Wednesday, March 16, 2016

पोस्टऑल - थेट शेतमाल विक्री पोर्टल

शेतमालाच्या थेट विक्रीसाठी
मोफत ऑनलाईन पोर्टल

आयटीतील तरुणाचा उपक्रम, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

पुणे (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांना शेतमालाची ऑनलाईन पद्धतीने थेट विक्री करणे सोपे व्हावे, यासाठी पुण्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असलेल्या निरंजन माने या तरुणाने मोफत खरेदी विक्री संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. शेतकरी व खरेदीदार या दोघांसाठीही त्यांचे www.postall.in हे संकेतस्थळ उपयुक्त ठरत आहे. माने यांच्याबरोबरच राज्यात ठिकठिकाणी आयटी क्षेत्रातील तरुणांनी शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची मोफत सेवा पुरविण्यास सुरवात केली अाहे. इंटरनेटवर यासाठी विविध प्रकारची संकेतस्थळे सुरु झाली आहेत.

निरंजन माने हे लातूर जिल्ह्यातील वाकसा (ता.निलंगा) गावचे मुळ रहिवासी आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रात पदवी संपादन केल्यानंतर ते पुण्यात आयटी क्षेत्रात नोकरी करत आहे. योग्य बाजारभावाअभावी शेतकऱ्याचे कष्ट व शेतमालाची बाजारात होणारी अवहेलना पाहिलेल्या माने यांनी त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विकता यावा यासाठी ही वेबसाईट तयार केली आहे. गेल्या सहा महिन्यापासून राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. यात सध्या द्राक्ष व डाळींब उत्पादक शेतकरी आघाडीवर आहेत. शेतीतील व शेतीसाठी लागणारी सर्व प्रकारची उत्पादने खरेदी विक्री करण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे.

शेतकऱ्याने त्याच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेतमालाची माहिती, त्याला अपेक्षित किमतीसह संकेतस्थळावर जाहिरातीच्या स्वरुपात प्रसिद्ध करावी लागते. शहरी ग्राहक, व्यापारी यांनाही या त्यांच्या गरजेनुसार शेतमाल आवश्यकतेची व अपेक्षित दराची जाहिरात प्रसिद्ध करता येते. त्यानुसार खरेदीदार व शेतकरी यांच्यात एकमेकांच्या सहमतीने, सोईने पुढचे व्यवहार होतात. संकेतस्थळाची भुमिका फक्त दोघांची गाठ घालून देण्याची आहे. जुन्या नव्या वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी सध्या देशभर अग्रेसर असलेल्या व जाहिरातीतून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या एका लोकप्रिय संकेतस्थळापासून प्रेरणा घेवून माने यांनी हे संकेतस्थळ बनवले आहे.

- कोट
‘‘पोस्टऑल हे संकेतस्थळ शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही सोईसाठी तयार केले आहे. ही सुविधा मोफत आहे. यात माझा कोणताही व्यवसाईक हेतू नाही. तसं झालं तर मग माझ्यात आणि दलालांत काय फरक राहीला. मला दलाल व्हायचं नाही. माहिती तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ करुन द्यायचा आहे. म्हणून हे संकेतस्थळ तयार केले आहे.’’
- निरंजन माने 

No comments:

Post a Comment