Thursday, November 5, 2015

ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला

दक्षिण कोकण, गोव्यात हलका पाऊस; तमिळनाडू, केरळात अतिवृष्टीचा इशारा

पुणे (प्रतिनिधी) - नैऋत्य मोसमी वारे माघारी परतल्यानंतर आता अरबी समुद्राच्या अनुकूलतेमुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. या मॉन्सूनच्या प्रभावाने पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात ईशान्य मॉन्सूनची सक्रीयता वाढून तमिळनाडू व केरळात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात रविवारपर्यंत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून सोमवारी (ता.९) दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

किनारी आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पॉडेचरीसह दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रीय झाला असून पुढील दोन दिवसात या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून पश्चिमेकडे म्हणजेच माघारीच्या मॉन्सूनच्या दिशेने आहे. हे वारे उपसागरावरुन दक्षिणेकडील राज्यांवर बाष्पयुक्त ढग वाहून आणत असल्याने या भागात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात ईशान्य मॉन्सूनचा पाऊस पडतो. यंदाच्या हंगामात सध्या त्याची तिव्रता सर्वाधिक आहे. अरबी समुद्रात सक्रीय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढलेला आहे.

गुरुवारी (ता.५) सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र, कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी आणि कोकणात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून तीन ते सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दिवसभरात आंध्र प्रदेशलगतच्या उपसागरात सक्रीय असलल्या चक्राकार वाऱ्याची तिव्रता कमी झाली. तर मध्य पूर्व अरबी समुद्रात सक्रीय असलेल्या तिव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे न्यून दाबाच्या क्षेत्रात डिप्रेशन) रुपांतर झाले. मुंबईपासून सुमारे १००० किलोमिटर अंतरावर सक्रीय असून ते ओमानच्या दिशेने सरकत आहे. शुक्रवारी (ता.६) त्याची तिव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

शुक्रावारी (ता.५) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासात प्रमुख ठिकाणी नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई २६.८, अलिबाग २५.६, रत्नागिरी २३.१, पणजी २५, डहाणू २३, पुणे १८.३, नगर १६, जळगाव १९.४, कोल्हापूर २१.९, महाबळेश्वर १७.४, मालेगाव २०.२, नाशिक १६.५, सांगली २३.१, सातारा २०.९, सोलापूर २३, उस्मानाबाद १८, औरंगाबाद १८.६, परभणी १७.१, नांदेड १६, अकोला १९.५, अमरावती २०.६, बुलडाणा १९.६, ब्रम्हपुरी २१.३, चंद्रपूर २१.२, गोंदिया २०.४, नागपूर २०.३, वाशिम २१.६, वर्धा २०.५, यवतमाळ २०.४
----------------------------

No comments:

Post a Comment