Monday, November 24, 2014

उत्तम कुंजीर निधन वृत्त

अधिक्षक कृषी अधिकारी
उत्तम कुंजीर यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) ः कृषी खात्यातील अत्यंत कार्यक्षम, मनमिळावू, पारदर्शक व प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकीक असलेले कृषी आयुक्तालयाचे माजी मुख्य सांख्यिक व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे प्रकल्प अधिकारी उत्तम धोंडीबा कुंजीर (वय 55) यांचे रविवारी (ता.23) पहाटे ह्दयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

कुंजीर यांच्या मुळ गावी वाघापूर (पुरंदर, पुणे) येथे रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याच्या कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोएल, कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांसह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंजीर यांना दोन वर्षापुर्वी ह्दयविकाराला झटका आल्यानंतर त्याची अँजीओप्लास्टी शस्त्रक्रीया झाली. मात्र यानंतर जंतूसंसर्ग झाल्याने ते दिर्घकाळ आजारी होते.

राज्याच्या वित्त विभागात वर्ग दोन अधिकारी म्हणून काही काळ सेवा केल्यानंतर ते कृषी विभागात वर्ग एक चे अधिकारी म्हणून भरती झाले. नगर येथे कडा विभागात त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर कृषी आयुक्तालयाच्या मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागात कृषी उपसंचालक, नाशिकच्या विभागिय कृषी सहसंचालक अधिकारी कार्यालयात अधिक्षक कृषी अधिकारी म्हणून काम केले. यानंतर सलग आठ वर्षे राज्याच्या कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक म्हणून केलेली कामगिरी विशेष गाजली.

राज्यासाठीच्या विविध कृषी विमा योजनांची आखणी व अंमलबजावणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. खरीप व रब्बी पिक विमा, हवामानाधारीत विमा योजना, फळपिक विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या काळात सांख्यिकी विभागामार्फत अनेक महत्वाचे अहवाल प्रसिद्‌ध झाले. सध्या प्रगतीपथावर असलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे उभारण्याच्या प्रकल्पाचे पायाभूत कामही त्यांनी केले होते. यासाठी तामिळनाडू कृषी विद्यापीठात त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले होते. दोन वर्षापुर्वी युरोपमध्ये गेलेल्या शेतकरी दौऱ्याचे नेतृत्व त्यांनी केले होते. स्वतःच्या वाघापूर या कोरडवाहू गावातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते प्रयत्नशिल होते. गावातील सिताफळ लागवड, शेतकरी गट स्थापना व सिताफळ निर्यातीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
---------------- 

No comments:

Post a Comment