Wednesday, April 22, 2015

दक्षिण आशियात सर्वत्र यंदा कमी पाऊस

एल निनोचा फटका शक्‍य; क्‍लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः दक्षिण आशियातील सर्व देशांमध्ये येत्या जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरममार्फत (एसएएससीओएफ-6) व्यक्त करण्यात आला आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश या देशांमध्ये कमी पाऊस पडण्याची सर्वाधिक शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. फोरममार्फत गेल्या वर्षीही सरासरीहून कमी ते सरासरीएवढ्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारताचा हिमालयीन भाग, केरळ, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल व ईशान्येकडील सर्व राज्ये, बांगलादेश, म्यानमार, अंदमान निकोबार व मालदीव या भागात यंदा सरासरीहून अधिक प्रमाणात मॉन्सून बरसण्याची शक्‍यता अधिक आहे. भारतात राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये सरासरीहून कमी पावसाची शक्‍यता अधिक असल्याचे फोरमने प्रसिद्ध केलेल्या अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या मॉन्सून पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील मॉन्सून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियायी देशांच्या फोरमची सहावी बैठक बांगलादेशातील ढाका येथे सुरू आहे. या बैठकीत दोन दिवसांच्या माहिती विश्‍लेषण व विचारमंथनानंतर हा अंदाज जाहीर करण्यात आला. भारतासह सर्व दक्षिण आशियायी देशांतील राष्ट्रीय व विभागीय पातळीवरील हवामान विषयक संशोधन संस्था या बैठकीत सहभागी झाल्या आहेत.

जगभरातील हवामान स्थिती, विविध मॉडेलमार्फत व्यक्त करण्यात आलेले अंदाज व प्रशांत महासागरातील सौम्य एल निनोची सद्यःस्थिती या बाबी विचारात घेता दक्षिण आशियामध्ये येत्या मॉन्सूनमध्ये सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस राहील याबाबत बैठकीत सहभागी सर्व शास्त्रज्ञांचे एकमत झाले. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती असली तरी ती सौम्य असली तरी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाच्या प्रमाणावर परिणाम होईल, यावरही तज्ज्ञांचे एकमत झाले. मॉन्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्‍यता 70 टक्के आहे. मॉन्सून काळात सुरवातीला सौम्य राहून अखेरच्या टप्प्यात त्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली.

मॉन्सून काळात हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान व इतर संलग्न घटक मॉन्सूनला अनुकूल राहण्याची शक्‍यता आहे. उत्तर गोलार्धातील बर्फाचे प्रमाण सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये सरासरीहून अधिक, डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये ते सरासरीच्या किंचित कमी होते. तर मार्चमध्ये त्यात सरासरीहून घट झाली. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील बर्फाचे प्रमाण व आशियातील मॉन्सून यांच्यात नकारात्मक किंवा परस्परविरोधी संबंध आहे. यासह इतर घटकांच्या गेल्या काही महिन्यातील प्रभाव हा अंदाज देताना विचारात घेण्यात आल्याचे फोरममार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
-------------- 

No comments:

Post a Comment