Friday, October 10, 2014

जलधारा, जलपुष्प, जलाशय, गंगोत्री - पुस्तक परिचय

जावे पुस्तकांच्या गावा
------------
संतोष डुकरे
------------
नाव ः जलधारा
पृष्ठे ः85
मुल्य ः 50
------------
नाव ः जलपुष्प
पृष्ठे ः 93
मुल्य ः 100
------------
नाव ः जलाशय
पृष्ठे ः 129
मुल्य ः 100
------------
नाव ः गंगोत्री
पृष्ठे ः 138
मुल्य ः 130
------------
दुष्काळमुक्ती, जलसाक्षरतेचे जनजागरण

दुष्काळ आणि सुकाळ या पाणी नावाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक होरपळवणारी तर दुसरी संपन्नतेची. दोन टोकाच्या या दोन बाजू त्यातील विरोधाभासासह वर्षानुवर्षे कायम आहेत. दुष्काळ हटविण्यासाठी अनेक चळवळी, कार्यक्रम, उपक्रम सुरु आहेत. शेकडो जण यात आपापल्या परिने योगदान देत आहेत. श्रीधर खंडापूरकर हे या चळवळीतील एक नाव. त्यांची पाणी या विषयाला वाहिलेली लहान लहान कवितांची ही चार पुस्तके. यातील जलपुष्प हे पुस्तक स्वतः लेखकाने तर उर्वरीत तीनही पुस्तके ठाणे येथिल शारदा प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेली आहे. दुष्काळमुक्ती आणि जलसाक्षरतेसाठीचे जनजागरण हा या चारही पुस्तकांचा गाभा आहे.

पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि अपव्यय टाळावा या तळमळीने या पुस्तकांमध्ये लेखकाने सर्वसामान्यांना पटेल, रुचेल, भावेल आणि प्रत्यय येईल अशा शब्दांत रचना मांडल्या आहेत. पाणी आणि सजिवांचे अतुट नाते, जलसंवर्धन, जलसंचय, भुजल पुर्नभरण, पाण्याचा काटेकोर वापर, जलशुद्धीकरण यासह पाणी व त्याच्याशी जोडलेल्या जवळपास प्रत्येक बाबीवर लेखकाने या पुस्तकांमध्ये स्पर्ष केला आहे. पाण्याची महती सांगितली आहे. आणि व्यथा व उपायही मांडले आहेत. पावसाच्या थेंबावर, नाव नाही कोणाचे, जो जो वाचवील, थेंब थेंब होय त्याचे... अशा साध्या सोप्या सहज रचनांमधून पाण्याचे संस्कार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न लेखकाने यात केला आहे. पैशाने नाही विझली जगी, आजतागायत कोणाची तहान... यासारख्या त्यांच्या अनेक कविता सुभाषिते, बोधवाक्‍यांसारख्या आहेत. पुस्तके वेगवेगळी असली तरी त्यांची जातकुळी एकच आहे. पाणी आणि पर्यावरण या विषयांच्या जागरणासाठी ही पुस्तके निश्‍चितच महत्वपूर्ण ठरु शकतील.
------------- 

No comments:

Post a Comment