Tuesday, April 21, 2015

युरोप, अमेरिकेला साखर निर्यात खुली

निर्यात धोरणा सुधारणा; तत्काळ अंमलबजावणी सुरु

पुणे (प्रतिनिधी) ः युरोप व अमेरिकेत साखर निर्यात करण्यासाठी मुक्त व्यापार धोरण अवलंबायचा निर्णय परराष्ट्र व्यापार महासंचालक (डीजीएफटी) कार्यालयाने घेतला आहे. यासाठी देशाच्या साखर निर्यात धोरणात सुधारणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणीही तत्काळ सुरु करण्यात आली आहे. यानुसार आता देशातील कुठल्याही साखर कारखान्याला युरोप व अमेरिकेला साखर निर्यात करण्यासाठी इंडियन शुगर एक्‍झिम कॉर्पोरेशन लि. या संस्थेमार्फत त्यांनी दिलेल्या मर्यादेतच साखर निर्यात करण्याचे बंधन राहीलेले नाही.

साखर निर्यात धोरणातील कलम 93 मध्ये साखर निर्यातीबाबतच्या नियमावलीचा समावेश आहे. यापुर्वीच्या तरतुदीनुसार युरोप व अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांसाठी निर्यात खुली होती. फक्त निर्यात होणाऱ्या साखरेची नोंद परराष्ट्र व्यापार महासंचालकांच्या विभागिय कार्यालयांकडे करणे बंधनकारक होते. ही नियमावली कायम ठेवत युरोप व अमेरीकेसाठीची निर्यातही खुली करण्यात आली आहे.

अमेरिकेसाठीच्या आयातीच्या तुलनेत देशांतर्गत उत्पादनाला संरक्षण देणाऱ्या "टेरिफ रेट कोटा' पॉलिसीचा अवलंब करण्यात आला आहे. यासाठी निर्यातदाराला साखरेचे मुळ उत्पादन प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ ओरिजीन) व निर्यातीविषयीची सर्व माहिती (वजन, किंमत, अंतर, नाव, परदेशी खरिददाराचा पत्ता इ.) मुंबईतील अतिरिक्त महासंचालक, परराष्ट्र व्यापार यांना व अपेडा (नवी दिल्ली) यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

युरोपसाठी सीएक्‍सएल कोटा पद्धती अंतर्गत साखर निर्यात करण्यासाठी अपेडा मार्फत त्यांच्या स्वतंत्र मार्गदर्शक सुचनांनुसार कोटा निश्‍चित करुन देण्यात येणार आहे. याशिवाय निर्यात होणाऱ्या सारखेचे वजन, किंमत, अंतर, नाव, परदेशी खरिददाराचा पत्ता इ. सर्व माहिती अपेडाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठीचे मुळ उत्पादन प्रमाणपत्र मुंबईतील अतिरिक्त महासंचालक परराष्ट्र व्यापार यांच्यामार्फत देण्यात येईल.

याशिवाय सेंद्रीय साखर निर्यातीची सर्व निर्यातप्रणाली पुर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे. सेंद्रीय साखरेसाठी अपेडाचे प्रमाणपत्र बंधनकारक असून निर्यातीपुर्वी परराष्ट्र व्यापार महासंचालक कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. या सारखेच्या निर्यातीला प्रमाणाचे (क्वांटिटी) बंधन नाही. साखर निर्यात खुली आहे तोपर्यंत ही निर्यात सुरु ठेवता येईल, असे परराष्ट्र व्यापार महासंचालक कार्यालयाने म्हटले आहे.
-------- 

No comments:

Post a Comment