Saturday, April 18, 2015

माझं गाव माझं शिवार - संतोष गाढवे

जावे पुस्तकांच्या गावा - संतोष डुकरे
--------------
पुस्तकाचे नाव - माझं गाव माझं शिवार
कवी - संतोष गाढवे (9049318656)
प्रकाशन - स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे
किंमत - 100 रुपये
पाने - 94
---------
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि मातीत मुरलेल्या कवी संतोष गाढवे यांचा हा कवितासंग्रह वास्तवाच्या पायावर शेती आणि शेतीशी संबंधीत सर्व बाबींच्या सुख दुःखाचा धांडोळा घेतो. कविता आणि गितांच्या माध्यमातून व्यक्त होत शेतकऱ्याचं जगणं मांडताना अत्यंत बारिक सारिक तपशीलासह बोलीभाषेत त्यांनी केलेला अविष्कार प्रत्येक रचनेत सुरवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. प्रत्येक लेखकाची व्यक्त होण्याची भाषा आणि पद्धत (फॉर्म) वेगवेगळा असतो. गाढवे यांची शैली मातीत मळलेली आणि शेत शिवारात घोळलेली आहे. शेतकऱ्यांचे रुजणे, बहरणे, उत्पादित होणे, कुटुंबाचे भावजिवन, स्त्रीजिवन ते शोषण, दारिद्य, फसवणूक आदी कांगोरे या कवितांमधून दाहकतेने व्यक्त झाले आहेत. त्यात परिस्थितीची हतबलता आहे, उदास सुर आहे आणि प्रसंगी जिवघेण्या रुढींशी, लादलेल्या गुलामीशी विद्रोह करण्याचा अंगारही आहे.

दूर दुष्काळात गाव
शिवार सुनासुना
पिकं वाळली झडली
नाही उगवला दाणा
उसतोड कवितेत त्यांनी या शब्दात मुळ प्रश्‍नाला हात घालत बळीराजा रंक होण्याचं सुत्र उलगडलं आहे. याच प्रकारे शेतकरी जिवनाचं वास्तव मांडण्याचे काम श्री. गाढवे यांनी या कवितासंग्रहात वारंवार केलं आहे. यात शेताच्या कपाळी हिरवा मळवट भरणारा बिलोरी श्रावण आहे. मातीच्या कुशीत देहभान हरपून जगणारा रानभैरी आहे. ऊन, वारा, पाऊस, नांगरणी, पेरणी, मशागत, पाखरु, बोरी, बाभळी, गाव, घर, यात्रा-जत्रा, सण, सुगी, धान्य ते धान्याची दारु असा धगीपासून धोरणापर्यंत शेतीचा सर्व पट यात आहे. बाप हाकतो उन्हा नांगर, तवा मिळते तव्यात भाकर हे जाण मांडतानाच त्याच कवितेत...

टंच भरलं कणीस
घरं भरती लुटारु
त्यानं पोसल्या दाण्याची
साले बनविती दारु
या शब्दात पिक काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, धोरणं आणि सद्यस्थिती यांचे वाभाडेही कवीने काढले आहे. त्यांच्या तावडीतून देवाच्या नावाखाली सुरु असलेली शेतकऱ्यांना लुटणारी दुकानदारी, बाजार व्यवस्थेमार्फत होणारे शोषण, भेदभाव, जातीपातीचे राजकारण ते अगदी शेतकरी तरुणांचे शेतीपासून भरकटणेही सुटलेले नाही. शेतकरी वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आल्यानंतर कुठलाही आडपडदा न ठेवता शेतकरी बाप या कवितेत ते म्हणतात...

उभ्या पावसात बाप चिंब भिजतो राबतो
माझ्या डोळ्यांत रोज तो नवं सपान बघतो

शिकून सवरुन असा नंदीबैल मी सजलो
वाण असून वशिल्याविना घरच्या दावणीला डांबलो
बाप माझा गावभर सारं सांगत सुटला
म्हणे पोरानं मला उभ्या जलमाचा गाडला

एकूणच शेती आणि शेतकरी जिवनाचे वेगवेगळे आयाम मांडणारा हा कवितासंग्रह आवर्जून वाचावा आणि अभ्यासावा असाच आहे.
---------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment