Saturday, November 1, 2014

पुस्तक परिचय - मनापासून मनाकडं - डाॅ. कृष्णा मस्तुद

जावे पुस्तकांच्या गावा ः संतोष डुकरे
------------
पुस्तकाचे नाव - मनापासून मनाकडं
लेखक - डॉ. कृष्णा मस्तूद
पृष्ठ - 216
मुल्य - 240 रुपये
प्रकाशक - सकाळ प्रकाशन, सकाळ पेपर्स प्रा. लि, 595, बुधवार पेठ, पुणे 2.
संपर्क - 020 24405678
-------------
माणसाच्या मनाचा ठाव कुणाला लागू शकत नाही. याचं मनच थाऱ्यावर नाही. मन मारून संसार केला. खुळं आहे ते... असे शेलके टोमणे असतील किंवा वेडा आहे म्हणून केलेले दुर्लक्ष, मारलेले दगड असतील. समोरच्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आपण मनाचा धांडोळा घेतो. स्वतःच्या मनाला ओळखायला, त्याच्याशी संवाद साधायला, त्याला घडवायला बहुतेक जण विसरतात. आणि मग स्वतःबरोबरच इतरांच्याही आयुष्यावर बिब्बा घालत राहतात. मनाच्या हिंदोळ्यावर अधांतरी टांगून राहण्यापेक्षा त्याच्या प्रखर ताकतीवर यशाची शिखरे सर करणे कोणाला नको असते? पण मग मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? बार्शी येथील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद यांनी आपल्या या पुस्तकात अतिशय सहजपणे ही जीवनविद्या वाचकांसाठी खुली केली आहे.

डॉ. मस्तूद यांच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील गाजलेल्या "मनापासून मनाकडं' या सदरातील सर्व 52 लेखांचा संग्रह या पुस्तकात आहे. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची प्रस्तावना आणि डॉ. मस्तूद यांच्या मनोगताने या पुस्तकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. सर्व लेख मनाची मशागत करून यशस्वी जगण्याचा पाया घालणारे आहेत. गौतम बुद्धांपासून संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, कबीर ते अगदी रोजच्या जगण्यातील दाखल्यांचा आधार घेत मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवले आहेत. मनाची मशागत करून आयुष्याचे पीक सुदृढ, संपन्न व फलदायी करण्याची, स्वतःच्या मनाकडे पाहण्याची निकोप दृष्टी हे पुस्तक देते. मनातून निर्माण होणाऱ्या विकारांवर विजय मिळवण्याचा सहजसोपा मार्गही हे पुस्तक दाखवते. स्वयंविकास ही अखेरच्या श्‍वासापर्यंत सुरू राहणारी प्रक्रिया असते. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असला तरी तुमच्या मनाला लागलेली जळमटं झटकून जगण्याला नवा अर्थ आणि नवी झळाळी देण्यात हे पुस्तक उपयुक्त ठरेल, हे निश्‍चित.
-------------

No comments:

Post a Comment