Friday, October 17, 2014

पुस्तक परिचय - गडकोट, अपरिचित गडकोट, दुर्गम दुर्ग - भागवान चिले


जावे पुस्तकांच्या गावा - संतोष डुकरे
---------------
पुस्तकाचे नाव - दुर्गम दुर्ग
पृष्ठे - 133
मुल्य - 150

पुस्तकाचे नाव - गडकोट
पृष्ठे - 128
मुल्य - 150 रुपये

पुस्तकाचे नाव - अपरिचित गडकोट
पृष्ठे - 133
मुल्य - 150 रुपये
---------------
दुर्गम गडांच्या सोप्या वाटा !

भगवान चिले आणि शिवस्पर्श प्रकाशन ही नावे दुर्गप्रेमींना नवीन नाहीत. महाराष्ट्रातील किल्ल्यांची भ्रमंती, अभ्यास व माहिती प्रसार यात ही नावे अग्रणी आहे. गडकोट मालिकेतील त्यांचे दुर्गम दुर्ग हे नविन पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. महाराष्ट्रातील 40 दुर्लक्षित, चढाईसाठी अवघड अनोख्या किल्ल्यांची माहिती देण्यात आली आहे. पदरगड, भैरवगडापासून ते रांजणगिरीपर्यंतच्या अनेक वैविध्यपुर्ण किल्ल्यांचा यात समावेश आहे. अपरिचित गडकोट या पुस्तकात अलंग, मदन, कुलंग, चंदेरी, कंडाळा अशा 35 दुर्लक्षित किल्ल्यांचा धांडोळा घेण्यात आला आहे. तर गडकोट या पुस्तकात राज्यातील लोकप्रिय, प्रसिद्ध व सातत्याने चर्चेत असलेल्या 51 किल्यांची माहीती आहे.

सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात दर वर्षी हजारो सह्यवेडे फिरत असतात. मुख्य आकर्षण गड किल्ले हेच असते. मग माध्यम ट्रेकिंगचे असो, रॉक क्‍लायंबिंगचे, सायकलिंग, इतिहास वा निसर्ग अभ्यासाचे. योग्य माहिती हाताशी असेल गडाबरोबर त्याभोवतीचे आसमंतही उलगडत जाते. मग किल्ला फक्त किल्ला न राहता प्रेरणास्त्रोत होतो. सह्याद्रीच्या कुशीत अशी 500 हून अधिक प्रेरणास्थळे आहेत. जाज्वल्य इतिहास मनाला भिडला की वर्तमान प्रबळ व भविष्य उज्वल होते, असे म्हणतात. एकेका किल्ल्याचे वर्णन वाचल्यानंतर त्यास भेट देण्याची उर्मी जागृत होते, हे या पुस्तकांचे यश आहे. चिले यांनी वाचकाचे बोट धरुन त्याला चिकित्सकपणे किल्ल्याच्या कानाकोपऱ्यात फिरवले आहे. गडवाटा, स्थळ नकाशे, दुर्गावशेषांची माहिती, इतिहास व त्यास सद्यस्थितीच्या रंगित छायाचित्रांची जोड ही या पुस्तकांची वैशिष्ट्ये आहेत. या पुस्तकांच्या आधारे दुर्गम गड किल्ल्यांच्या खडतर वाटाही वाचकांसाठी सोप्या होतील, हे निश्‍चित.
---------------
अधिक माहितीसाठी संपर्क ः भागवान चिले 9890973437
--------------- 

No comments:

Post a Comment