Thursday, December 17, 2015

कृषी पदव्यत्तर पदवी प्रवेश प्रक्रीया रखडली

 आयसीएआर कोट्यातील जागा रिक्‍त, विद्यापिठस्तरावरून प्रवेश देण्याची मागणी

औरंगाबाद(प्रतिनिधी) - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठांतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कोट्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्‍त असूनही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शासनाने खास विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुविधांचा अपव्यय सुरु असून इच्छूक पात्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या रिक्‍त जागा भरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

कृषी परिषदेमार्फत चालू शैक्षणीक वर्षातील (2015-16) पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने नियोजित वेळापत्रकानुसार राबविण्यात आली. यात २5 टक्के जागा (अतिरिक्त 10 टक्के सह) भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत (आयसीएआर) भरण्यात येतात. आयसीएआर देशपातळीवर प्रवेश परिक्षा घेवून त्यातून निवडलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी संबंधित कृषी विद्यापीठाकडे पाठवते. यानंतरही जागा रिक्त राहिल्यास, नियमानुसार संबंधित विद्यापीठे राज्यस्तरावर जाहिरात देऊन विद्यापीठस्तरावर प्रवेश प्रक्रिया घेतात. यानुसार रिक्त जागांबाबत कृषी विद्यापीठस्तरावर पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र कृषी परिषदेच्या शिक्षण संचालकांनी चारही कृषी विद्यापीठांना दिले आहे. मात्र, विद्यापीठांनी अद्याप काहीही पावले उचलली नसल्याने या जागांपासून मुकण्याची आपत्ती विद्यार्थींवर ओढावली आहे.

एकट्या परभणी कृषी महाविद्यालयात 2014-15 शैक्षणीक वर्षात आयसीएआर कोट्यांतील 9 जागा रिक्‍त राहूनही कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. यंदाही 2015 -16 या शैक्षणीक वर्षात आयसीएआर कोट्यांतर्गत 7 जागा रिक्‍त असूनही त्या जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही. त्यामुळे पात्र असूनही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यासंदर्भात दिग्विजय दिवटे यांनी कुलसचिवांना व कृषी परिषदेला निवेदन दिले आहे. कृषी विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. रिक्त जागा भरण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांतर्फे देण्यात आला आहे.

- विद्यापीठाचा असाही कारभार
कृषी परिषदेच्या कोट्यातील फक्त एका रिक्‍त जागेसाठी 12 ऑक्‍टोबर 2015 ला स्पॉट ऍडमिशन राउंड फक्त परभणी येथे घेण्यात आला. यात आयसीएआर कोट्यातील रिक्त जागांचा समावेश केला नाही. एका जागेसाठी तब्बल 29 विद्यार्थ्यी रांगेत होते. यापैकी एकाला प्रवेश मिळाला. उर्वरित विद्यार्थ्यांना आयसीएआरचा कोटा रिक्‍त असूनही प्रवेशापासून वंचित रहावे लागले. बदनापूर येथील महाविद्यालायत कोणताही स्पॉट राउंड घेतला गेला नाही.

- कोट
आयसीआरच्या रिक्‍त जागा नेमक्‍या कशा भराव्यात, निकष नेमके कसे असावेत, यासंदर्भात कृषी परिषदेकडे वरिष्ठांकडे माहिती व मार्गदर्शन मागितले आहे. यावर निर्णय झाल्यानंतर जाहीरात काढून रिक्‍त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
डॉ. दि. ल. जाधव, कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठ परभणी.
.........................

No comments:

Post a Comment