Tuesday, October 28, 2014

कोकणात पाऊस वाढणार

निलोफरचा प्रभाव 31 पासून वाढणार

पुणे (प्रतिनिधी) ः अरबी समुद्रातील निलोफर चक्रीवादळाच्या प्रभावामुळे येत्या शुक्रवारपासून (ता.31) गुजरातबरोबरच कोकणातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सध्या हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून सुमारे एक हजार 100 किलोमिटर अंतरावर सक्रीय आहे. गुरुवारी सकाळपर्यंत (ता.30) कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पश्‍चिम मध्य अरबी समुद्रावर असलेल्या निलोफर चक्रीवादळाची तिव्रता आणखी वाढून त्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे. मंगळवारी सकाळी ते आणखी उत्तर वायव्येकडे सरकले. त्याचा केंद्रबिंदू गुजरातमधील नलियापासून नैऋत्य दिशेस एक हजार 110 किलोमिटर आणि पाकिस्तानातील कराचीपासून दक्षिण-नैऋत्य दिशेस एक हजार 150 किलोमिटर अंतरावर होता.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. वेंगुर्ला येथे सर्वाधिक 10 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे होते. निलोफरच्या प्रभावामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल सात अंशापर्यंत उल्लेखनिय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय घट झाली आहे. उर्वरीत राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरीत राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. कोकणात बहुतेक ठिकाणी कमाल व किमान तापमानात अवघा चार पाच अंशाचा फरक अनुभवास आला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान डहाणू व अलिबाग येथे प्रत्येकी 31.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर सर्वात कमी तापमान नाशिक येथे 14 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

मंगळवारी (ता.28) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोविस तासातील राज्यातील प्रमुख ठिकाणचे कमाल व कंसात किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई 30 (24.2), अलिबाग 31.1 (23.2), रत्नागिरी 27.3 (21), पणजी 29.4 (22.4), डहाणू 31.1 (22.5), पुणे 26 (19), जळगाव 28.2 (15.3), कोल्हापूर 23.1 (20), महाबळेश्‍वर 20.1 (15), मालेगाव 30.4 (15.6), नाशिक 27.8 (14), सांगली 23 (17.7), सातारा 25.3 (16.5), सोलापूर 28.1 (17.6), उस्मानाबाद 26.8 (15.5), औरंगाबाद 27 (15.2), परभणी 28.5 17.2), नांदेड 29 (15.5), अकोला 29.4 (17.2), अमरावती 26.8 (18), बुलडाणा 26.6 (16.6), ब्रम्हपुरी 29.9 (18.4), गोंदिया 27.1 (16.2), नागपूर 28.9 (17.1), वाशिम 29 (20.2), वर्धा 28.5 (17.4), यवतमाळ 28 (15.2)
--------------------- 

No comments:

Post a Comment