Thursday, October 2, 2014

माॅन्सूचा राज्यातील मुक्काम लांबणार


चौकट
- राज्यात पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्याने शनिवारी (ता.4) सकाळपर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः हा पाऊस दुपारनंतर पडण्याची अधिक शक्‍यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आकाश ढगाळलेले राहण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी (ता.2) सकाळपर्यंत कोकणात मॉन्सुन सक्रीय होता. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

पुणे (प्रतिनिधी) ः नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) माघारीचा प्रवास महाराष्ट्राच्या उत्तर उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. मात्र नेमक्‍या याच कालावधीत कोकणातील मॉन्सूनची सक्रीयता, उत्तर महाराष्ट्रात आद्रता उंचावलेली व बहुतेक ठिकाणी हवेची दिशा (विन्ड पॅटर्न) अस्थिर आहे. यामुळे निम्म्या महाराष्ट्रातील माघारीची सर्वसाधारण वेळ (1 ऑक्‍टोबर) उलटून गेल्यानंतरही मॉन्सूनचा मुक्काम कायम आहे. उलट त्याचा मुक्काम अजून काही काळ लांबण्याची चिन्हे आहेत. चालू आठवड्यात राज्यात ठिकाठिकाणी मॉन्सून पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासात कोकणात मॉन्सून सक्रीय होता. कोकणात कर्जत येथे 50 मिलीमिटर, खालापूर व पनवेल येथे प्रत्येकी 40 मिलीमिटर, कुडाळ, खेड व माथेरान येथे प्रत्येकी 30 मिलीमिटर, चिपळूण, सुधागड, माणगाव, पोलादपूर, लांजा येथे प्रत्येकी 20 मिलीमिटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात वडगाव मावळ येथे 50 मिलीमिटर, वडुज येथे 30 मिलीमिटर, शाहुवाडी, शिराळा, गगनबावडा व दहिवडी येथे प्रत्येकी 20 मिलीमिटर पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडे होते.

हवामान खात्याने पुढील तीन-चार दिवसात उत्तर भारतातील उर्वरीत ठिकाणे व मध्य भारतातील आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील मॉन्सूनचा मुक्काम कायम राहण्याची दाट शक्‍यता आहे. मॉन्सून माघारी येणे म्हणजे त्या भागातील नैऋत्य मॉन्सून वाऱ्यांची दिशा विरुद्ध दिशेने बदलून स्थिर होणे, त्या भागातील सापेक्ष आद्रतेत एकदम मोठ्या प्रमाणात घट होऊन ती स्थिर राहणे व सलग तीन दिवस त्या भागात पाऊस न पडणे. या तिन्ही गोष्टी जुळल्यास संबंधीत भागातून मॉन्सून माघारी फिरला असे म्हटले जाते. सद्यस्थितीत येत्या आठ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात अशी स्थिती तयार होण्याची शक्‍यता कमी असल्याची माहिती हवामान खात्याच्या सुत्रांनी दिली.

दक्षिण गुजरातमध्ये पोरबंदरपर्यंत, मध्य प्रदेशात उज्जैनपर्यंत, उत्तर प्रदेशात कानपूरपर्यंत तर उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्‍मिरच्या काही भागातून माघारी आला आहे. पुढील तीन चार दिवसात तो जम्मू काश्‍मिर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागातून माघारी फिरण्याची दाट शक्‍यता आहे.
---------------- 

No comments:

Post a Comment