Tuesday, November 11, 2014

ऍग्रोवन कृषी ज्ञान मेळाव्यास आज प्रारंभ

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कृषी ज्ञान तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करून शेतीची आव्हाणे पेलण्याचे बळ देणाऱ्या ऍग्रोवनच्या बहुउपयोगी भव्य कृषी प्रदर्शनास आज (ता.12) पुणे कृषी महाविद्यालयाच्या नवीन मैदानावर प्रारंभ होत आहे. फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी असतील. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डीएसके डेव्हलपर्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक शिरीष कुलकर्णी व डॉ. बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. चे प्रमुख डॉ. वि. सु. बावसकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रदर्शन मंडप राज्यभरातील शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सर्व सहभागी कंपन्या, संस्था आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, उत्पादनांसह प्रदर्शनस्थळी एक दिवस आधीच हजर झाल्या आहेत. सकाळी 11 वाजता प्रदर्शनाला प्रारंभ होईल. येत्या रविवारपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रदर्शन सुरू राहील. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांसाठी प्रदर्शन मंडपाच्या पुढे व मागे वाहनतळ उभारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी या ठिकाणी विशेष मदतनिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांना देश-विदेशातील अत्याधुनिक कृषी यंत्र, अवजारे, निविष्ठा, ज्ञान व तंत्रज्ञान पाहण्याची, अभ्यासण्याची आणि आत्मसात करण्याची संधी या प्रदर्शनात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. शेतकरी संशोधकांपासून ते जागतिक पातळीवरील कंपन्यांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून कृषी विद्यापीठे व राष्ट्रीय संशोधन संस्थांपर्यंत कृषीविषयक सर्व बाजूंशी संबंधित कंपन्या, संस्थांचा यात समावेश आहे. फक्त शेतकरीच नाही तर कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे प्रदर्शन उपयुक्त ठरू शकते. फोर्स मोटर्स लि. व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि. व डॉ. बावसरकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

ऍग्रो संवाद या उपक्रमाचा प्रारंभ दुपारी दोन वाजता ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बी. डी. जडे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ऊस लागवडीतील प्रगत तंत्र या विषयावर ते मार्गदर्शन करतील. गुरुवारी (ता.13) उद्धव खेडेकर (शेडनेटमधील भाजीपाला), शुक्रवारी (ता.14) संजय मोरे पाटील (केसर आंबा व्यवस्थापन), खेमराज कोर (दर्जेदार डाळिंब उत्पादन) व सौ. सुनीता घोगरे (प्रक्रिया उद्योगातील संधी), शनिवारी (ता.15) श्रीरंग सुपनेकर (शाश्‍वत शेती उत्पादन ते थेट विक्री) व कांतिलाल रणदिवे (सेंद्रिय शेती उत्पादन ते विक्री) आणि रविवारी (ता.16) अनिल जाधव (दुग्ध व्यवसायातील महत्त्वाची सूत्रे) यांची व्याखाने होणार आहेत.
------------------ 

No comments:

Post a Comment