Thursday, December 3, 2015

कृषी सल्ला सेवा केंद्रे सुरू करणार



आयुक्त विकास देशमुख ः ‘भविष्यातील स्मार्ट शेती’ज्ञान सोहळ्याचे उद्घाटन

लोगो- एसआयएलसी
पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे तंत्रज्ञान, यंत्र, अवजारे उपलब्ध करून दिली जातात. मात्र याबाबतचे तांत्रिक सल्ले व सेवा न मिळाल्याने छोट्या छोट्या गोष्टींमुळे ती बंद राहतात. तंत्रज्ञान असूनही त्याचा पुरेसा वापर होत नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी कृषी विभागामार्फत तरुणांच्या सहभागातून गावपातळीवर मोफत कृषी तांत्रिक सल्ला व सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली.

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमार्फत (एसआयएलसी) आयोजित करण्यात आलेल्या ‘भविष्यातील स्मार्ट शेती’ या विषयावरील कृषी ज्ञान सोहळ्याचे उद्घाटन गुरुवारी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी अप्पर मुख्य कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, ‘नेटाफिम’चे व्यवसाय प्रमुख विकास सोनवणे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, ‘एसआयएलसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा पालकर व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘यंदा पाऊस कमी पडल्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ आहे. फक्त पावसावर अवलंबून असलेला शेतकरी कोलमडून पडलाय. या परिस्थितीवर मात करण्यासाठी जमिनीच्या ओलाव्याची सुरक्षा, पाण्याच्या थेंबाथेंबापासून अधिकाधिक उत्पादन व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सर्वाधिक भर देण्यात येत आहे. यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार, सूक्ष्म सिंचन आदी विविध उपाययोजना, अभियाने राबविण्यात येत आहेत. उत्पादन वाढले की भाव नाही आणि भाव असेल तर उत्पादन नाही, या दुष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे अत्यावश्यक ठरणार आहे. उसाला ठिबक केल्यानंतर वाचलेल्या पाण्यातून इतर पिके घेतली जावीत. कुटुंबाची धान्य, भाजीपाला आदी वार्षिक गरज लक्षात घेऊन उर्वरित जमिनीवर नगदी पिकांचा विचार करावा लागेल.’’

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, शेतीतील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून मूल्य साखळी तयार करण्यापलीकडे शेती विकासाची दुसरी गुरुकिल्ली नाही, असे मत डॉ. गोयल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ शेती करण्यासाठी अनेक घटकांवर अवलंबून राहावे लागते. हे सर्व घटक विखुरलेले अाहेत. यात दुवे नसल्याने दलाल तयार झाले आहेत. या सर्व घटकांना एकत्र केल्याशिवाय शेतीत फायदा नाही. कृषी क्षेत्रातील कंपन्यांनीही शेतकरी विकासासाठी पुढाकार घ्यायला हवा. कारण शेतकऱ्याला चांगले दिवस आल्याशिवाय तुमचे धंदे चालणार नाहीत व चांगले दिवसही टिकणार नाहीत. शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांत संघटन शक्ती आहे. संघटितपणे प्रयत्न केल्यास हमीभाव व शासन या दोन्हींशिवाय शेतीतून समृद्धी मिळवता येईल. यासाठी ‘ॲग्रोवन‘मधून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहेत.’’

श्री. सोनवणे यांनी या वेळी ‘नेटाफिम’ कंपनीच्या वाटचालीची माहिती दिली. डॉ. पालकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
--------------
‘‘सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या स्मार्ट व्हिलेज उपक्रमाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांनी उत्सुकता दर्शविली आहे. यातील १० ते १५ गावे निवडण्यात येतील. त्यासाठी मोठा निधी लागणार असून, तो उभा करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार आणि समाजातील घटकांनी यासाठी मदतीचा हात पुढे केल्यास हा उपक्रम पूर्ण होण्यास मदत होईल.’’
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह 

No comments:

Post a Comment