Monday, April 13, 2015

पंचनामा अवकाळीचा - भाग 2

"अवकाळी'ने घेतला
10 हजार कोटींचा घास

10 लाख हेक्‍टरला फटका; 33 ते 50 टक्‍क्‍यांत 4 लाख हेक्‍टर

संतोष डुकरे
पुणे ः राज्यात 28 फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत सुमारे 10 लाख हेक्‍टर क्षेत्राला बसला आहे. यापैकी सुमारे चार लाख हेक्‍टर क्षेत्राचे 50 टक्‍क्‍यांहून अधिक, तर चार लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये सुमारे तीन लाख हेक्‍टर फळपिके, तर पाच लाख हेक्‍टर रब्बी पिके आहे. उत्पादन, उत्पादकता, बाजारभाव, हमीभाव व उत्पन्नाचा विचार करता गेल्या महिनाभरात अवकाळीमुळे पिकांचे तब्बल 10 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यातील पीक नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे अपूर्ण असल्याने नुकसानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. मात्र, सुमारे चार लाख हेक्‍टरवरील पिकाचे 50 टक्‍क्‍यांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला आहे. यामध्ये सुमारे एक लाख 45 हजार हेक्‍टर फळपिके आहेत. उर्वरीत सुमारे सहा लाख हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान 50 टक्‍क्‍यांहून कमी आहे. यापैकी 33 टक्के क्षेत्र वगळता 67 टक्के म्हणजेच सुमारे चार लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान असल्याचा अंदाज आहे.

द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा, संत्रा, मोसंबी या फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उत्पादन व बाजारभावाचा विचार करता या पिकांपासून शेतकऱ्यांना सरासरी किमान एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. या हिशेबाने राज्यातील सुमारे तीन लाख हेक्‍टर फळबागांचे सुमारे सात हजार 500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

रब्बी पिकांमध्ये हरभरा पिकाला सर्वाधिक फटका बसला असून त्यापाठोपाठ गहू, ज्वारी आदी पिकांचे नुकसानही मोठे आहे. राज्याची सरासरी उत्पादकता, हमीभाव व बाजारभावाचा विचार करता हेक्‍टरी सरासरी किमान 45 हजार रुपये उत्पन्न गृहीत धरले, तर सुमारे दोन हजार 250 ते अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

केंद्र शासनाच्या सुधारित निकषानुसार कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक पिकांना अनुक्रमे 6800, 13 हजार 500 व 18 हजार रुपये मदत निश्‍चित झाली आहे. यानुसार राज्यातील 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यानच्या नुकसानग्रस्त चार लाख हेक्‍टरला सरासरी 13 हजार 500 रुपये मदत गृहीत धरली तरी यासाठी सुमारे 550 कोटी रुपयांची अतिरिक्त आवश्‍यकता भासणार आहे.

राज्यात 28 फेब्रुवारी व एक मार्चला 29 जिल्ह्यांत एक लाख 40 हजार हेक्‍टरवरील फळबागांसह तब्बल सात लाख 50 हजार हेक्‍टर क्षेत्राला अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. पालघर, सोलापूर, कोल्हापूर, बुलडाणा व वाशिम हे पाच जिल्हे या तडाख्यातून बचावले होते. मात्र, 8 ते 10 व 13 ते 15 मार्च या कालावधीत झालेल्या जोरदार गारपिटीने या जिल्ह्यांनाही मोठा तडाखा दिल्याने नुकसानग्रस्त क्षेत्र नऊ लाख हेक्‍टरहून पुढे सरकले. आता गेल्या आठवडाभरात झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने पीक नुकसानग्रस्त क्षेत्राचा आकडा 10 लाख हेक्‍टरला भिडल्याचा अंदाज आहे.

- महिना उलटला, पंचनामे संथगतीने
महाराष्ट्राबरोबरच अवेळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या अन्य काही राज्यांनी अंतिम पंचनामे पूर्ण करून केंद्राला माहिती सादर केली आहे. महाराष्ट्राला केंद्राने याबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, गारपिटीला महिना उलटून गेल्यानंतरही राज्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचा अंतिम अहवाल केंद्राला सादर झालेला नाही. याशिवाय, 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यान झालेल्या नुकसानीचे काय हा प्रश्‍नही अनुत्तरितच आहे. 

No comments:

Post a Comment