Saturday, November 1, 2014

कात्रज - दुध संकलन केंद्र बळकटीकरण योजना, शेतकरी प्रशिक्षण

पुणे जिल्हा दुध संघ देणार
60 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण

संकलन केंद्रांच्या बळकटीकरणासाठी तीन कोटी रुपये

पुणे (प्रतिनिधी) ः राष्ट्रीय दुग्ध विकास आराखड्याअंतर्गत गावपातळीवर दुध संकलन व्यवस्थेचे मजबुतीकरण करण्याचा कार्यक्रम पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत नुकताच सुरु करण्यात आला आहे. यातून दुग्धव्यवसायाशी थेट संबंधीत असलेल्या सुमारे 60 हजार व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार असून दुग्ध संस्थांना आधुनिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येत्या चार वर्षात यासाठी सुमारे सात कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

नॅशनल डेअरी प्लॅनमधून कात्रज संघाला सहा कोटी 75 लाख 12 हजार रुपये उपलब्ध होणार आहेत. यापैकी 4 कोटी 60 लाख 39 हजार रुपये 100 टक्के अनुदान तत्वावर होणार आहे. संघाचे योगदान दोन कोटी 14 लाख 73 हजार रुपयांचे राहणार आहे. जिल्ह्यात 236 दुग्ध संस्थांमार्फत 2017-18 पर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात आंबेगावमधील 15, दौंड 52, जुन्नर 13, पुरंदर 25, भोर 28, हवेली 12, खेड 30, मुळशी 12, शिरुर 27, मावळ 10 तर वेल्हा तालुक्‍यातील 12 संस्थांचा समावेश आहे. प्रशिक्षण हा या योजनेचा महत्वाचा भाग आहे. येत्या पाच वर्षात छोट्या दुध उत्पादकांपासून संचालकांपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 60 हजार व्यक्तींना यातून प्रशिक्षण देण्याचे उद्दीष्ट आहे.

जिल्ह्यातील दुध संकलन केंद्रांच्या सुधारणेसाठी सर्वाधिक सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या शिवाय संकलन केंद्रांना पुरक ठरणारे संकलन साहित्य, कॅन्स, बल्क कुलर आदी साहित्याचाही पुरवठा या योजनेतून संस्थांना करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने या योजनांची अंमलबजावणी होणार असून सध्या शेतकरी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण व इतर कार्यक्रमांची अंमलबजावणी सुरु असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.

- असे होणार दुध संकलन बळकटीकरण (2017-18 पर्यंत)
अनुदानाची बाब ---- नग --- उपलब्ध निधी (लाख रुपये)
दुध संकलन केंद्र --- 238 --- 274.90
संकलन साहित्य --- 374 --- 59.84
एस.एस.कॅन्स --- 1913 --- 57.39
बल्क कुलर --- 8 --- 44.29
ऍटोमेटेड दुध संकलन केंद्र --- 4 --- 6.30
आयसीटी सपोर्ट --- 1 --- 6
संस्था पातळीवर मानधन --- 236 --- 101.95
विस्तार साहित्य --- 6 --- 24
शेतकरी प्रेरणा कार्यक्रम --- 472 --- 2.83
शेतकरी विकास कार्यक्रम --- 160 --- 0.96
स्वच्छ दुध निर्मिती प्रशिक्षण --- 9440 --- 3.54
सचिव प्रशिक्षण --- 396 --- 20.16
संचालक, पर्यवेक्षक, कर्मचारी प्रशिक्षण --- 54 --- 3.32
---------- 

No comments:

Post a Comment