Monday, April 13, 2015

गारपीटीचा कहर सुरुच

पुणे (प्रतिनिधी) ः बुलडाणा, वाशिम, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, उस्मानाबाद, जालना व लातूर जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अनेक ठिकाणी रविवारी सायंकाळी व सोमवारी दिवसभरात वादळी वारे व पावसासह जोरदार गारपीट झाली. विदर्भावर वादळी पाऊस व गारपीटीचे सावट मंगळवारीही (ता.14) कायम राहण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा दिला आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी पाऊस झाला. पावसाबरोबर गारपीटीचे सत्रही सुरुच राहीले. सोमवारी सायंकाळपर्यंत पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्‍यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पाऊस व गारपीट झाली. नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस व गारपीट सुरु होती. मराठवाडा व विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत भर पावसाळ्यासारखा सर्वदूर पाऊस झाला आहे.

सर्वदूर होत असलेला पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे कमाल व किमान तापमानात सरासरीहून मोठी घट झाली असून राज्यात सध्या सुरु असलेला उन्हाळा हा ऋतू पूर्णपणे गायब झाल्यासारखी स्थिती आहे. दिवसभरात पुण्यात राज्यातील सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. किमान तापमान राज्यात बहुतेक ठिकाणी 19 अंश सेल्सिअसहून कमी होते.

मध्य प्रदेशच्या पश्‍चिम भागापासून महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंतच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. गुजरात व लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून 900 मिटर उंचीवर चक्राकार वारे सक्रीय आहेत. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशच्या भागातील चक्राकार वारे आणि पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा पट्टाही कायम आहे. यामुळे मंगळवारी राज्यातील पावसाची शक्‍यताही कायम आहे.

*चौकट
- वेधशाळांचे वेगवेगळे अंदाज
हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने मंगळवारी (ता.14) मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुणे वेधशाळेने मंगळवारी फक्त विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला असून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागपूर वेधशाळेने मंगळवारी विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिल्लीहून प्रसिद्ध केलेल्या अंदाजात फक्त विदर्भात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात राज्यातील प्रमुख ठिकाणी पडलेला पाऊस मिलीमिटरमध्ये ः
मध्य महाराष्ट्र ः सोलापूर 2, बार्शी 22, धुळे 6, म्हसवड 17, मुळंगी 28, वरणगाव 12, तळेगाव 14, कोरेगाव 32, रांजणगाव 11, वैराग 15, पानगाव 26, नारी 32, सुर्डी 19, नरखेड 39, माढा 16, मारवाडे 20, घोलेगाव 16, बोरगाव 15

मराठवाडा ः नांदेड 5, उस्मानाबाद 25, परभणी 3, नळवंडी 16, पाली 21, अंमळनेर 12, गेवराई 9, अंबेजोगाई 39, लोखंडी 40, घाटंदूर 40, बर्दापूर 35, केज 23, युसूफ 30, होळ 32, बनसारोळा 40, परळी 26, धर्मापूरी 23, नागापूर 22, मोहखेडा 32, तळेगाव 25, लातूर 26, हरंगुळ 36, तांदुळजा 25, किनगाव 26, मदनसुरी 30, रेणापूर 26, दावनी 26, जळकोट 46, बेंबळी 26, सावरगाव 35, मंगरुळ 40, ढोकी 32, नारंगवाडी 57, मकनी 35, येवती 22, मुक्रमाबाद 32,

विदर्भ ः जळगाव जामोद 64, अकोला 25, बुलडाणा 8, नागपूर 4, वर्धा 3, यवतमाळ 11, असलगाव 34, चिखली 42, इकलरा 44.2, हातनी 40, मेरा 43, रायपूर 53, पाडळी 35, साकळी 40, देऊळगाव 17, मेहकर 24, वरवंड 27, खामगाव 38, पिंपरी 25, शेंभा 25, हातरुन 50, दहीहंडा 46, आगर 40, हादगाव 32, रिसोड 32, करंजा 29, दारापूर 32, मोवड 42,
----------(समाप्त)---------- 

No comments:

Post a Comment