Tuesday, November 11, 2014

राज्यात पावसाळी हवा

कमी दाबाचा परिणाम; उस्मानाबादेत अतिवृष्टी

पुणे (प्रतिनिधी) ः बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातील कमी दाबाचे क्षेत्र व अरबी समुद्रात कर्नाटक व कोकण किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा या दोन्हींच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ हवामानात वाढ झाली असून ठिकठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात उस्मानाबाद शहरात तब्बल 155 मिलीमिटर पावसासह अतिवृष्टी झाली. कमी दाबाच्या क्षेत्राची तिव्रता आणखी वाढत असल्याने शुक्रवारपर्यंत (ता.14) पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरुपात हलक्‍या ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सोलापूरमध्ये सर्वाधिक 20 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कोल्हापूर व सांगलित बहुतेक ठिकाणी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तासगाव परिसरात अर्धा तास दमदार पाऊस झाला. परभणीत दोन तर तुळजापूर, कळंब व जेऊरमध्ये एक मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कोकणातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या.

दरम्यान, ढगाळ हवामान व पाऊस यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीहून वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत कोकणात तीन अंशांनी, मध्य महाराष्ट्रात पाच अंशांपर्यंत तर मराठवाड्यात तब्बल आठ अंशांपर्यंत उंचावले आहे. कमाल तापमानही ठिकठिकाणी सरासरीहून एक ते तीन अंश सेल्सिअसने उंचावले आहे. कमाल व किमान तापमानाच्या या वाढीत पुढील दोन दिवसात घट होण्याची शक्‍यता नसल्याचे हवामान खात्यातील सुत्रांनी सांगितले.

*चौकट
- ढगाळ, पावसाळी आठवडा
हवामान खात्याने गेल्या आठवड्यातच 10 तारखेनंतर राज्यात पावसाची शक्‍यता व्यक्त केली होती. हा अंदाज खरा ठरला असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली आहे. येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. एकाच वेळी उपसागर व अरबी समुद्रात हवेचा दाब कमी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून तिचा प्रभाव पुढील आठ दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.
----------- 

No comments:

Post a Comment