Tuesday, November 11, 2014

अत्याधुनिक तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या गोठ्यात

-----------
संजीव लाटकर, संचालक, डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स प्रा. लि.
-----------
डीएसके मिल्कोट्रॉनिक्‍स कंपनीची सुरवात 1991 मध्ये झाली. स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या अडचणी आव्हान म्हणून स्वीकारून संशोधनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारी दर्जेदार उत्पादने बाजारात आणली. आज संपूर्ण दूध साखळी संपूर्णपणे स्वयंचलित (ऑटोमेशन) करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायासंबंधित सर्व प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यापासून मोठ्या प्रकल्पापर्यंत सर्वांना उपलब्ध करून दिले आहे. आम्हाला अडचण, समस्या सांगा आणि ती सोडविणारे तंत्रज्ञान विकसित करून देतो, असे आमचे स्वरूप आहे. सुरवातीला ग्रामीण भागात विजेची मोठी समस्या होती. त्यावर डीएसकेने पेट्रोल व केरोसीन इंधन आवश्‍यक नसलेला इन्व्हर्टर तयार केला. वारणा समूह उद्योगापासून त्याची सुरवात झाली. त्यात शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आम्हाला दूध या विषयातले काहीच माहीत नव्हते. दुग्ध उत्पादकांनी त्यांना हवे ते, हव्या त्या प्रकारचे व माफक किमतीतील तंत्रज्ञान आमच्याकडून विकसित करून घेतले. जशा येतील तशा शेतकऱ्यांच्या अडचणी आम्ही दूर करीत गेलो.

कस्टमाइज सोल्युशन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, दूध संकलन व्यवस्थेचे सर्व ऑटोमेशन हा सर्व प्रवास वेगाने झाला. आज वेगवेगळ्या प्रकारची 23 उत्पादने डीएसकेमार्फत उपलब्ध आहेत. दूध व्यवसायातील पशुखाद्यापासून ते बिलिंग, प्रोसेसिंगपर्यंतची सर्व कामे सोपी झाली आहेत. दूध सचिव यंत्रणा राज्य शासनाच्या अनुदानामुळे राज्यातील सर्व संघांमध्ये पोचली. सन 1997-98 मध्ये संगणक आल्यानंतर त्यावर आधारित विविध उपकरणे, "टेस्टिंग'ची साधने विकसित केली. दूध जास्त असेल तर जास्त पैसे मिळतात, हा समज खोटा ठरविण्यात आम्ही यशस्वी झालो. यामुळे दुधाची गुणवत्ता वाढीस लागली. संघांचा, संस्थांचा दुधातील पाणी बाजूला काढण्यासाठीचा अवांतर खर्चही कमी झाला. कंपनीच्या या गुणवत्ता पद्धतीला (क्वालिटी सिस्टीम) "एनडीडीबी' संस्थेनेही वाखाणले.

यानंतर 2003 पर्यंत दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा, टेस्टिंग युनिटची संकल्पना लोकप्रिय झाली. सन 2007 पर्यंत फक्त पाच ते सहा टक्के स्वयंचलित यंत्रणा होती. तंत्रज्ञानात अनेक अडचणी होत्या. देश त्यासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून होता. कंपनीने यातील सर्व त्रुटी दूर करून गोठ्यापासून डेअरीचा मुख्य प्लॅंट, शेतकरी, संकलन केंद्र, बल्क मिल्क कुलर, चिलिंग सेंटर, डेअरी प्लॅंट व बिलिंगची प्रोसेस ही दुधाची पूर्ण साखळी ऑटोमाइज केली आहे. शेतकरी दूध घालून डेअरीच्या बाहेर पडेपर्यंत त्याच्या बॅंक खात्यात दुधाचे पैसे जमा झालेले असतात. सुमारे 250 प्रकारचे रिपोर्ट तयार करणारे मराठी व इंग्रजी, या दोन्ही भाषांतले डेअरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, गोठ्यातच हिरवा सेंद्रिय चारा तयार करणारे मशिन, सौर ऊर्जेवर व सायकलवर चालणारी उपकरणे, मिल्किंग मशिन, लहान शेतकरी व लहान गोठे केंद्रस्थानी ठेवून उपलब्ध केलेली किफायतशीर व कमी खर्चाची यंत्रे अशा विविध प्रकारचे तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध केलेले आहे.

ग्रामीण भागात परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भारताचा पहिला सोलर कॉम्प्युटिंग डिव्हाइस मोबिलिझ कंपनीने तयार केला. सोलर बेस ऑटोमॅटिक मिल्क कलेक्‍शन युनिट हे एकच यंत्र दूध संकलन आणि बॅंकेचे सर्व व्यवहार करण्याचे काम करते. दुधाचे खाते बॅंकेशी निगडित करून दिले आहे. डेअरी टु बॅंक या संकल्पनेनुसार या यंत्राद्वारा दूध संकलन, बॅंक, शिक्षण, बचत गटाची कामे अशी अनेक प्रकारची कामे करता येतात. ग्रामीण भागात हे यंत्र क्रांतिकारक ठरत आहे. गोठ्यातील सर्व कामे करणारा व सौर ऊर्जेवर चालणारा रामू यंत्रमानव, दारात जाऊन दूध गोळा करण्याची सायकलवरील ऑटोमेशनची सुविधा, बल्क कुलर मॉनिटरिंग सिस्टीम असे विविध प्रकारचे तंत्रज्ञान कंपनीने उपलब्ध केले आहे. हे सर्व पाहण्याची संधी शेतकऱ्यांना ऍग्रोवन कृषी प्रदर्शनात मिळेल.
----------

No comments:

Post a Comment