Wednesday, October 22, 2014

गहू, हरभरा, ज्वारीसाठी हवामानाधारित रब्बी पिक विमा सुरु

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये चालू रब्बी हंगामात गहू, हरभरा व ज्वारी पिकासाठी हवामानाधारित पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात रब्बी ज्वारी व गहू, नगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात रब्बी ज्वारी व हरभरा तर अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत गहू व हरभरा पिकांसाठी हेक्‍टरी 20 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करण्यात येणार आहे. हरभरा व ज्वारीसाठी 31 ऑक्‍टोबर तर गहू पिकासाठी 22 नोव्हेंबर ही सहभागाची अंतिम मुदत आहे.

हवामानाधारीत रब्बी पिक विमा योजना राबविण्यात येणाऱ्या पाचही जिल्ह्यांमध्ये या योजनेबरोबरच राष्ट्रीय कृषी पिक विमा योजनाही सुरु राहणार आहे. संबंधित पिकांसाठी पिक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजना लागू असलेल्या जिल्ह्यांतील संबंधीत पिकाचे उत्पादन घेणारे सर्व शेतकरी विमा योजनेत सहभागासाठी पात्र आहेत. महसूल मंडळ स्तरावर हवामान घटकांच्या नोंदी घेणअयासाठी नोंदणीकृत त्रयस्थ संस्थेमार्फत स्वयंचलित संदर्भ हवामान केंद्र उभारणी करण्याची जबाबदारी भारतीय कृषी विमा कंपनीवर राहणार आहे.

विमा कालावधी संपल्यानंतर 45 दिवसात भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे. विमा हप्ता अनुदान व अवेळी पाऊस, तापमान व आद्रता या बाबींची आकडेवारी वेळेत मिळण्याच्या अटिंच्या आधिन राहून विमा कंपनी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना बॅंकांमार्फत देणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन हवामानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीत पिकास होणाऱ्या आर्थिक नुकसानीस संरक्षण मिळावावे, असे आवाहन विमा कंपनीचे क्षेत्रिय व्यवस्थापक डी. डी. डांगे यांनी केले आहे.

- बॅंकांची जबाबदारी महत्वाची
हवामान आधारीत विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांना विमा प्रस्तावामधील माहिती भरणे व कागदपत्रे सादर करण्याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी बॅंकांवर राहणार आहे. यासाठी त्यांना विमा हप्त्याच्या चार टक्के रक्कम कमिशन म्हणून देण्यात येणार आहे. वित्तिय संस्थांच्या तृटींमुळे, दिरंगाईमुळे किंवा हलगर्जीपणामुळे योजनेच्या लाभापासून योजनेत सहभागी झालेले शेतकरी वंचित राहिल्यास या संबंधात काही नुकसान भरपाई द्यावयाची झाल्यास त्याची जबाबदारी संबंधीत वित्तीय संस्थेवर राहणार आहे.

- शेतकऱ्यांनी हे करावे
हवामानाधारिक विमा योजनेचा लाभ घेऊ इच्छिनाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या बॅंकेत किंवा प्राथमिक कृषी सहकारी संस्थेत विम्याचा प्रस्ताव सादर करावा. अंतिम मुदतीच्या आत पेरणी झाल्याचा सात बारा उतरा किंवा पेरणी केल्याचे प्रमाणपत्र विमा प्रस्तावासोबत द्यावे. शेतकऱ्यांनी एका क्षेत्रासाठी एकदाच आणि एकाच विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. जर त्याने एकाच क्षेत्रासाठी दोन दिंवा त्यापेक्षा अधिक विमा संरक्षण एकाच किंवा वेगवेगळ्या कंपन्यांकडून घेतले तर त्याचा जमा विमा हप्ता जप्त करण्यात येणार आहे.

*चौकट
- असे आहे संरक्षण
पिक --- जिल्हा --- विमा संरक्षण (रुपये, प्रति हेक्‍टर) ---- शेतकऱ्यांनी विमा हप्ता
हरभरा --- नगर, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर --- 20,000 --- 900
रब्बी ज्वारी --- सोलापूर, नगर, उस्मानाबाद --- 18,000 --- 864
गहू --- सोलापूर, अमरावती, नागपूर --- 20,000 --- 840
---------------
*चौकट
- विमा संरक्षित बाबी व संरक्षण
पिक --- विमा संरक्षित बाबी व कंसात विमा संरक्षणाची रक्कम (रुपये)
गहू --- अति तापमान (8000), अवेळी किंवा अती पाऊस (8000), रोगाला अनुकूल हवामान (4000)
ज्वारी --- अति तापमान (5400), कमी तापमान (7200), आद्रता (1800), अवेळी किंवा अति पाऊस (3600)
हरभरा --- अति तापमान (8000), कमी तापमान (4000), अवेळी किंवा अति पाऊस (4000), रोगाला अनुकूल हवामान (4000)
-------------- 

No comments:

Post a Comment