Thursday, March 10, 2016

विदर्भात गारपिट, वावटळींचा इशारा



येत्या सोमवारपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे (प्रतिनिधी) - राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. हवामान खात्याने शनिवारी विदर्भाच्या तुरळक भागात गारांचा पाऊस व गडगडाटी वावटळ होण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी (ता.११) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याचा, शनिवारी (ता.१२) मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात तर कोकण, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा, रविवारी (ता.१३) मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा तर सोमवारी (ता.१४) विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पूर्व मध्य प्रदेश, लगतचा विदर्भ व छत्तिसगडवर समुद्रसपाटीच्या पातळीहून दीड किलोमिटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रीय आहेत. याच वेळी कोकण किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यामुळे राज्यात पावसाचे सावट निर्माण झाले आहे. विदर्भावरील चक्राकार वाऱ्यांमुळे गारपीटीचा अंदाज आहे. दिवसभरात मालेगाव येथे राज्यातील सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची तर नाशिक येथे सर्वात कमी १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. किमान तापमानात कोकणच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या आसपास होते.

गुरुवारी (ता.१०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई ३२.२ (२२.५), अलिबाग ३०.९ (२१.४), रत्नागिरी ३३.७ (१९.३), पणजी ३३ (२३.४), डहाणू ३०.६ (२०.६), भिरा (१७), पुणे ३५.८ (१६.५), नगर (१८.९), जळगाव ३७.६ (१७.४), कोल्हापूर ३५.६ (२२.५), महाबळेश्वर ३२.१ (१९.४), मालेगाव ३९ (१७.२), नाशिक ३४.९ (१४), सांगली ३६.५ (२०.३), सातारा ३५.३ (१८.७), सोलापूर ३७.६ (२४.१), उस्मानाबाद (१८.४), औरंगाबाद ३५.३ (१७.१), परभणी ३७.६ (२१.२), नांदेड ३८.६ (१८), अकोला ३७.६ (२०.४), अमरावती ३७ (२१), बुलडाणा ३५ (२१.७), ब्रम्हपुरी ३६.९ (२२.७), चंद्रपूर ३८.२ (२४.७), गोंदिया ३४ (२१.५), नागपूर ३५ (१९.६), वाशिम ३३.८ (२३.६), वर्धा ३६.२ (१९.८), यवतमाळ ३६ (२१.६)
----------------------------------- 

No comments:

Post a Comment