Saturday, April 11, 2015

पंचनामा अवकाळीचा - भाग 1

अवकाळीग्रस्त पिकांच्या
फेरपंचनाम्याची गरज

50 टक्‍क्‍यांच्या आतील नुकसानीची नोंदच नाही

पुणे (प्रतिनिधी) ः केंद्र सरकारने 33 टक्‍क्‍यांवरील पिक नुकसानीस मदत देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात झालेल्या पंचनाम्यांमध्ये 33 ते 50 टक्के यादरम्यान झालेल्या नुकसानीची नोंदच घेण्यात आलेली नाही. यामुळे आता शासनाच्या नवीन निर्णयानुसार राज्यातील नुकसानग्रस्त 10 लाख हेक्‍टरपैकी 50 टक्‍क्‍यांहून कमी नुकसान असलेल्या तब्बल सहा लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्राचे वस्तुस्थितीदर्शक फेरपंचनामे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आत्तापर्यंत राज्य व केंद्र सरकारमार्फत 50 टक्केहून अधिकचे नुकसान भरपाईस पात्र ठरत होते. यामुळे पंचनामा करताना समितीमार्फत 50 टक्‍क्‍यांच्या आतील नुकसानीची टक्केवारीच नोंदवलेच जात नाही. हीच पद्धत गेल्या दोन महिन्यात झालेल्या पंचनाम्यांच्या बाबत अवलंबण्यात आली आहे. पिकांच्या 33 ते 50 टक्‍क्‍यांदरम्यानच्या नुकसानीची पातळी नोंदविण्यात आलेली नसल्याची माहिती राज्यभरातील तलाठी व कृषी सहायकांनी दिली.

पंचनामा करताना संबंधीत क्षेत्राची महसूल नोंदीनुसार पडताळणी व माहिती देण्याची जबाबदारी तलाठ्याची, शेतकऱ्याची ओळख पटविण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची तर नुकसानीची तिव्रता ठरविण्याचे काम कृषी सहायकाचे असते. मात्र यात नुकसानीची तिव्रता कशा प्रकारे निश्‍चित करावी, याबाबतचे कोणतेही नियम किंवा मार्गदर्शक तत्वे कृषी खात्यामार्फत निश्‍चित करण्यात आलेली नाही. नजर अंदाजे केलेल्या पाहणीनुसार अंदाजेच नुकसान पातळी ठरवली जाते, अशी स्थिती आहे.

- निवडक पिकांचेच पंचनामे, इतर पिके मातीत
राज्यात फेब्रुवारी व मार्चमध्ये गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे अंतिम पंचनामे करताना अनेक ठिकाणी तहसीलदारांमार्फत सर्व पिकांच्या नुकसानीची नोंद न करता ठराविक पिकांचीच नोंद करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये फक्त गहू व कांदा या दोनच पिकाचे पंचनामे करण्यात आले आहे. तहसिलदारांच्या तोंडी सुचनांमुळे ऊस, कपाशी, चारा पिकांचे पंचनामे झाले नसल्याची माहिती येथील सरपंचांनी दिली.

*चौकट
- पंचनामे पारदर्शक करा
पंचनाम्याची सध्याची प्रक्रीया अधिक सुलभ व पारदर्शक करणे अत्यावश्‍यक आहे. यासाठी पंचनामा करणाऱ्या समितीत गावच्या सरपंचांचा समावेश बंधनकारक असावा, पंचनाम्यावर नुकसानीची टक्केवारी लिहीणे बंधनकारक असावे, त्यावर संबंधीत शेतकरी व सरपंचांची सही असावी आणि पंचनाम्याची प्रत संबंधीत शेतकऱ्याला देण्यात यावी, अशा मागण्या आहेत.

*कोट
""नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करताना 50 टक्केपेक्षा कमी वा जास्त अशा दोनच प्रकारात नोंद होते. जेवढे नुकसान असेल तेवढी टक्केवारी नोंदवली जात नाही. नुकसान पातळी ठरविण्याबाबत गाईडलाईन निश्‍चित करुन द्यावी, अशी मागणी मे 2014 मध्येच कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. मात्र अद्याप याबाबत काहीही सुचना मिळालेली नाही.''
- संदीप केवटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना
------------- 

No comments:

Post a Comment