Sunday, November 1, 2015

तळकोकणातील भात अवकाळीच्या छायेत

पुण (प्रतिनिधी) - नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी गेल्यानंतर कोकणात ठिकठिकाणी सुरु असलेल्या अवकाळी पावसाने ऐन काढणीस आलेले भात पिक नुकसानीच्या छायेत आहे. गेली दोन दिवस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. हवामान खात्याने येत्या बुधवारपर्यंत (ता.४) दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरीत महाराष्‍ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील ढगाळ हवामान व कोकण-मध्य महाराष्‍ट्रातील पावसाला कारणीभूत ठरलेले अरबी समुद्रातील चापला चक्रीवादळ भारतीय किनाऱ्यापासून दूर आखाती देशांच्या दिशेने वेगाने सरकले आहे. मंगळवारी सकाळी (ता.३) अति तिव्र स्वरुपातच येमेनच्या किनारपट्टीला जोरदार धडक देण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हे वादळ दूर गेल्याने राज्यातील ढगाळ हवामानातही घट अपेक्षित असून मंगळवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोकणात मात्र पावसाचे सावट कायम आहे. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही.

रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात मध्य महाराष्‍ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरीत भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्यात नांदेड येथे राज्यातील निचांकी १५.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पाठोपाठ नाशिक येथे १५.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

बाजरी, ज्वारी, भात आदी तृणधान्य पिकांच्या काढणीच्या वेळी ढगाळ हवामान असल्यास व पाऊस झाल्यास धान्य भिजून मोठे नुकसान होते. जास्त पाऊस न होता पावसाचा हलक्या पावसाचा शिडकावा झाला तरी साठवणूकीत धान्याला काजळी व किड लागून नुकसान होते. नेमकी अशीच आपत्तीजनक स्थिती दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्‍ट्रात उद्भवलेली आहे. या भागातील ढगाळ हवामान कायम असल्याने पावसाचे सावट व पिकांच्या नुकसानीची शक्यताही कायम आहे.

राज्यातील प्रमुख ठिकाणी रविवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात नोंदविण्यात आलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये - मुंबई २१.८, अलिबाग २४.३, रत्नागिरी २४.७, पणजी २५, डहाणू २३.५, पुणे १७.४, जळगाव २०, कोल्हापूर २२.१, महाबळेश्वर १६.४, मालेगाव १९, नाशिक १५.९, सांगली २१.६, सातारा २०.५, सोलापूर २२.६, औरंगाबाद १९, परभणी १८.६, नांदेड १५.५, अकोला २०, अमरावती १८.६, बुलडाणा १८.६, ब्रम्हपुरी २०.३, गोंदिया १८.६, नागपूर २०, वाशिम २१.२, वर्धा १९.४, यवतमाळ १८

No comments:

Post a Comment