Wednesday, January 15, 2014

विदर्भात पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) ः ढगाळ हवामान व हवेत वाढलेली आर्द्रता यामुळे शुक्रवार (ता. 17)पर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळलेले, तर आर्द्रता, कमाल व किमान तापमान सरासरीहून अधिक राहण्याची शक्‍यता आहे.

बुधवारी (ता. 15) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नाशिक येथे सर्वांत कमी 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमान सरासरीहून किंचित घटलेले होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीहून अधिक तर राज्याच्या उर्वरित भागात ते सरासरीच्या आसपास होते.

उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुके आले असून, जम्मू-काश्‍मीर व मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंत या दोन्ही राज्यांबरोबरच केरळ व तमिळनाडूमध्येही काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य भारतातील ढगाळ हवामानातही वाढ झाली आहे. यामुळे शुक्रवारी मध्य प्रदेशसोबतच विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता आहे.

बुधवारी (ता. 15) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई 17, अलिबाग 18.2, रत्नागिरी 17.8, पणजी 20.1, डहाणू 19.3, भिरा 22.1, पुणे 13.5, नगर 13.7, जळगाव 17.3, कोल्हापूर 18.2, महाबळेश्‍वर 14.5, मालेगाव 15, नाशिक 11.2, सांगली 15.5, सातारा 13.8, सोलापूर 17.3, उस्मानाबाद 14.2, औरंगाबाद 16.2, परभणी 15.4, नांदेड 15.5, बीड 16.4, अकोला 17, अमरावती 13.2, बुलडाणा 17.2, ब्रह्मपुरी 16.8, चंद्रपूर 18.6, गोंदिया 14, नागपूर 15.3, वाशीम 15.8, वर्धा 15.4, यवतमाळ 15.

No comments:

Post a Comment