Wednesday, October 29, 2014

दुध पावडरच्या दरावरुन खरेदी दराचे राजकारण

खासगी संस्थांचा शेतकऱ्यांना दणका; सहकारी संघांकडून दर कायम

पुणे (प्रतिनिधी) ः आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी झाल्याच्या कारणाखाली खासगी दुध संस्था, प्रकल्पांनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दुध खरेदीच्या दरात कपात करण्यास सुरवात केली आहे. मात्र आपल्याशी प्रामाणिक असलेल्या दुध संकलन केंद्रे व शेतकऱ्यांच्या दुध खरेदी दरात कपात न करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी दुध उत्पादक संघांनी घेतला आहे. यामुळे खासगी प्रकल्पांशी संबंधीत शेतकरी संकटात सापडले असून सहकारी संघांशी संबंधीत शेतकऱ्यांनी संकट टळल्याचा निश्‍विास सोडला आहे.

पुणे जिल्ह्यातील खासगी प्रकल्प व दुग्ध संस्थांनी गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर दोन ते अडिच रुपयांनी कमी केले आहेत. यामध्ये स्वराज्य दुध, डायनामिक्‍स डेअरी, प्रभात दुध, गोविंद दुध, पारस आदी प्रकल्पांचा समावेश आहे. इंदापूरच्या सोनई दुध प्रकल्पाने एक नोव्हेंबरपासून दुधाला 20 रुपये प्रति लिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे. तुलनेत पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 24 रुपये, दूध संस्थांना वरकड खर्चासाठी प्रति लिटर एक रुपया व वाहतूकीसाठी प्रति लिटर किमान 95 पैसे स्वतंत्रपणे देण्यात येत आहेत.

*चौकट
- खासगी संस्थांकडून गैरफायदा ?
आंतरराष्ट्रीय बाजारात दुध पावडरचे दर खाली वर होत असतात. मात्र या बाबीचा बाऊ करुन काही खासगी संस्था शेतकऱ्यांचा खिसा कापत आहेत. दुध पावडरला जास्त दर मिळतो तेव्हा हे प्रकल्प त्याचा फायदा शेतकऱ्यांना फारसा देत नाही. अडचण असून शकते. मात्र तो व्यवसायाचा भाग असतो. पशुखाद्य, भुसा, गाईंच्या किमती, चारा व औषधे, टॉनिक, मजूरी यांचे दर दिवसेंदिवस वाढत असताना मुळात कमी असलेल्या पावडरला दर नाही या कारणाखाली दुध दरात आणखी कपात करुन शेतकऱ्यांना भुर्दंड देणे चुकीचे आहे. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

*कोट
""गेल्या पंधरा दिवसात दुध भुकटीचे दर 300 रुपयांवर 180 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. यामुळे विक्री ठप्प आहे. गोकुळमार्फत दररोज एक ते दीड लाख लिटरची पावडर केली जाते. सध्या दर नसल्याने आम्ही पावडरचा साठा करत आहोत. दुध खरेदी दर कमी करण्याचा संघाचा विचार नाही.''
- दिलीप पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकूळ)

""खासगी संस्थांनी दर जास्त कमी केल्याने संघाकडे अचानक दुधाची आवक वाढली आहे. नेहमीच्या दुधाला पुर्वीप्रमाणेच दर कायम ठेवून अचानक वाढलेल्या दुधाला एक रुपया कमी दर देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. संघ शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.''
- बाळासाहेब खिलारी, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (कात्रज)
----------(समाप्त)----------- 

No comments:

Post a Comment