Tuesday, November 11, 2014

प्रदर्शनात शास्त्रज्ञ थेट भेट

प्रदर्शनात शास्त्रज्ञांना थेट भेटा
शंकाचे निरसन करून घ्या!

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांना माहिती, तंत्रज्ञानाची सखोल माहिती व त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी राज्यातील प्रमुख कृषी विद्यापीठे व संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ ऍग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या संपूर्ण पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी सात या कालावधीत उपस्थित राहणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना थेट विद्यापीठांशी, संशोधन संस्थांशी जोडणी करून आपल्या समस्यांवर उपाय मिळवणे व यापुढील काळातही त्यांचा थेटपणे वापर करून घेणे शक्‍य होणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन या संस्थांमार्फत करण्यात आले आहे.
सेंट्रल फूड टेक्‍नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटचे (मुंबई) प्रमुख पी. एम. बडगुजर, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (राहुरी) कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. टी. बी. बस्तेवाड, राष्ट्रीय कांदा व लसुण संशोधन संचलनालयाचे (राजगुरुनगर) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शैलेंद्र घाडगे व बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ संतोष गोडसे हे प्रदर्शनाचे सर्व पाचही दिवस संबंधित संस्थांच्या दालनांमध्ये शेतकऱ्यांना थेट भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (परभणी) दालनात 12 व 13 नोव्हेंबर रोजी डॉ. ए. के. गोरे तर 14 व 15 नोव्हेंबर रोजी डॉ. ए. व्ही. गुट्टे हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने ते मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामार्फत (शिरवळ, सातारा) कृषी प्रदर्शनामध्ये खास शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी तज्ज्ञांची फौजच तैनात करण्यात आली आहे. प्रदर्शनाचे सर्व दिवस डॉ. स्मिता सुरकर (पशुपालन, महिलांसाठी पशुपालनातील रोजगार संधी) उपस्थित राहतील. त्याव्यतिरिक्त पहिले दोन दिवस डॉ. एम. बी. आमले (पशुप्रजनन व्यवस्थापन), डॉ. एस. एम. भोकरे (डेअरी फार्मिंग, गोठा व्यवस्थापन) व डॉ. डी. टी. सकुंडे (दुग्धपदार्थ प्रक्रिया) उपस्थित असतील.
पाठोपाठ 14 नोव्हेंबरला डॉ. ए. व्ही. खानविलकर (जनावरांची निवड, डेअरी फार्मिंग, गोठा व्यवस्थापन), डॉ. व्ही. डी. लोणकर (कुक्कुटपालन), डॉ. एस. टी. बोरीकर (पशु रोग व्यवस्थापन) थेट भेटीसाठी उपस्थित राहतील. प्रदर्शनाच्या अखेरचे दोन दिवस म्हणजेच 15 व 16 नोव्हेंबरला डॉ. तेजस शेंडे (शेळीपालन), डॉ. एस. बी. स्वामी (पशु रोग व्यवस्थापन), डॉ. आर. पी. कोल्हे (पशुसामूहिक स्वास्थ्य व्यवस्थापन) आणि डॉ. एस. बी. कविटकर (पशुआहार व्यवस्थापन) हे शेतकऱ्यांच्या थेट भेटीसाठी उपस्थित राहणार आहेत.
------------- 

No comments:

Post a Comment