Tuesday, November 11, 2014

उत्पादनाचे मूल्यवर्धन हा आमचा "फोकस' - बावसकर


शेतीपुढे अनेक आव्हाने आहेत. मॉन्सून उशिरा किंवा लवकर येणार असेल तर त्या दृष्टीने पिकांचे नियोजन करता येणे महत्त्वाचे असते. यात सरकार, स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना थेट शेतावर संभाव्य आपत्तीच्या दोन महिने आधी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. चालू वर्षी पाऊस उशिरा झाला. शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. दोन-तीन वेळा पेरणी करूनही बियाणे वाया जाते. गेली पन्नास वर्षे हेच सुरू आहे. शास्त्र खूप पुढे गेले आहे. सरकारने संभाव्य धोक्‍यांची पूर्वसूचना शेतकऱ्यांना पावलोपावली मोफत दिली पाहिजे. समाजाला चालना देण्यासाठी संकटे उपयुक्त असतात. संकटे ही सुसंधी असते. ती मेंदूला चालना देतात. शिथिलतेचे ऊर्जेत रूपांतर करतात. फुले, आंबेडकर यांच्यासारख्या शून्यातून घडलेल्या व्यक्तींनी संकटांचे रूपांतर संधीत केलं. मानवजातीचा विकास केला. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

पाणी वाचवणे हे फार महत्त्वाचे आहे. ते अतिशय योग्य रितीने वापरले तर उत्पादन व दर्जा सुधारेल, खर्च कमी होईल. शेतकरी बॅंकेच्या दावणीला बांधला जाणार नाही. आज खेडी ओस पडताहेत व शहरे अजगरासारखी सुजताहेत. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तालुका पातळीवर प्रक्रिया उद्योगाची ट्रेनिंग सेंटर काढायला हवीत. चीनमध्ये फॅक्‍टरीज भाड्याने दिल्या जातात. शासनाने दुजाभाव न करता प्रक्रिया उद्योगासाठी तालुका पातळीवर प्रशिक्षण व लहान फॅक्‍टरी भाड्याने द्यावी. देशासाठी झोकून घेतले पाहिजे. चीनमध्ये पाण्याला पैसा मानतात. आपल्याकडे पैसा पाण्यासारखा वापरतात व पाण्याची नासाडीच नाही तर हत्या करतात.

बावसकर टेक्‍नॉलॉजीमार्फत आम्ही संकटाच्या काळातही शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादन घेता येईल असे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. निविष्ठा, सुविधा, हवामान यांच्या कमतरतांवर मात करून चांगले उत्पादन मिळवण्यास मदत होते. शेतकऱ्याला स्वतःचे बियाणे अधिक उत्पादनासाठी वापरता येते. आमचे तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीच्या पलीकडचे आहे. आमची जैविक, सेंद्रिय उत्पादने पिकातले विष काढून टाकण्याचे काम करतात. बिगर हंगामातही चांगले पीक उत्पादन मिळवून देतात. रोग-किडींच्या नियंत्रणासाठी जैविक, आयुर्वेदिक उत्पादने वापरून 40 ते 50 टक्के उत्पादन जास्त मिळते. मूल्यवर्धन हा आमच्या कामाचा मुख्य "फोकस' आहे. मूल्यवर्धित उत्पादन कसे घ्यायचं हे गेली 25 वर्षे आम्ही शेतकऱ्यांना शिकवतो. देशातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होत आहे. ज्यांना काहीच आधार नाही अशा हजारो कुटुंबांना आम्ही या तंत्रज्ञानाने उभे केले आहे. आम्हाला मानवतेचा प्रसार करायचा आहे.
------------

डॉ. व्ही. एस. बावसकर, संचालक, बावसकर टेक्‍नॉलॉजी (ऍग्रो) प्रा. लि. 

No comments:

Post a Comment