Monday, November 24, 2014

यशोगाथांसाठी विद्यापीठांचे रेटकार्ड... १० हजार रुपये रेट

यशोगाथा प्रसिद्ध करायचीये ?
दहा हजार रुपये द्या !!!

नाव छापण्यासाठी दोन हजार रुपये; कृषी विद्यापीठांचे अधिकृत रेटकार्ड

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील कृषी पदवीधारकांच्या यशोगाथा पुस्तकाच्या स्वरुपात प्रसिद्ध करण्याचा स्त्युत्य निर्णय राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी घेतला आहे. मात्र या पुस्तकात यशोगाथा प्रसिद्ध करण्यासाठी प्रत्येकी तब्बल 10 हजार रुपयांचा दर निश्‍चित करण्यात आला आहे. दहा हजार रुपये भरा यशोगाथा छापा, दोन हजार रुपये भरा "परिचय दर्शिके'त (डिरेक्‍टरी) छापा असा बिझनेस मंत्र विद्यापीठांनी माजी विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरुवात केली आहे.

परिसंवादाच्या आयोजनासाठी सहप्रायोजकत्व (सहा लाख रुपये) व प्रायोजकत्व (तीन, दोन व एक लाख रुपये) या माध्यमातूनही निधी गोळा करण्यात येत आहे. याशिवाय परिसंवादात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पुस्तकांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 15 ते 60 हजार रुपये, संकेतस्थळावर लिंक प्रसिद्ध करण्यासाठी 25 हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. याउपर परिसंवादात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये तर इतरांना पाच हजार रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. एक डिसेंबरपासून या शुल्कात आणखी वाढ करुन ते विद्यार्थ्यांना दोन हजार 500 व इतरांना सहा हजार रुपये करण्यात येणार आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डिसेंबरमध्ये कृषी उद्योजकता या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. परिसंवाद कालावधीच कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांपुढे माजी विद्यार्थ्यांचे आदर्श उभे करावेत, त्यांना प्रेरणा द्यावी या उदात्त हेतुने यशोगाथांचे पुस्तक प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या पुस्तकात यशोगाथा प्रसिद्ध करण्याचे इतर निकष पाठीमागे ठेवून एका यशोगाथेला 10 हजार रुपये शुल्क ठरविण्यात आले आहे. या शुल्कात एक हजार शब्दाचा मजकूर व दोन ते तीन छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येईल, असे विद्यापीठांनी म्हटले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांची परिचय दर्शिकाही प्रसिद्ध करण्याचे विद्यापीठांचे नियोजन असून त्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. या दोन हजार रुपयात इच्छूकांचा संक्षिप्त परिचय छापण्यात येणार आहे. आकारण्यात येणारे शुल्क हा संबंधीत पुस्तकाच्या छपाईचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय परिसंवादाच्या निमित्ताने परिसंवाद स्थळी तंत्रज्ञान व नवनिर्मिती प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, संशोधक, व्यवसायिक, कंपन्या या प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान मांडू शकतात. यासाठी तीन मिटर लांबी व रुंदी असलेल्या दालनाला 15 हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. प्रत्येक दालनात एक टेबल व दोन खुर्च्या पुरविण्यात येतील. एकाहून अधिक दालने हवी असल्यास अधिकच्या दालनासाठी 25 हजार रुपये रेट आहे. यात शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी कोणतीही वेगळी सवलत नाही.
------------------- 

No comments:

Post a Comment