Friday, March 18, 2016

कृषी पदव्युत्तर पदवी प्रवेश परिक्षा सुरु

पुणे (प्रतिनिधी) - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सुमारे १३५० जागांसाठीची सामायिक प्रवेश परिक्षा नुकतिच सुरु झाली आहे. कृषी, फलोत्पादनसह वेगवेगळ्या १० विद्याशाखांसाठी राज्यातील १४ केंद्रांवर ही परिक्षा होत असून तब्बल १५ हजार ३२७ विद्यार्थी या परिक्षेला बसले आहेत. यातील सर्वाधीक प्रतिसादाची कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश परिक्षा रविवारी (ता.२०) होणार आहे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळामार्फत येत्या १० एप्रिलला निकाल जाहिर होणार आहे.

पुणे, अकोला, नागपूर, परभणी, दापोली (रत्नागिरी), राहुरी (नगर), कोल्हापूर, धुळे, लातूर, बदनापूर (जालना), यवतमाळ, कराड (सातारा), अंबेजोगाई (बीड) व सोनापूर (गडचिरोली) या ठिकाणच्‍या कृषी व संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश परिक्षा सुरु आहेत. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष परिक्षा घेण्यापर्यंत आणि पुढे निकालापर्यंत प्रत्येक पातळीवर गोपनियता पाळण्यात आली असून निरिक्षकांच्या देखरेखीखाली प्रत्येक टप्प्यातील कार्यवाही होत आहे. प्रवेश अर्ज व पुढे निकालाचीही सर्व यंत्रणा ऑनलाईन आहे. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, गैरवर्तन कोणत्याही पातळीवर होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली असल्याचे मंडळाचे नियंत्रक डॉ. आर. के. रहाणे यांनी सांगितले.

- चौकट
विद्याशाखानिहाय परिक्षांना बसणारे विद्यार्थी
कृषी - ९०१८, फलोत्पादन - २५४४, कृषी व्यवसाय व्यवस्थापन - १६७२, कृषी जैवतंत्रज्ञान - ७१५, अन्न तंत्रज्ञान - ३९७, काढणी पश्चित तंत्रज्ञान - ३९६, कृषी अभियांत्रिकी - २९४, वनिकी - २२२, मत्स्यविज्ञान - ५३, गृह विज्ञान - १६

- चौकट
चार महिने अगोदरच परिक्षा
आत्तापर्यंत पदवीचे अंतिम निकाल लागल्यानंतर जुलै मध्ये पदव्युत्तर पदवीची प्रवेश परिक्षा होत होती. यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडून अभ्यासक्रम सुरु होण्यास सप्टेंबर उजाडत होता. परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यास फार थोडा कालावधी हाती राहत होता. ही तृटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळाने यंदा प्रथमच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या धर्तीवर (आयसीएआर) निकाल लागण्यापुर्वीच प्रवेश परिक्षा घेतली आहे. या परिक्षेचा निकालही पदवीच्या निकालाआधीच जाहिर होणार आहे. पदवीचे निकाल लागल्यानंतर मे महिन्यात प्रवेश प्रक्रिया पार पडून जून मध्ये प्रत्यक्ष अभ्यासक्रमांना सुरवात होईल, असा प्रयत्न आहे.

- कोट
‘‘नेहमीपेक्षा चार महिने आधी प्रवेश परिक्षा घेण्यास परभणीतील काही विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. पण ही परिक्षा वेळेत होण्याची गरज आणि महत्व सांगितल्यावर त्यांनाही ते मान्य झाले. पदवीचे आठवे सत्र कार्यानुभवाचे आहे. फक्त प्रॅक्टिकल आहे, थिअरी नाही. त्यामुळे विनाकारण परिक्षा लांबवण्यात अर्थ नव्हता. परिक्षा लवकर घेतल्याने आता पदव्युत्तर पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांचा मोठा फायदा होणार आहे.’’
- डॉ. आर. के. रहाणे, नियंत्रक, महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परिक्षा मंडळ, पुणे
------------------------ 

No comments:

Post a Comment