Wednesday, April 8, 2015

आझादपूर मार्केट स्टोरी


राष्ट्रीय महत्वाचा
आझादपूर बाजार
-------------
दिल्लीतील चौधरी हिरा सिंह फळे व भाजीपाला बाजाराची (आझादपूर मार्केट) लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये फळे व भाजीपाला वितरणाचे जगातील सर्वात मोठे केंद्र म्हणून नोंद झाली आहे. राष्ट्रीय महत्वाचा बाजार (मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून दर्जा असलेला हा देशातील एकमेव बाजार आहे. देशभरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या हा बाजार अतिशय महत्वाची भुमिका बजावतो. शेतकऱ्यांना विना कमिशन, विना शुल्क सेवा हे या बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
------------
संतोष डुकरे
------------
देशांतर्गत बाजारपेठेच्या दृष्टीने दिल्लीचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान हे आझादपूर मार्केटचे सर्वात मोठे बलस्थान आहे. याच्या जोडीला बाजारातील आदर्शनगर रेल्वे स्थानक, थेट बाजारात रेल्वेने माल घेवून जाण्याची सुविधा, रस्ते, महामार्ग, बस व्यवस्था आणि मेट्रो रेल्वेचे जलदगती जाळे यामुळे या बाजाराची कनेक्‍टिव्हिटीही (विविध घटकांशी असलेली जोडणी) अतिशय व्यापक आहे. यामुळे काश्‍मिरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी फळे व भाजीपाल्याची आवक होते. खरिददारांमार्फत येथे खरेदी झालेल्या मालाची देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही रवानगी केली जाते. महाराष्ट्राच्या दृष्टीने कांदा, बटाटा, टोमॅटो, द्राक्ष, डाळींब आदी पिकांच्या दृष्टीने हा बाजार अतिशय महत्वपूर्ण आहे.

आझादपूर मार्केटची स्थापना 1977 साली झाली. ओखला फळे व भाजीपाला बाजार, केळी बाजार आझादपूर, मंगोलपुरी फळे व भाजीपाला बाजार हे या बाजाराचे तीन उपबाजार आहेत. तिखरी खामपूर व ओखला बाजारांसह तब्बल 170 एकर क्षेत्रावर हा बाजार विस्तारलेला आहे. दी दिल्ली ऍग्रीकल्चर प्रोड्युस मार्केटींग (रेग्युलेशन) ऍक्‍ट 1998 व जनरल रुल्स 2000 नुसार या बाजाराचा कारभार चालतो. दिल्लीने अद्याप मॉडेल ऍक्‍ट स्विकारलेला नाही. यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करता येत नाही. मात्र बाजाराबाहेर दिल्लीत कुठेही शेतकऱ्यांनी शेतमालाची थेट विक्री केल्यास दिल्ली कृषी पणन मंडळामार्फत त्यास सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष व आझादपूर मार्केटचे अध्यक्ष व्ही. पी. राव यांनी दिली.

बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांसह विविध बाजार घटकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी पाणपोई आहेत. ही सिस्टीम बदलून लवकरच "वॉटर एटीएम सिस्टिम' सुरु करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी भव्य किसान भवन उभारण्यात आले आहे. या ठिकाणी 150 रुपयांपासून विविध दरात विविध प्रकारच्या निवासी सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. (त्यांचा दर्जा सुमार आहे, स्वच्छता नाही, भोजनालयात अनेकांचे मद्यपान सुरु असते... हा भाग वेगळा). बॅंकांची सुविधाही बऱ्यापैकी आहे.

- इलेक्‍ट्रॉनिक व डिजीटल वजन काटे
फळे व भाजीपाला बाजारात बहुतेक व्यापारी इलेक्‍ट्रॉनिक व डिजीटल वजनकाटे वापरतात. कांदा बटाटा विभागात साधे काटेही वापरण्यात येत आहेत. त्यांचे मोजमाप घेताना मणाच्या (40 किलो) पुढची वजने घोषित केली जातात. उदा. मापारी 12 असे ओरडला तर ते 52 किलो असे मांडले जाते. दोन असे ओरडला तर 42 किलो. गाडी खाली होतानाच वजन केले जाते. शेतकऱ्यांना हमाली (प्रति गोणी 6 रुपये) व वाहतूक भाडे द्यावे लागते. या दोन बाबींव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारचे शुल्क शेतकऱ्यांकडून आकारण्यात येत नाही.

- नियमित रासायनिक उर्वरित अंश तपासणी
दिल्ली कृषी पणन मंडळाने फळे व भाजीपाल्यातील रासायनिक उर्वरित अंशाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र "स्टेट ग्रेडींग लॅबोरेटरी' स्थापन केली आहे. या प्रयोगशाळेत बाजार समितीत दाखल होणाऱ्या फळे व भाजीपाल्याचे नमुने दरमहा नियमितपणे तपासण्यात येतात. त्यात 28 प्रकारच्या किटकनाशकांच्या अंशांची तपासणी केली जाते. याबाबतचे अहवालही बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतात. गेल्या काही महिन्यातील अहवाल पाहतात या तपासणीत नमुने दोषी आढळण्याचे प्रमाण नगण्य आहे.

- शेतकऱ्यांना निशुल्क सेवा
जानेवारी 2014 पर्यंत दिल्लीतील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून अडत वसूल करण्यात येत होती. मात्र याविषयी दिल्ली सरकार व इतरांविरुद्ध हिमाचल प्रदेश कृषी पणन मंडळाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने 6 टक्के अडत खरिददारांकडून वसुल करावी, शेतकऱ्यांकडून अडत वसुल करु नये असा निर्णय दिला. या निर्णयाची अंमलबजावणी 24 जानेवारी 2014 पासून दिल्लीतील सर्व बाजारांमध्ये करण्यात येत आहे. याशिवाय अडत्यांकडून एकूण विक्रीच्या एक टक्के बाजार शुल्क बाजार समितीमार्फत वसुल केले जाते. शेतकऱ्यांकडून खरेदी विक्री विषयक कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.

- ना खुला लिलाव, ना भाव फलक
बाजार समितीमार्फत लिलावासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्या तरी अडत्यांमार्फत खुला लिलाव केला जात नाही, अशी स्थिती आहे. प्रत्येक अडत्याचे काही ठरावीक खरेदीदार आहेत. ते सकाळीच खरेदीला येतात, आणि जसे येतील तसा त्यांना शेतमाल थोडीफार घासाघिस करुन विकला जातो. विक्री करताना सहा टक्के अडत मिळवूनच किंमत ठरवली जाते. बाजारभाव जाहिर करणारे फलक बाजारात कुठेच नाही. दिवसभरात होणारी खरेदी विक्रीचे दर व इतर माहिती बाजार समितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. मुळात या बाजारातील सर्व व्यवहार अडते व खरिददारांमार्फत होत असल्याने शेतकरी शोधूनही सापडत नाहीत, अशी स्थिती आहे. किसान शेड नावाने शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा दिल्याचे दाखवले असले तरी हे सर्व लोक मुळचे शेतकरी मात्र सध्या पूर्णतः अडते असल्याचे बाजाराचे अध्यक्ष श्री. राव यांनी मान्य केले.

- कचऱ्याची मोठी समस्या
फळे व भाजीपाला बाजारात दररोज प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात बाजार समिती सध्या सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. बाजारात ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिग सडत, धुपत पडलेले असतात. याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात दाटून राहीलेली आहे. यामुळे नाकाला सवय होईपर्यंत बाजारात थांबणे मुश्‍किल होते. दररोज सुमारे सहा हजार वाहणे बाजारात येत असल्याने वाहतूकीची कोंडीची समस्याही मोठी आहे. जागेअभावी वाहतूक कोंडी व कचऱ्याची समस्या पूर्णपणे संपवणे शक्‍य झालेले नाही. परंतू या सर्व कचऱ्यांपासून खत निर्मिती प्रकल्पही विचाराधीन असल्याचे श्री. राव यांनी सांगितले.

- महाराष्ट्र पणन मंडळाचे दुर्लक्ष
हिमाचल प्रदेशसह काही राज्यांनी आझादपूरमध्ये त्यांच्या शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यालये सुरु केली आहेत. शेतकरी प्रशिक्षणापासून बाजारातील अडचणी सोडविण्यासाठी या कार्यालयामार्फत सहकार्य केले जाते. हिमाचल प्रदेशच्या पणन मंडळाने शेतकरी हित रक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल करुन शेतकऱ्यांकडून अडत घेण्यास बंदी घालण्यात मोलाची भुमिका बजावली. तुलनेत दुबई स्वतंत्र कार्यालय सुरु करणाऱ्या महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने देशातील सर्वात महत्वाच्या बाजारपेठांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. राज्यातील कांदा उत्पादकांना आझादपूर मार्केटमध्ये कांदा विकण्यासाठी नाफेडने सुविधा उपलब्ध केली आहे. नाफेडच्या नाशिक येथिल कार्यालयामार्फत किंवा थेट दिल्लीतील कार्यालयामार्फतही यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले जाते. हा अपवाद वगळता राज्यातील शेतकऱ्यांना आझादपूर मार्केटमध्ये राज्यातील कोणत्याही शासकीय यंत्रणेचा पाठींबा नाही.

- अडत्यांचे वॉट्‌सअप नेटवर्क
येथिल बाजारातील अडत्यांनी पिकनिहाय वॉट्‌सअपचे गृप तयार केले आहेत. यामध्ये त्या त्या पिकाच्या देशभरातील प्रमुख अडत्यांचा समावेश आहे. ओनियन इंडिया या वॉट्‌सअप गृपवर आझादपूरमधील प्रमुख अडत्यांसोबत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील कांदा पिकाच्या अडत्यांचा समावेश आहे. हे सर्वजन मार्केट सुरु झाल्यापासून संपेपर्यंत वेळोवेळी आपापल्या बाजारातील कांदा विक्रीचे दर फोटो, लिलावाचे व्हिडीओ अपलोड करत असतात. बोली सुरु असतानाच मोबाईलवर बाजारभाव तपासण्याचेही काम सुरु असते. तेजी मंदी ठरविण्यापासून दर वाढवणे पाडणे या सर्वांसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

- रेल्वेमार्फत कार्गो सेंटर
आझादपूर बाजारात दाखल होणाऱ्या केळी, आंबा आदी फळांसाठी भारतीय रेल्वे व कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत येथिल केळी बाजारात आदर्श नगर रेल्वे स्थानकाच्या मालगाड्यांसाठीच्या फलाटाशेजारी केळी बाजारात अत्याधुनिक पेरिशेबल कार्गो सेंटर नुकतेच उभारण्यात आले आहे. त्यात प्रत्येकी 100 टन क्षमतेची दोन शितगृहे आणि प्रत्येकी 20 टन क्षमतेची 12 पिकवणगृहे यांचा समावेश आहे. या सेंटरचे उद्घाटन नुकतेच रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते झाले आहे. येत्या महिनाभरात निविदा प्रक्रीया पूर्ण होवून हे केंद्र केळी, आंबा पिकवण व साठवणूकीसाठी उपलब्ध होणार आहे.

- खासगी पिकवणगृहे, शितगृहे
आझादपूर मार्केटच्या भोवती खासगी पिकवणगृहे व शितगृहांचे जाळे उभे राहीले आहे. याशिवाय दिल्ली व हरियाणाच्या सिमावर्ती भागातही गोदामे व शितगृहांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. एक महिन्यासाठी 13 ते 15 टन क्षमतेसाठी 45 ते 50 हजार रुपये या दरम्यान पिकवण व शितगृहाचे दर आहेत. या कालावधीत केळीचे सहा ते सात ट्रक पिकवून वितरीत केले जातात. द्राक्षासाठी चार किलो बॉक्‍ससाठी 12 रुपये व पाच किलो बॉक्‍ससाठी 15 रुपये दरमहा याप्रमाणे दर आकारण्यात येत असल्याचे येथिल एका शितगृहाचे व्यवस्थापक राजेश नामबोर्डी यांनी सांगितले.
-----------
*कोट
""प्रचंड आवक व त्या तुलनेत जागा उपलब्ध नसल्याने आझादपूरमध्ये सोईसुविधा उपलब्ध करण्यात, गर्दी आणि वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यात अडचणी आहेत. मात्र शेतकऱ्यांसाठी पारदर्शक व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी न करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीस प्राधान्य देत आहोत.''
- व्ही. पी. राव, उपाध्यक्ष, दिल्ली कृषी पणन मंडळ
अध्यक्ष, आझादपूर फळे व भाजीपाला बाजार
------------
*कोट
""रेल्वे मंत्रालयामार्फत उभारण्यात आलेले देशातील सर्वात अत्याधुनिक शितगृह व पिकवणगृह या सुविधेचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. निविदा प्रक्रीया पार पडल्यानंतर येत्या महिनाभरात ही सुविधा शेतकऱ्यांना माफक उपलब्ध होईल. देशभरातील केळी व आंबा उत्पादकांना या सुविधेचा मोठा लाभ होऊ शकतो.''
- एम. एल. अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, पेरिशेबल कार्गो सेंटर, केळी बाजार, आझादपूर
------------
बाजाराची वैशिष्ट्ये...
- सफरचंद, केळी, आंबा, बटाटा, कांदा व टोमॅटो ची सर्वाधिक उलाढाल
- दररोज एक लाखाहून अधिक लोक मार्केटमध्ये ये जा करतात.
- देशभरातून शेतमालाची आवक व देशभर शेतमालाचे वितरण
- 6 टक्के अडत खरिददारांकडून व 1 टक्के बाजार शुल्क अडत्यांकडून
- परिसरात खासगी कंपन्यांची गोदामे, शितगृहे, पिकवणगृहे उपलब्ध
- रस्ते व रेल्वेचे मालवाहतूकीसाठी प्रभावी यंत्रणा, बाजारात रेल्वे स्टेशन
-------------
*चौकट
- असा आहे आझादपूर फळे व भाजीपाला बाजार
क्षेत्र - 53.63 एकर, सिमेंट गोदामे - 7 एकर, मोठी दुकाने 488, लहान दुकाने 1146, लिलाव शेड 25, नोटीफाईड फळे - 50, नोटीफाईड भाजीपाला - 68, कमीशन एजंड (अडत्या) - 2320, होलसेल ट्रेडर्स (खरिददार) - 1695, शेतकरी विक्रेते - 129, शितगृह (खासगी मालकी) - 7, बॅंका - 8
-------------
*चौकट
- आझादपूर बाजारातील वार्षिक उलाढाल टन (उपबाजारांसह)
आर्थिक वर्ष --- फळे --- भाजीपाला --- एकूण
2013-14 --- 21,78,305.6 --- 24,07,007.1 --- 45,85,312.7
2012-13 --- 21,67,232.7 --- 24,51,344.8 --- 46,18,577.5
2011-12 --- 21,24,797.4 --- 23,78,879.3 --- 45,03,676.7
2010-11 --- 22,92,619.6 --- 22,39,825.8 --- 45,32,445.4
2009-10 --- 20,41,758.3 --- 21,79,323.8 --- 42,21,082.1
-----------
*चौकट
- शेतमाल वाहनांची सरासरी आवक (2012-13)
वाहन --- भरलेले -- रिकामे --- एकूण
ट्रक --- 545 --- 187 --- 732
टेम्पो --- 946 --- 1914 --- 2860
छोटी, रिक्‍क्षा --- 57 --- 2051 --- 2108
एकूण --- 1548 --- 4152 --- 5700
--------------
*चौकट
- बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न (कोटी रुपये)
2013-14 --- 113.30
2012-13 --- 120.52
2011-12 --- 106.86
2010-11 --- 90.14
2009-10 --- 87.58
---------(समाप्त)----------


















No comments:

Post a Comment