Wednesday, March 16, 2016

अशोक डोंगरे, संगमनेर - पोल्ट्री यशोगाथा

कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्रीने दाखवला
शाश्वत विकासाचा महामार्ग
----------------
अत्यल्पभुधारणा आणि पाणी टंचाई यामुळे निमज (संगमनेर, नगर) येथिल एका तरुणाने बी कॉम झाल्यावर नोकरीचा मार्ग स्विकारला. अनेक ठिकाणी काम केले. बॅकेत काम करुनही आर्थिक गणित तोट्याचेच राहीले. बॅंक बुडाल्यावर नोकरी गेली आणि मग शेती पुरक व्यवसायात उडी घेतली. उत्पादन, गुणवत्ता आणि अर्थकारणात मजल एवढी मारली की पोल्ट्री व्यवसायातील कंपन्या व शेतकऱ्यांसाठी ते आदर्श ठरले आहेत. पोल्ट्रीतील सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळवलेले श्री. अशोक व सौ. विमल डोंगरे यांची ही यशोगाथा...
----------------
एकत्र कुटुंब होतं. शेतीत फारसा काही अर्थ नव्हता. यामुळं 1989 साली पदवीधर झाल्याबरोबर अशोक डोंगरे यांनी नोकरी करायला सुरवात केली. पीडब्लूडीमध्ये कंत्राटदाराच्या हाताखाली मुकादम म्हणून पुलांची, रस्त्यांची कामं केली. सिन्नर येथिल बिडी उद्योगात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले. यानंतर 1993 पासून संगमनेरमधील बी.जे.खताळ जनता सहकारी बॅंकेत कर्ज विभागात क्लर्क म्हणून काम करायला सुरवात केली. तिघे भाऊ आणि आई वडील 2003 पर्यंत कुटुंब एकत्र होतं. मधला भाऊ सर्व शेती पहायचा. गहू, बाजरी, भुईमुग, घास अशी पिकं होती. पाच गाई, दोन बैल असायचे.

नोकरीतून फार काही हाती येत नसलं, महिन्याच्या शेवटी शिल्लक शुन्य असली तरी ती सोडून दुसरं काही करण्याचं धाडस नव्हतं. अशातच 2009 मध्ये बॅंक बुडाली. लिक्विडेशनमध्ये निघाली. नोकरी गेली. आता दुसऱ्या धंदा व्यवसायात हात पाय हलवल्याशिवाय पर्याय नव्हता. स्वतःला दुध काढता येत नव्हते, पत्निलाही शेतीकामाची सवय नव्हती. यामुळे दुग्धव्यवसायाचा पर्याय संपल्यात जमा होता. पर्याय म्हणून मग लहान कालवडी विकत घेवून त्या मोठ्या करुन खाली व्हायच्या वेळी विक्री करायची असा व्यवसाय सुरु केला. सुमारे 15 हजाराची कालवड दीड वर्ष सांभाळून 40 हजाराला जायची. पण तोपर्यंत ती जवळपास 15 हजाराचा चारा खायची. मिळायचे फक्त दहा हजार. चार पाच कालवडी सांभाळायचे, घासाची ओझी- उसाच्या मुळ्या डोक्यावर वहायच्या आणि दीड वर्षाचे उत्पन्न फक्त 40 हजार रुपये. बॅंकेत काम केलेल्या मानसासाठी हे अर्थकारण तापदायक होतं. मग करायचं काय...

तालुक्यातच गोडसेवाडी (धांदरफळ खुर्द) येथे मामांची (शांताराम गोडसे) सुमारे 25-30 वर्षे जुनी 22 हजार पक्षी क्षमतेची पोल्ट्री होती. ते यशस्वीपणे व्यवसाय करत होते. नंतर त्यांना जमेना. मग डोंगरे यांच्या मालदाड येथे शिक्षक असलेल्या लहान भावाने (रोहिदास डोंगरे) मामांची पोल्ट्री चालवायला घेतली. नोकरी करुन मोकळ्या वेळात ते पोल्ट्री पहायचे, भरपूर उत्पन्न भेटायचे. ते नोकरी पाहून करतात... मी तर मोकळाच आहे. मग मी का नाही करु शकत... असा विचार करुन पोल्ट्री चालवायला घेण्यापेक्षा स्वतःचीच उभारायचा निर्णय घेतला आणि 2011 साली अशोकरावांनी आपल्या गिताप्रसाद पोल्ट्री फार्मचा श्रीगणेशा केला.

परिसरातील पोल्ट्री शेडला भेट दिली. पहाणी केली आणि त्यानुसार 10 गुंठे जागेवर 210 फुट लांब आणि 30 फुट रुंद असे 6300 चौरस फुटाचे बांधकाम सुरु केलं. साठवणूकीची खोली, शेजारी मोकळी जागा, गाड्या वळण्यासाठी जागा ठेवली. पाण्यासाठी 35,000 लिटरची टाकी उभारली. विहीरीतून त्यात पाणी आणायची सोय केली. तीन महिन्यात पोल्ट्री उभारली. सुमारे साडेनऊ लाख रुपये खर्च आला. इंडियन ओव्हरसिअर बॅंकेकडून पाच लाख रुपये कर्ज काढले आणि बाकीचे पैसे पाव्हण्या रावळ्यांकडून उभे केले. 2011 सालीच्या दसऱ्याला पोल्ट्री सुरु झाली. कुटुंबाची एकूण जमिनधारणा अडीच एकर असली तरी सर्व लक्ष 10 गुंठ्यावरील पोल्ट्रीवर केंद्रीत केले. उर्वरीत जमिनीत 20 गुंठे ऊस आणि बाकी सर्व पडीक आहे. फक्त 10 गुंठ्यावरील पोल्ट्रीने त्यांना यशाचा मार्ग दाखवला. गेली पाच वर्षे ते यशस्वीपणे करार पद्धतीने पोल्ट्री करत आहेत.

- उत्पादन खर्च
पिल्ले, खाद्य, औषधे, डॉक्टर, सुपरव्हिजन, वाहतूक हा सर्व खर्च कंपनी करते. त्याची मर्यादा ठरलेली असते. पिल्लू 18 रुपये, खाद्य 30 रुपये किलो, औषधांचा खर्च प्रत्यक्ष होईल तो, सुपरव्हिजनचे प्रति किलो दोन रुपये धरतात. प्रति किलो 64 रुपये उत्पादन खर्च कंपनीने निश्चित केलेला आहे. त्यापेक्षा कमी खर्चात वजन मिळवले तर त्यासाठी त्या पटीत इनसेन्टिव्ह मिळतो. मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन खर्च झाल्यास दंड आकारला जातो. प्रति किलो 4 रुपये 70 पैसे हे निश्चित संगोपन शुल्क (रेअरिंग चार्ज) आहे. डोंगरे कमी दिवसात, सुदृढ, निरोगी पक्षी तयार करत असल्याने त्यांचा उत्पादन खर्च कंपनीच्या मर्यादेहून दहा ते पंधरा रुपये कमी येतो आणि त्यामुळे त्यांना अनेकदा निर्धारीत संगोपन शुल्काहून दुप्पट दर मिळतो.

यातिरिक्त पक्षांखाली टाकण्यासाठीचे भाताचे तुस (एका बॅचला 1.250 टन, सुमारे 6 हजार रुपये), वीज (एका बॅचला सुमारे तीन हजार रुपये), पाणी (35 हजार लिटरची टाकी आहे, ती 15 दिवस पुरते. दररोज 2000 लिटर पाणी लागते), कागदाची रद्दी, चुना, कोळसा, साखर आदींसाठी सुमारे 5000 रुपये खर्च येतो. बाहेरचे मजूर घेत नाहीत. पतीपत्नी आणि मुलं सकाळी दीड तास आणि संध्याकाळी दीड तास असे दिवसभरात फक्त तीन तास काम करतात. सर्व बाबींचा खर्च विचारात घेतला तरी तो सुमारे 18 ते 20 हजार रुपये येतो.

- नफ्याचे... गणित फायद्याचे

डोंगरे यांनी पहिल्याच वर्षी भरघोस उत्पादनासह सात बॅच यशस्वीपणे काढल्या. कंपनीचा तीन ग्रॅम सोन्याच्या अंगठीसहचा सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार त्यांना मिळाला. सरासरी ते वर्षाला सहा बॅच काढतात. एका बॅचला 50 हजार ते एक लाख रुपयांदरम्यान उत्पन्न मिळते. प्रति बॅच उत्पन्नाची सरासरी सुमारे 70 हजार रुपये आहे. वर्षाला सुमारे साडेतीन चे चार लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.
चार हजार रुपये प्रति ट्रॉली याप्रमाणे त्याची विक्री करतात. त्यापासून प्रत्येक बॅचला सुमारे 17,200 रुपये उत्पन्न मिळते. एका बॅचला सुमारे 300 गोणी खाद्य लागते. खाद्याच्या रिकाम्या पिशव्या प्रति पिशवी सात रुपये या होलसेल दराने विकतात. त्यातूनही सुमारे दोन हजार रुपये उत्पन्न मिळते. याशिवाय भांड्यांमध्ये व फोडलेल्या गोणींमध्ये राहीलेले खाद्य संगमनेर बाजारात विकूनही काही उत्पन्न मिळते. या सर्वातून त्या बॅचचा सर्व उत्पादन खर्च वसूल होतो आणि कंपनीकडून मिळालेले संगोपन शिल्क निव्वळ नफा म्हणून शिल्लक राहते.

- सर्व श्रेय मार्गदर्शकाला

डोंगरे यांनी पोल्ट्री सुरु केली तेव्हा सर्वप्रथम सगुणा पोल्ट्री सोबत करार केला. सुगुणाचे त्या भागाचे तत्कालिन पोल्ट्री वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र गोरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. डॉ. गोरेंनी पोल्ट्रीतले सर्व बारकावे शिकवले. त्यांच्यामुळे कमीत कमी दिवसात सर्वोच्च गुणवत्ता व वजन मिळवायला शिकलो, त्यांनी मोठ्या भावासारखं मार्गदर्शन केलं म्हणून यशाचं सुत्र सापडलं, असं डोंगरे आवर्जून सांगतात. पुढे डॉ. गोरे यांची पदोन्नतीने बदली झाली. ते याच भागात कायम रहावेत म्हणून डोंगरेंनी प्रयत्न केले पण यश आले नाही. शेवटी ते नाहीत म्हणून डोंगरेंनी सगुणाची साथ सोडून इतर कंपन्यांशी करार केला. अजूनही काही अडचण आल्यास डॉ. गोरे दुरध्वनीवरुन त्यांना मार्गदर्शन करतात.

- डोंगरे कुटुंबाचा दिनक्रम
दररोज सकाळी 8 वाजता श्री व सौ. डोंगरे घरापासून पाचशे मिटरवर असलेल्या पोल्ट्रीकडे जातात. साडेनऊपर्यंत पक्षांना खाद्य, पाणी, तुसाची हालवाहालव आदी काम आवरतात आणि घरी येतात. यानंतर सौ. डोंगरे स्वयंपाक, मुलांच्या शाळेची आवराआवर करतात. तोपर्यंत श्री. डोंगरे गावात जावून तास दीड तास पतसंस्थेचा कारभार पाहून येतात. गावच्या सरस्वती ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. साडेअकरा बाराच्या सुमारास दोघं नवरा बायको सोबत जेवण करतात. यानंतर बाहेरची काही असतील किंवा कुठं जायचं असेल तर ते... नाही तर विश्रांती घेतात. संध्याकाळी 4 वाजता ते साडेपाच पर्यंत पुन्हा पोल्टीत काम करतात. साडेपाच वाजता पोल्ट्रीला कुलुप लावून घरी येतात. स्वयंपाक, एकत्रित जेवण, गप्पाटप्पा, मुलांचा अभ्यास आणि मग झोप. सकाळी दीड तास व संध्याकाळी दीड तास असे दिवसाला फक्त तीन तास काम करतात. हा दिनक्रम ठरलेला आहे.

- जगण्याचं, व्यवसायाचं रॉयल तत्वज्ञान
प्रत्येक माणसाची, कुटुंबाची कामाची आणि व्यवस्थापनाची एक क्षमता आणि मर्यादा ठरलेली असते. ती ओलांडण्याचा प्रयत्न केला तर कार्यक्षमता (इफिसियन्सी) कमी होते. विचार होता आणखी पोल्ट्री वाढवण्याचा... पण सर्व बाबींचा विचार करुन पाच चे दहा हजार पक्षी करण्यापेक्षा पाच हजार पक्षांपासून दहा हजार पक्षांएवढे उत्पन्न घेण्यावर भर दिला व ते साध्य केले.

अति कामाच्या किंवा पैशाच्या मागे लागून जगणं विसरण्यात अर्थ नसतो. शेवटी तुम्ही काम कशासाठी करता, कामासाठी की चांगले जगण्यासाठी. चांगलं जगायला आवश्यक तेवढा पैसा शाश्वतपणे येत असेल तर मग हव्यास कशाला. अनेक शेतकरी डेअरीला दररोज शंभर-दोनशे लिटर दुध घालतात, पण घरी चहाला दुध नसतं. त्यांना वेळेवर भाकर खाता येत नाही. ना मुलांना निट घडवता येत. मग ढोरमेहनत केल्याचा व जे काही कमवले त्या पैशाचा काय उपयोग. कामात, व्यवहारात, जगण्यात स्मार्टपणा हवा. आयुष्य एकदाच आहे. चांगलं खायचं, चांगलं रहायचं, चांगलं जगायचं. कामाच्या नादात जगणं विसरायचं नाही. अतीरेक करुन कुणासाठी कमवून ठेवायचं ?

मला पोल्ट्रीतून जे उत्पन्न मिळतंय ते शाश्वत आणि कुटुंबासाठी पुरेसे आहे. दोन मुले आहेत. मुलगा वैभव ( वय 18) कृषी पदविकेच्या पहिल्या वर्षात आहे. तर मुलगी पुनम ( वय 20) अभियांत्रिकी पदविकेच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यांना पुरेसा वेळ देतो. एखादे दिवशी पोल्ट्रीत जास्त काम असलं तर सर्व उरकल्यावर संगमनेरला हॉटेलमध्ये जेवायला जातो सर्वजण. दर वर्षी एका मोठ्या सहलीला जातो. राज्यातील सर्व प्रमुख देवस्थाने आणि प्रमुख पर्यंटन स्थळं फिरलो आहोत. गुजरात (सापुतारा), गोवा, कोकणात फिरलोय. यंदा परत कोकणात जाणार आहोत. जे काही करायचं ते कुटुंबासोबत. एकटा तर मी गावात जावून चहाही पित नाही... इति. अशोक डोंगरे

- व्यवसायिक यशाची सुत्रे...
1) पोल्ट्रीभोवती चेरी ची झाडे. ही झाडे बारमाही हिरवी असतात. त्यामुळे गारवा राहतो. ऊन थेट लागत नाही आणि झळाही बसत नाहीत. यामुळे शेडमधील जागेचा पक्षी पुरेपूर उपयोग करतात.
2) पिल्ले लहान असताना पहिले तीन दिवस पक्षांना बसू देत नाही. सारखे हलवत राहतो. यामुळे ती पाणी जास्त पितात व खाद्य जास्त खातात. लहानपणीच खाण्याची व पिण्याची सवय लागते. यामुळे त्यांचे वजन भराभर वाढते.
3) पहिले पाच सहा दिवस तापमान नियंत्रित करावं लागतं. कोळसा शेगडी वापरतो. पहिली आठ दिवस खूप काळजी घ्यावी लागते.
4) पक्षांखाली जमीनीवर एक इंच जाडीचा तुसाचा थर देतो. तो दररोज एकदा हलवतो. यामुळे वास येत नाही, आजार तयार होत नाही.
5) उष्णतेच्या प्रमाणानुसार वजन अपेक्षित असते. खूपच वजन झाले आणि उष्णता वाढली तर तयार झालेला पक्षी खावून मरतो. म्हणून उष्णता जास्त असल्यास खाद्यावर नियंत्रण ठेवतो. रात्री मुबलक खाद्य ठेवतो. दुपारी खाद्याची भांडी उंचावर घेतो.
6) पिण्याचे पाणी स्वच्छ हवे. भांडी वेळच्या वेळी साफ करायची. आत पाणी सांडू द्यायचे नाही. त्यामुळे तुस खराब होत नाही व वास येत नाही.
7) स्वच्छता खूप महत्वाची. ती राखली तर आजार येत नाही, आला तर ज्या पक्षाला बाधा होईल तो मरतोच. यामुळे आजार येवू नये म्हणूनच प्रयत्न करायचे. सरासरी 3 टक्के मर राहते.
8) कंपनीने निर्धारीत केलेल्या खर्चापेक्षा उत्पादन खर्च कमी राखतो. हवामानाची साथ आहे. आजूबाजूला बागायती क्षेत्र असल्याने हवामानाची साथ आहे. स्वच्छता, मेहनत, बारकाईने लक्ष असते. या सर्वांमुळे कंपनीच्या निर्धारीत उत्पादन खर्चाहून 10 ते 15 रुपये कमी खर्चात प्रतिकिलो उत्पादन घेतो. 50 ते 60 रुपये प्रतिकिलो उत्पादन खर्च येतो.
9) पक्षाच्या वयानुसार चार टप्प्यात चार प्रकारचे खाद्य देतो. पहिल्यांदा पीबीएस, त्यानंतर ग्रोअर, मग पॅलेट आणि सर्वात शेवटी फिनिशर असे खाद्य असते. या खाद्य बदलांच्या वेळी एक दिवस दोन प्रकारचे खाद्य मिक्स करुन चारतो. यामुळे पचनाला बाधा येत नाही.
10) कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजन मिळवण्यावर कटाक्ष. 34 दिवसात 2100 ग्रॅम वजन होतेय. दोन किलोची साईज झाल्यावर कंपनी लगेच पक्षी उचलते. 30 दिवसांहून पुढे वजन जास्त वेगाने वाढते. सर्व लॉट 34 ते 37 दिवसातच उचलतात.

------------------------
- काही बॅचच्या अर्थकारणाचे नमुने
बॅच विक्री दिनांक --- पक्षी --- सरासरी वजन (किग्रॅ) --- एकूण वजन (किग्रॅ) --- प्रति किलो दर, रुपये (रेअरिंग चार्ज) --- एकूण उत्पन्न रुपये) --- कालावधी (दिवस)
24.11.2011 --- 5,870 --- 2.406 --- 13,420 --- 9.40 --- 81,881 --- 37
09.10.2012 --- 5,897 --- 2.600 --- 14,929 --- 7.04 --- 1,05,164 --- 44
02.03.2013 --- 4,733 --- 2.095 --- 9691 --- 6.50 --- 61,088 --- 40
23.11.2014 --- 6,428 --- 2.174 --- 13,633 --- 6.03 --- 80,916 --- 34
28.11.2015 --- 5,100 --- 2.085 --- 10,340 --- 9.10 --- 90,591 --- 32

- कमी दिवसात जास्त वजन
आठवडा --- कंपनीला अपेक्षित वजन (ग्रॅम) --- डोंगरेंच्या पक्षांच्या वजन (ग्रॅम)
पहिला --- 250 --- 300
दुसरा --- 950 --- 1035
तिसरा --- 1435 --- 1590
चौथा --- 1800 --- 2000
-----------
"पोल्ट्रीमुळं प्रगती झालीये. पूर्वी वर्षाला मिळायचे एवढे उत्पन्न आता महिन्यात घेतोय. मानसिक ताणतणाव नाहीत. आर्थिक अडचण नाही. मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु आहे. चांगल्या प्रकारे मनासारखं आयुष्य जगतोय. खरोखर सुखी आहोत."
- सौ. विमल डोंगरे

"बारा तेरा वर्षे नोकरी केली. आज उद्या उत्पन्न वाढेल या आशेने काम करत रहायचो. पण शिल्लक काहीच राहायचं नाही. ही सर्व वर्षे फुकट घालवली असं वाटतं कधी कधी. पोल्ट्रीसाठी पाच वर्षाच्या बोलीवर घेतलेले कर्ज सर्व जबाबदाऱ्या पार पाडून तीन वर्षात फेडले. मनासारखं संपन्न जगतोय आता. बॅंक बंद पडली नसती तर आजही नोकरीच करत असतो. "
- श्री. अशोक डोंगरे
----------
संपर्क -
अशोक गणपत डोंगरे, मु. पो. निमज (खंडोबामळा), ता. संगमनेर, जि. नगर - 9922694671














No comments:

Post a Comment