज्यात 42 लाख हेक्‍टरहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. यंदा फक्त 28 लाख 71 हजार हेक्‍टरवर पेरण्या झालेल्या आहेत. यातही तृणधान्य व कडधान्य पिकांचे क्षेत्र निम्म्याने तर तेलबिया पिकांचे क्षेत्र सद्यस्थितीत तब्बल 86 टक्‍क्‍यांनी घटलेले आहे. तृणधान्याचे 20 लाख 32 हजार हेक्‍टर, कडधान्याची सात लाख 76 हजार हेक्‍टर तर तेलबिया पिकांची फक्त 62 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकली आहे. सुर्यफुल पिकाची अवघे सहा टक्के, करडईची 15 टक्के तर गव्हाची 25 टक्के पेरणी झाली आहे. उगवण झालेली पिकेही पाण्याच्या ताणामुळे संकटात आहेत.

रब्बीला सर्वाधिक फटका पुणे विभागात बसलेला आहे. सरासरी 22 लाख हेक्‍टरपैकी एवघ्या 10 लाख हेक्‍टरवर पेरण्या झाल्या असून तब्बल 12 लाख हेक्‍टर क्षेत्र या विभागात नापेर आहे. पुणे जिल्ह्यात फक्त 25 टक्के रब्बी पेरण्या होऊ शकल्या आहेत. याशिवाय नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, वर्धा या जिल्ह्यांत रब्बीला मोठा फटका आहे. उर्वरीत जिल्ह्यांमध्येही जेमतेम क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या आहेत. नगर जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख 35 हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर कोकणात अद्याप रब्बी पेरण्या होवू शकलेल्या नाहीत. कोकण वगळता उर्वरीत भागात रब्बी पेरण्या अद्यापही सुरु असल्याचे आयुक्तालयाने म्हटले आहे.

जिल्हानिहाय रब्बी पेरणी हेक्‍टरमध्ये व कंसात पेरणीची सरासरीच्या तुलनेत टक्केवारी ः नाशिक 33300 (25), धुळे 20800 (34), नंदुरबार 29300 (42), जळगाव 66500 (44), नगर 435300 (55), पुणे 147300 (25), सोलापूर 475300 (57), सातारा 158800 (73), सांगली 210100 (84), कोल्हापूर 10100 (25), औरंगाबाद 79100 (30), जालना 114500 (53), बीड 215500 (57), लातूर 117600 (63), उस्मानाबाद 175600 (39), नांदेड 52300 (41), परभणी 67700 (21), हिंगोली 12900 (10), बुलडाणा 93800 (62), अकोला 43000 (37), वाशिम 47700 (53), अमरावती 64400 (44), यवतमाळ 42000 (48), वर्धा 9300 (17), नागपूर 52900 (37), भंडारा 19400 (48), गोंदिया 19700 (74), चंद्रपूर 38600 (32), गडचिरोली 18900 (73)

- पिकनिहाय रब्बी पेरणी (1 डिसेंबरपर्यंत)
पिक --- पेरणी (हेक्‍टर) --- सरासरीच्या तुलनेत टक्केवारी
ज्वारी --- 16,08,800 --- 52
गहू --- 2,96,700 --- 25
हरभरा --- 7,22,900 --- 55
मका --- 1,22,200 --- 123
करडई --- 31,700 --- 15
जवस --- 13,800 --- 28
सुर्यफुल --- 10,700 --- 6
तीळ --- 600 --- 17
------------------------ 

No comments:

Post a Comment