Friday, April 17, 2015

सिसकॉफची मॉन्सून बैठक ढाक्‍यात

पुणे (प्रतिनिधी) ः साऊथ एशियन क्‍लायमेट आऊटलूक फोरम (सिसकॉफ) ची सहावी बैठक रविवारपासून (ता.19) बांग्लादेशातील ढाका येथे सुरु होणार आहे. दुष्काळ, पाणी आणि नैऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) अंदाज हे या बैठकीचे विषय असून त्यात दक्षिण आशियासाठीचा जून ते सप्टेंबर 2015 या कालावधीसाठीचा मॉन्सून पावसाचा अंदाज जाहिर करण्यात येणार आहे.

अफगाणिस्तान, बांग्लादेश, भुतान, भारत, मालदिव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका या देशांचे हवामानशास्त्र विभाग, दक्षिण आशिया पातळीवरील हवामानविषयक संस्था व निवडक वापरकर्ते (शेतकरी इ.) यांचा या बैठकीत समावेश आहे. यावेळी हवामान अंदाज विषयक कौशल्यवृद्धी आणि दुष्काळ या दोन विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रमही पार पडणार आहेत.

सर्व दक्षिण आशियायी देशांची अर्थव्यवस्था मॉन्सूनवर अवलंबून आहे. या अनुषंगाने मॉन्सून पावसावर विविध घटकांवरील परिणाम, त्यातील बदल आणि मॉन्सून पाऊस याविषयी अचूक अंदाज व्यक्त करण्याच्या दृष्टीने जागतीक हवामान संस्थेच्या (डब्लूएमओ) पुढाकाराने हा फोरम स्थापन करण्यात आलेला आहे. त्यात भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
--------------- 

No comments:

Post a Comment