Wednesday, October 8, 2014

पुणे, कोल्हापूर विभागात रब्बी पेरणीला प्रारंभ

नगर जिल्ह्याची आघाडी, ज्वारीला सर्वाधिक पसंती

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यात चालू रब्बी हंगामात आत्तापर्यंत सुमारे तीन लाख 81 हजार हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरी 62 लाख 43 हजार हेक्‍टर क्षेत्राच्या सहा टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. यापैकी सुमारे दोन लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या नगर जिल्ह्यातील आहे. तर पेरणीपैकी तब्बल तीन लाख 62 हजार हेक्‍टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. पुणे व कोल्हापूर विभागात ज्वारी व मक्‍याची पेरणी झाली झाली. उर्वरीत भागात पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे प्रगतीपथावर असल्याचे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.

नगर जिल्ह्यात सात लाख 88 हजार हेक्‍टर सरासरी क्षेत्रापैकी 25 टक्के म्हणजेच सुमारे एक लाख 99 हजार 600 हेक्‍टरवर ज्वारी, मका, करडई, हरभरा या पिकांची पेरणी झाली आहे. पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यात 78 हजार 600 हेक्‍टर (9 टक्के), पुणे जिल्ह्यात 69 हजार 600 हेक्‍टर (12 टक्के), सातारा जिल्ह्यात 17 हजार 600 हेक्‍टर (8 टक्के) तर सांगली जिल्ह्यात 15 हजार 600 हेक्‍टरवर (6 टक्के) रब्बी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.

पुणे व कोल्हापूर विभाग वगळता इतर विभागांमध्ये अद्याप पेरण्या सुरु झालेल्या नाहीत. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या 28 जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरणीला प्रारंभ झालेला नसून या ठिकाणी पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे सुरु असल्याचे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.

पिकनिहाय रब्बी पेरणीची सद्यस्थिती (2014-15)
पिक ---- सरासरी क्षेत्र (हेक्‍टर) --- पेरणी हेक्‍टरमध्ये व कंसात टक्केवारी
ज्वारी --- 30,90,000 --- 3,61,000
मका --- 99,600 --- 17,300
हरभरा --- 13,06,800 --- 1,100
करडई --- 2,11,300 --- 700
सुर्यफुल --- 1,65,500 --- 700
गहू --- 11,78,600 --- 0
जवस --- 49,900 --- 0
तीळ --- 3,300 --- 0
--------------
- राज्यातील पावसात मोठी घट
राज्यात एक जून ते सात ऑक्‍टोबर या कालावधीत सरासरीच्य 71.8 टक्के (823.10 मिलीमिटर) पाऊस झाला आहे. नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये 25 ते 50 टक्के; रायगड, नाशिक, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूरमध्ये 50 ते 75 टक्के; ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नगर, अमरावती व गडचिरोलीत 75 ते 100 टक्के तर पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांत 100 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करता 355 पैकी 38 तालुक्‍यांत 25 ते 50 टक्के, 163 तालुुक्‍यात 50 ते 75 टक्के, 101 तालुक्‍यात 75 ते 100 टक्के तर 53 तालुक्‍यात 100 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
-------------- 

No comments:

Post a Comment