Thursday, December 18, 2014

उमेद बांधूया... डाॅ. सदानंद मोरे

कर्मयोगी व्हा, हे दिवसही जातील !
----------
डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य संमेलन
-----------
तत्वज्ञान सांगणे हे विचारवंताचे काम मानले जाते. पण तत्वज्ञानाचे आचरण करणे अशा पंडितांना जमेलच असे नाही. भगवदगितेत कृष्णाने कर्मयोग तत्वज्ञान सांगितले आहे. महाभारतात अनेक ठिकाणी त्याचा विस्ताराने उल्लेख आला आहे. त्यात गुढवाद वा श्रद्धा नाही तर ते पुर्णपणे बुद्धीवादी तत्वज्ञान आहे. कर्म करणे आपल्या हाती आहे. कर्माचे फळ आपल्या हाती नाही. कर्माचे फळ होण्यासाठी आणखी घटक लागतात. त्यावर आपले नियंत्रण नसते.

महाभारतात कृष्णाने कर्मयोग स्पष्ट करताना शेतकऱ्याचेच उदाहरण दिले आहे. शेतकरी जमीनीची मशागत करतो. चांगले बियाणे, चांगले खत वापरतो. मेहनत करतो. आवश्‍यक ते सर्व काही बरोबर करतो. पण एखाद्या वर्षी पाऊस पडत नाही. पिक येत नाही. मोठे नुकसान होते. पण अशा स्थितीतही शेतकरी हताश होत नाही. तो पुन्हा पेरणी करतो. शेतकरी हा स्वभावतःच कर्मयोगी आहे, असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. शेती हा व्यवसायच असा आहे की यश आपल्या हातात नाही. सर्व काही निसर्गावर अवलंबून आहे.

शेतकरी हा जन्मतः स्वभावतः कर्मयोगी आहे. कर्म करत राहून फळाची अपेक्षा करू नये. एखाद्या कर्माचे फळ मिळण्यासाठी अनेक घटकांचा समावेश असतो. एखाद्या वेळी अपेक्षेप्रमाणे काही मिळणार नाही, हे देखील गृहीत धरले पाहिजे. सर्वच काही आपल्या हातात नसते. दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांची मनोवृत्ती तयार केली पाहिजे. पुढाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे राजकीय भांडवल करणे योग्य नाही.

पावसाची अनिश्‍चितता ही अनादी काळापासून आहे. नापिकी किंवा दुष्काळ हा काही नवीन नाही, याची जाणीव ठेवावी. नैसर्गिक आपत्तीमुळे उद्वेग करू नये. निराश न होता परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. आपली शेती पावसावर अवलंबून आहे. कधी अपुरा पाऊस पडतो, तर कधी पडतच नाही. जेथे पाऊस पडतो तेथे पाणी वाहून जाते. 15 व्या शतकामध्ये दुर्गा देवीचा भीषण दुष्काळ आला होता. संत तुकाराम महाराज यांच्या काळातही दुष्काळ पडला होता.

दुष्काळे आटिले द्रव्य, नेला मान
स्त्री एक अन्न अन्न करीता मेली
या शब्दात तुकोबांनी भोगलेल्या दुष्काळातील कर्मयोग दाखवला आहे. दुष्काळ कुणाला चुकला नाही. तुकोबांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे. शेतकरी हा मुळतःच झुंजार असतो. निसर्गाशी लढण्याची ताकद अंगी असते. संकटाच्या काळात खचुन न जाता, वाईट विचार न करता श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगाचे आचरण करत ठामपणे उभे ठाकले पाहिजे. या अचडणीच्या काळावरही मात करता येईल. हे दिवसही जातील.
-----------
शब्दांकन ः संतोष डुकरे
----------- 

No comments:

Post a Comment