Monday, April 13, 2015

तयारी खरिपाची - भाग 3

खरिपात पेरणीसाठी
17 लाख टन बियाणे

गरजेएवढ्या उपलब्धतेचा कृषी विभागाचा दावा

*कोट
""राज्यात यंदा मागणी व गरजेपेक्षा अधिक प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार आहे. यामुळे बियाण्याची टंचाई जाणवण्याची शक्‍यता नाही.''
- विकास देशमुख, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य

पुणे (प्रतिनिधी) ः येत्या खरिप हंगामासाठी विविध पिकांच्या बियाणे बदलाच्या दरानुसार राज्याला 16 लाख 64 हजार 114 क्विंटल नवीन बियाण्याची आवश्‍यता आहे. प्रत्यक्षात महाबीज, राष्ट्रीय बीज निगम व खासगी कंपन्यांमार्फत 17 लाख 10 हजार 920 क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षात नवीन बियाणे वापरलेल्या सोयाबीन उत्पादकांनी यंदा घरचेच बियाणे पेरावे यासाठी कृषी विभागामार्फत मोहीम राबविण्यात येणार आहे.

खरिपासाठी आवश्‍यक बियाण्यापैकी सर्वाधिक 10 लाख 38 हजार 328 क्विंटल बियाणे खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणार आहे. महाबीजमार्फत पाच लाख 54 हजार 552 तर राष्ट्रीय बिज निगममार्फत एक लाख 18 हजार 50 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाबिजमार्फत 20 हजार क्विंटल आणि बीज निगममार्फत 50 हजार क्विंटल जादा तर खासगी कंपन्यांमार्फत दोन लाख 30 हजार क्विंटल कमी बियाणे बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे.

कृषी आयुक्तालयामार्फत राज्यातील सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करुन सर्वांकडून हंगामासाठीच्या बियाणे उपलब्धतेचे व पुरवठ्याचे नियोजन घेण्यात आले आहे. या नियोजनानुसार बियाणे उपलब्ध करणे कंपन्यांना बंधनकारक आहे. यानुसार उत्पादकांमार्फत खरिपासाठीचा बियाणे पुरवठा नुकताच सुरु झाला आहे. येत्या महिन्यात बहुतांश पुरवठा पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

गेल्या खरिपात राज्यासाठी 17 लाख 14 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले होते. मात्र पावसाने दगा दिल्याने प्रत्यक्षात 11 लाख 94 हजार क्विंटल बियाण्याचा वापर झाला. यंदा सर्व पिकांचे बियाणे मागणीच्या व बियाणे बदलाच्या दराहून अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने बियाण्याची कमतरता जाणवणार नाही, अशी माहीती कृषी आयुक्तालयामार्फत देण्यात आली.

- सोयाबीन बियाणे स्थिती
राज्यात गेल्या वर्षी 38 लाख हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यावर बियाणे बदलासाठी सहा लाख 84 हजार 928 क्विंटल नवीन बियाण्याचा वापर करण्यात आला. यंदा सोयाबीनचे 10 लाख 36 हजार क्विंटल म्हणजेच गेल्या खरीपाच्या वापराच्या सुमारे साडेतीन लाख क्विंटल जादा बियाणे उपलब्ध होणार आहे. याशिवाय गेल्या तीन वर्षात नवीन बियाण्याचा वापर केलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरावे यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

*चौकट
- बियाण उपलब्धता (खरीप 2015)
पिक --- अपेक्षित क्षेत्र (लाख हेक्‍टर) --- बियाणे गरज (क्विंटल) --- उपलब्धता (क्विंटल)
संकरीत ज्वारी --- 9 --- 67,500 --- 68,325
सुधारीत ज्वारी --- 1.37 --- 2,603 --- 2,650
संकरीत बाजरी --- 9 --- 22,500 --- 23,240
सुधारीत बाजरी --- 2.45 --- 7,840 --- 7,930
भात --- 14.92 --- 2,05,896 --- 2,11,513
मका --- 7.87 --- 1,18,050 --- 1,29,100
तुर --- 11.83 --- 62,108 --- 63,338
मुग --- 5.34 --- 28,035 --- 26,071
उडिद --- 4.47 --- 33,525 --- 34,882
भूईमुग --- 2.98 --- 17,880 --- 18,625
तीळ --- 0.70 --- 928 --- 1,114
सोयाबीन --- 39 --- 10,23,750 --- 10,36,515
बी.टी. कापूस --- 40 --- 72,000 --- 86,017
सुधारीत कापूस --- 0.50 --- 1,500 --- 1,600
एकूण --- 149.43 --- 16,64,114 --- 17,10,920

(बियाण्याची गरज संबंधीत पिकातील बियाणे बदलाच्या दरानुसार)
-------- 

No comments:

Post a Comment