Saturday, November 1, 2014

पुण्यातील 200 गावांमध्ये संतुलित पशुआहार योजना

पुणे (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात वाढ करुन सातत्य राखण्याठी राष्ट्रीय दुग्ध विकास आराखड्याअंतर्गत एनडीडीबीच्या आर्थिक सहाय्याने पुणे जिल्हा सहकारी दुध संघामार्फत संतुलित पशुआहार कार्यक्रम व वैरण विकास कार्यक्रम राबविण्यास नुकतिच सुरवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील 200 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट संपर्कात राहून कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 200 स्थानिक सेवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सध्या नारायणगाव येथिल कृषी विज्ञान केंद्रात सुरु आहे.

जनावरांना देण्यात येणाऱ्या खाद्यात अनेकदा प्रोटिन, उर्जा, फॅट, जीवनसत्वे व क्षार यांचा अभाव असतो किंवा ते कमी प्रमाणात उपलब्ध असतात. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर व दुध उत्पादनावर विपरित परिणाम होतो. असंतुलित आहारामुळे जनावराच्या क्षमतेपेक्षाही कमी प्रमाणात दुध उत्पादन होते. ही घट टाळून उत्पादकतावाढ करण्यासाठी संघामार्फत संतुलित आहार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दोन वेतातील वाढते अंतर कमी करणे, दुध देण्याचा कालावधी वाढवणे, दुधाचा ताप व किटोसिन रोगांमुळे जनावरांचा होणारा मृत्यू रोखणे, कालवडी लवकर वयात आणून पहिल्या वेताचा कालावधी योग्य ठेवणे, उत्पादन कालावधी वाढून दुध उत्पादन वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

एप्रिलपासून आंबेगावमधील 30, दौंड 20, जुन्नर 49, पुरंदर 10,भोर 20, हवेली 6, खेड 17, मुळशी 10, शिरुर 28 तर मावळ व वेल्हा तालुक्‍यातील प्रत्येकी पाच गावांमध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याला संतुलित पशुआहाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गावातीलच एका व्यक्तीची स्थानिक सेवक (लोकल रिसोअर्स पर्सन) म्हणून निवड करण्यात आली आहे. या सेवकास पहिल्या वर्षी दरमहा 1500 रुपये व दुसऱ्या वर्षी दरमहा 750 रुपये मानधन देण्यात येणार आहे. जनावराचे वजन, आरोग्य तपासून संतूलित आहार ठरवून देण्याचे काम हे सेवक आपापल्या गावांमध्ये करणार आहेत. संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वीर हे या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

- 4500 हेक्‍टरवर चारा पिक प्रात्यक्षिके
चारा पिकांच्या विकासासाठी संघामार्फत सुमारे साडेचार हजार हेक्‍टरवर वैरण विकास प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. यामध्ये मोअर मॅन्युअल, मोअर ऍटो पीकअप, बायोमास बंकर, सायलोट, सायलेज मेकिंग प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. याशिवाय शेतकऱ्यांना चारा पिकांच्या बियाण्यासाठी व गायरान जमीनीच्या विकासासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. एनडीडीबीकडून वैरण विकासासाठी जिल्ह्याला 97 लाख रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून आंबेगाव, भोर, दौंड, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्‍यांमधील एकूण 58 गावांमध्ये मका, लसूण, ज्वारी, भात व ऊस या चारा पिकांसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. संघामार्फत याबाबत गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे.

- कोट
""संतुलित आहार कार्यक्रमासाठी एनडीडीबीकडून एक कोटी 78 लाख रुपये उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्स्फुर्त सहभागातून या कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा संघाचा प्रयत्न आहे.''
- बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ
-------------- 

No comments:

Post a Comment