Thursday, April 23, 2015

इस्राईलयच्या अभ्यास सहलीसाठी शेतकरी रवाना

ऍग्रोवन-केसरीतर्फे आयोजन; दौऱ्यात ऍग्रीटेक कृषी प्रदर्शनाचा सहभाग

पुणे (प्रतिनिधी) ः इस्राईलमधील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि ऍग्रीटेक आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळ-ऍग्रोवन व केसरी टुर्स यांचा 32 शेतकऱ्यांचा गट गुरुवारी (ता. 23) इस्राईलला रवाना झाला. 28 व 29 एप्रिल रोजी येथे जागतिक पातळीवरील ऍग्रीटेक हे कृषी प्रदर्शन होत आहे. याकरिता ऍग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण व उपसरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले हेही या सहलीत सहभागी आहेत.

ऍग्रोवनमार्फत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय कृषी सहली हा या उपक्रमांचाच एक भाग असून, यंदा इस्राईलमधील कृषी ज्ञान तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी राज्यभरातील शेतकरी, संडे फार्मर, कृषी उद्योजक, अभ्यासक या सहलीत सहभागी झाले आहेत. केसरी ट्रॅव्हल्स मार्फत सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.

इस्राईलच्या शेतीविषयी, पाणी वापराविषयी आत्तापर्यंत खूप ऐकले आहे. त्यामुळे तिथली शेती पाहण्याची, शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची आणि आपल्या उपयोगाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसाद करून स्वतःच्या शेतावर त्याची अंमलबजावणी करण्याच्या इच्छेने ऍग्रोवनसोबत या सहलीत सहभागी झालो आहोत. ऍग्रोवन आणि केसरी या कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील दिग्गजांसोबत जगातले सर्वोत्कृष्ट कृषी तंत्रज्ञान पाहता येणार असल्याचा आनंद आहे, अशी भावना सुभाष महाले (नाशिक), शिवराम विरमकर (पुणे), दिपक पांढरे, डॉ. शाम बाभुळकर, निर्मला शेंबेकर आदींनी व्यक्त केली.

- प्रदर्शन आणि भेटी
सहा दिवसांच्या दौऱ्यात सहभागी शेतकरी तज्ज्ञांसोबत इस्राईलमधील काटेकोर पाणीवापर, गुणवत्तापूर्ण फळे, भाजीपाला व पीक उत्पादन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, हरितगृह आदी विषयक अद्ययावत तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवून आत्मसाद करणार आहेत. याशिवाय, इस्राईलमधील जागतिक वारसा म्हणून घोषित झालेली ठिकाणे, मृत समुद्र आदी पर्यटन स्थळांनाही भेटी देण्यात येणार आहेत.
----------------
""इस्राईल कोल्हापूर, सांगलीहूनही छोटा देश असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी शेतीत भारताहून खूप मोठी झेप घेतली आहे. फळे, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, सिंचन, पाण्याचा पुर्नवापर आदी विषयक माहिती या दौऱ्यात शेतकऱ्यांना सखोलपणे अभ्यासता येईल.''
- आदिनाथ चव्हाण, संपादक, ऍग्रोवन 

No comments:

Post a Comment